साडी… प्रत्येक स्त्रीचा वीक पॉईन्ट. कोणी कितीही म्हटलं की, ‘मला साडी अजिबातच आवडत नाही’ हे सर्रास खोटेच असते. कारण सर्वांनाच साडी आवडतेच आणि जरी तिला रोज कोणी नेसत नसले तरी सगळ्यांकडे साड्यांचे चांगलेच कलेक्शन असते. साडीमध्ये स्त्रीचे जे सौंदर्य आणि रूप खुलून येते ते इतर कोणत्याही पेहरावामध्ये कितीही मेकअप केला तरी उठून दिसत नाही. साडीची फॅशन कधीच जुनी होत नाही आणि होणारही नाही कारण मुळातच साडी ही फॅशन नसून आपली संस्कृती आहे.
साडी नेसल्यावर स्त्रीच्या चेहऱ्यावर जे तेज येते ते तिचे सौंदर्यच नाही तर व्यक्तिमत्व देखील खुलून टाकते. साडी म्हणजे सहा मीटरचा लांब कापड नसून, ती एक भावना आहे. आपल्याला साडी म्हटले की डोळ्यासमोर सर्वात आधी येते ती भरजरी, जरतारी काठ आणि पदरावर मोर असलेली पैठणी. साड्यांची महाराणी आणि राजवस्त्र असलेली ही पैठणी प्रत्येक स्त्रीच्या कपाटात मानाने विराजमान असते. अतिशय सुंदर, लोभस असणारी ही पैठणी जरी महाग असली तरी प्रत्येक स्त्री तिला आयुष्यात एकदा विकत घेतेच. आपले मराठी सण, समारंभ, लग्नसोहळे या पैठणीशिवाय निव्वळ अपूर्णच असतात.
सर्वच साड्यांमध्ये अतिशय वरचे आणि मानाचे स्थान असलेल्या या पैठणीचा इतिहास आणि तिची माहिती खूपच कमी लोकांना माहित असेल. या पैठणीने फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण जगात आपली ओळख निर्माण केली आहे. अशा या पैठणीची सुरुवात झाली तरी कशी जाणून घेऊया.
पैठणी या महावस्त्राला थोडी थोडकी नाही तर तब्बल २००० वर्षाची पंरपरा आहे. औरंगाबाद अर्थात संभाजी नगर जिल्ह्यात गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या पैठण या ऐतिहासिक नगरावरून या वस्त्राला पैठणी हे नाव मिळाले. संत एकनाथांची समाधी असलेल्या पैठण नगराला मोठा वैभवशाली इतिहास आहे. संतांची भूमी, विद्वान-पंडितांची, विद्यानगरी म्हणून पैठणची ओळख आहे.
सातवाहन राजवंशाच्या काळात पैठणी साडीच्या निर्मितीला सुरुवात झाली असल्याचे जुन्या ग्रंथांमध्ये लिहिले आहे. पैठणी साडीच्या निर्मितीचे मुख्य कारण होते ते, भारतातून परदेशात निर्यात करून राजकोषात भर घालणे. भारतीय विणकाम, वस्त्राचा पोत, रंगसंगती, नक्षीकाम टिकाऊपणा साडी नेसण्याची पद्धत या सर्व गोष्टी विदेशी ग्राहकांना आकर्षित करायच्या. पूर्वीपासूनच पैठणीला विदेशात प्रचंड मागणी होती. गौतमीपुत्र सातकर्णी याने सातवाहन काळात पैठणी निर्मितीच्या उद्योगाला नवी चालना दिली.
