Home » वाचा टायटॅनिक पेक्षा जास्त प्राणहानी सोसलेल्या महाराष्ट्रातील रामदास बोटीचा इतिहास..

वाचा टायटॅनिक पेक्षा जास्त प्राणहानी सोसलेल्या महाराष्ट्रातील रामदास बोटीचा इतिहास..

by Team Gajawaja
0 comment
Ramdas ship disaster
Share

१७ जुलै १९४७ या दिवशी मुंबईच्या बंदरात उभ्या असलेल्या एस. एस. रामदास बोटीवर चढण्यासाठी नेहमीपेक्षा जरा जास्तच गर्दी झाली होती. मुंबईतून कोकणातल्या रेवास, अलिबाग, मुरूड अशा ठिकाणी जाण्यासाठी रस्त्यापेक्षा बोटीनं जाणं कमी वेळखाऊ असल्यामुळे कायमच अशा बोटींना गर्दी असायची. त्या दिवशी दीप अमावास्या असल्यामुळे सुट्टीसाठी बरेच चाकरमानी कोकणात आपल्या गावी निघालेले होते. त्या दिमाखदार, भरभक्कम तीन मजली बोटीची निघायची वेळ झाली, तरी प्रवासी चढतच होते. अखेर आठ वाजायच्या सुमारास कॅप्टन शेख सुलेमान आणि मुख्य अधिकारी आदमभाई त्या गर्दीतून वाट काढत बोटीत शिरले. कर्णकर्कश भोंगा वाजला, खलाशानं धक्क्याला बांधलेले दोरखंड काढले आणि पुढच्या काही मिनिटांतच बोट रवाना झाली… त्यावेळी बोटीवर असलेल्या सुमारे सातशे प्रवाशांना अंदाजही नव्हता, की पुढचा तास हा आपल्या आयुष्याचा कदाचित शेवटचा तास असेल!(Ramdas ship disaster)

उंच लाट आली आणि…

असं सांगतात, की रामदासचा प्रवास सुरू झाला तेव्हा आकाश निरभ्र होतं, पण जेमतेम आठ- दहा मैलांचा प्रवास झाला नसेल, तोच दूरवर पाऊस पडत असल्याचं आणि आकाशतही काळे ढग जमा होत असल्याचं कॅप्टन शेख सुलेमान यांच्या लक्षात आलं. बोट तशीच पुढे जात होती, पण अचानक वाऱ्याचा वेग वाढला. पुढे जाऊ तसं, लाटाही उंच होत असल्याचं पाहून सुलेमान आणि आदमभाई दोघंही हबकले. एव्हाना बोट होती तिथे पाऊस सुरू झाला. नुसताच सुरू झाला नाही, तर तो बोटीला झोडपून काढत होता. सकाळी आपण निघालो तेव्हा हवामान खात्याने पावसाचा कोणताच अंदाज वर्तवलेला नव्हता, मग अचानक हे पाऊस- वादळ कुठून आलं असा विचार करत शेख तशीच बोट चालवत होते. पण परिस्थिती त्यांच्या हातून निसटायला लागली होती. प्रचंड जोराचा पाऊस, वारा आणि जोडीला उंच लाटांच्या तांडवात बोट सापडली होती. काही क्षणातच बोट हेलकावे खायला लागली. घाबरलेले प्रवासी बोटीतून इकडूनतिकडे पळायला लागल्यामुळे बोटीचा तोल आणखीनच ढळला. बोटीत पाणीही शिरलं होतं. अशात शेख यांना समोर काश्याच्या बेटाचा खडक दिसला आणि आता बोट कोणत्याही क्षणी त्याच्यावर आपटणार हे लक्षात आलं. बोट खडकाला आपटली, तर सगळ्यांनाच जलसमाधी मिळणार हे त्यांना दिसत होत. त्यांनी शर्थीनं बोट वळवण्याचा प्रयत्न केला, पण निसर्ग त्यांच्या बाजूने नव्हताच. अशातच एक जवळपास चाळीस फुटी लाट उसळली आणि एका क्षणात रामदास पाण्याखाली गेली.(Ramdas ship disaster)

====

हे देखील वाचा – अटालांटिक समुद्र हिरवा तर हिंद महासागर निळा का दिसतो?

====

मृत्यूचं भयाण रूप

त्याच दिवशी रेवासहून कोळ्यांची काही गलबतं मासळी घेऊन मुंबईला निघाली होती. काही अंतर कापताच सागरात तुफान आल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी परत किनाऱ्याला जायचा निर्णय घेतला. आपल्या जवळची महागडी मासळी नासू नये म्हणून दुपारनंतर समुद्र शांत झाल्यावर ही गलबतं परत मुंबईला जायला निघाली… काही अंतर गेल्यावर त्यांना शेकडो माणसं पाण्यात नुसतीच निपचित पडून असल्याची दिसली, तर काही पोहायचा प्रयत्न करत होती. हा काय प्रकार आहे याचा त्यांना उलगडा होईना… मात्र, काहीतरी विपरीत घडलंय हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी भराभर समुद्रात उड्या टाकून शक्य तितक्या लोकांना वाचवलं. जास्तीत जास्त लोकांना बोटीत जागा देता यावी म्हणून त्यांनी आपली मासळीसुद्धा पाण्यात फेकून दिली. सुमारे ७५ लोकांचे जीव वाचवून या बोटी रेवासच्या बंदराला पोहोचल्या, तेव्हा रामदास बोटीच्या दुर्घटनेची माहिती सर्वांना कळाली. पुढचे दोन दिवस शोधमोहीम आणि बचाव कार्य सुरू होतं, पण बोटीवर असलेल्या अंदाजे ७५० प्रवाशांपैकी फक्त १५५ लोक जिवंत परतले. कॅप्टन शेख आणि आदमभाई यांनी बोटीच्या खिडकीतून उडी मारून पोहत रेवास बंदर गाठलं होतं. पुढचे काही दिवस प्रवाशांचे मृतदेह अलिबागच्या आवास, सासवणे, किहीम, वरसोली अशा गावांच्या किनाऱ्याला लागत होते…(Ramdas ship disaster)

सर्वात मोठी शोकांतिका

रामदास बोट बुडाली तेव्हा देश स्वातंत्र्य लढ्याच्या शेवटच्या टप्प्यावर होता. त्यामुळे या दुघर्टनेची देशव्यापी दखल घेतली गेली नाही असं म्हणतात. महिन्याभरात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या दुर्घटनेची आठवण आणखीनच पुसट झाली. आजही महाराष्ट्रात आणि देशातल्या अनेकांना तिची माहिती नाही. रामदासची शोकांतिका अजून संपलेली नाही.(Ramdas ship disaster)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.