एक पैठणी घडवण्यासाठी कारागिरांना खूप परिश्रम घ्यावे लागतात. पैठणी ही साडी हातमागावर रेशीम व सोने चांदीचे यांचे जर वापरुन तयार होते. मात्र आता सिल्कची जर देखील वापरली जाते. सुरुवातीच्या काळात पैठणी ही मुख्यत्वे फक्त मोरपंखी रंगातच तयार व्हायची. तिच्या पदरावर सोन्याच्या धाग्यांनी विणकाम केले जाई. साधारणपणे पाचशे ग्रॅम रेशीम धागे आणि अडीचशे ग्रॅम जर लागते. पैठणीचे सर्वात मोठे आणि मुख्य वैशिष्टय म्हणजे ती दोन्ही बाजूंनी, पदर आणि बॉर्डर समानच असते. म्हणजे मागील व पुढील बाजू सारखीच दिसते.
एक सहावारी पैठणी साडी विणण्यासाठी १८ ते २४ महिन्यांचा काळ लागतो. जसजसा काळ पुढे सरकला तशी पैठणी ही लाल, पिवळा, निळा, हिरवा, जांभळा, गुलाबी, काळ्या आदी रंगामध्येही तयार होऊ लागली. मराठे, पेशवे यांच्या साम्राज्यात पैठणीला राजाश्रय मिळाला आणि तिला सुगीचे दिवस आले. राज घराण्यातील महिलांची पहिली पसंती पैठणीलाच मिळायची. पुढे सामान्य लोकांमध्ये देखील ही पैठणी मोठ्या तोऱ्याने मिरवू लागली. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे लेणं असणारी ही पैठणी सौभाग्याचे लेणं झाली. नववधूला पाठवणी या राजवस्त्रामध्येच होऊ लागली. आपल्या मुख्य मंदिरातील देवींच्या अंगावर देखील ती विराजमान झाली.
राजाश्रय मिळाल्याने ही पैठणी मोठ्या डौलात मिरवत होती. मात्र स्वातंत्रपूर्व कालापर्यंत राजाश्रयाने चालत असलेले पैठणीचे उत्पादन राजाश्रय संपल्यानंतर बंद झाले. खास कारागीरांना रोजगार नाहीसा झाल्याने तेथून ते विस्थापित झाले. पुढे त्यांनी नाशिक जिल्ह्यातील येवला गाव गाठले आणि येथे येऊन स्थायिक झाले. महाराष्ट्रातील येवला आणि पैठण येथे तयार होणारी पैठणी जगात प्रसिध्द असून तिला परदेशातून मागणी आहे.
पैठणीमध्ये सिंगल पल्लु, डब्बल पल्लू असे प्रकार असून या संपूर्ण साडीवर बुट्टी विणलेली असते. पैठणीची सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे तिचा पदर आणि बॉर्डर. बांगडी मोर, पोपट, मैना, अजिंठा कमळ, कुयरी, आक्रोटी असे नक्षीकाम जरीने केलेले असते. सध्या पैठणीमध्ये सिल्क, ब्रोकेड, टिश्यु, कॉटन अशा धाग्यांचे प्रकार दिसून येतात. सोबतच पेशवाई पैठणी, खण पैठणी, इरकल पैठणी, सेमी पैठणी, कडीयाल पैठणी, धुपछॉंव पैठणी, मुनीया पैठणी आदी फ्युजन प्रकार देखील उपलब्ध आहेत.
======
हे देखील वाचा : मॉन्सूनमध्ये साडीत आकर्षक दिसण्यासाठी टिप्स
======
आजच्या आधुनिक काळात पैठणीची क्रेझ फक्त स्त्रियांपुरती मर्यादित न राहता पुरुष देखील या राजवस्त्राने भुरळ घातल्याचे दिसून येते. आता पुरुष साडी नेसू शकत नसले म्हणून काय झाले. ते याच पैठणीपासून बनवलेले जॅकेट, कुर्ते, धोती घालताना दिसतात. तर मुली देखील याच पैठणीपासून बनवलेले घागरा ओढणी, ब्लाऊज, वनपीस फ्लॉन्ट करतात. याशिवाय विविध प्रकारचे वॉलपीस, पर्स, ट्रे, , तोरण, आकाश कंदील आदी अनेक वस्तूंवर पैठणी मोठ्या ऐटीत झळकताना दिसते.