Home » Hinglaj Mata Temple : या मंदिरात आहे, पाकिस्तानमधून आलेली अखंड ज्योत !

Hinglaj Mata Temple : या मंदिरात आहे, पाकिस्तानमधून आलेली अखंड ज्योत !

by Team Gajawaja
0 comment
Hinglaj Mata Temple
Share

देवीच्या शक्तिचा उत्सव सर्वत्र साजरा होत आहे. देवीच्या दर्शनासाठी देशभरातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी झाली आहे. अशातच देवीच्या 51 शक्तिपीठांमध्येही मोठी गर्दी झाली आहे. अशाच एका शक्तिपीठामध्ये पाकिस्तानमध्ये असलेल्या हिंगलाज माता शक्तिपीठाचा समावेश आहे. येथे माता सतीच्या मस्तकाचा वरचा भाग पडला होता. यामुळेच हे शक्तिपीठ सर्वात महत्वाचे आणि चमत्कारिक मानले जाते. या शक्तिपीठामध्ये जाऊन माता हिंगलाज देवीचे दर्शन घेण्याचे स्वप्न अनेक भाविकांचे आहे. मात्र पाकिस्तानमध्ये जाणे शक्य नसल्यानं देवी भक्तांमध्ये नाराजी होते. पण अशा भाविकांसाठी भारताच्या राजस्थानमधील छोटी हिंगलाज माता मंदिर हे आस्थेचे स्थान झाले आहे. (Hinglaj Mata Temple)

त्याला कारण ठरली आहे, तेथील अखंड ज्योत. ही अखंड ज्योत माता हिंगलाज देवीच्या मूळ स्थानपासून, म्हणजेच हिंगलाज देवी मंदिर बलुचिस्तान येथून आणलेली आहे. या अखंड ज्योतीला पाहण्यासाठी आणि मातेसमोर नतमस्तक होण्यासाठी बाडनेरच्या या छोटी हिंगलाज माता मंदिरात भाविकांचा मोठा मेळा भरला आहे. बाडमेर हा भारताच्या राजस्थान राज्याच्या नैऋत्येला स्थित जिल्हा आहे. हा थार वाळवंटाचा एक भाग आहे आणि पाकिस्तानच्या सीमेला लागून आहे. याच बाडनेरमधील हिंगलाज माता मंदिरामध्ये नवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरलेली आहे. सध्या भारतभरातून येथे माता हिंगलाज देवीचे भक्त मोठ्या संख्येनं आले आहेत. बाडमेरमधील या मंदिरात होत असलेला चमत्कार बघण्यासाठी हे भाविक मोठ्या संख्येनं येतात. या मंदिरात पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील हिंगलाज शक्तीपीठातून आणलेली अखंड ज्योत आहे. (Social News)

पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील प्रसिद्ध हिंगलाज शक्तीपीठातून आणलेली ही अखंड ज्योत बारमेर येथील हिंगलाज माता मंदिरात त्याच भक्तीने तेवत आहे. त्यामुळेच या हिंगलाच माता मंदिराला छोटी हिंगलाज माता मंदिर म्हणूनही ओळखले जाते. जे भाविक मुळ हिंगलाज मंदिरात जाऊ शकत नाहीत, ते या मंदिरात जाऊन हिंगलाज मातेच्या चरणी नतमस्तक होतात. बारमेर शहरातील नरगासर येथे असलेल्या या माता हिंगलाज माता मंदिरात वर्षभर भाविक या अखंड ज्योतीचे दर्शन घेण्यासाठी येतात. अखंड ज्योतीचे दर्शन घेतल्यावर इच्छापूर्ती होते, असे भाविक सांगतात. नवरात्रमध्ये येथे येणा-या भाविकांची संख्या अधिक वाढते. (Hinglaj Mata Temple)

नवरात्रौत्सवात येथे मातेच्या शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या नऊ रुपांची पूजा केली जाते. या दिवसात येथे मोठा मेळा भरतो. हजारो देवीचे भक्त येथे मातेचा जयजयकार करत दाखल होतात. याच सर्व भक्तांनी एकत्र येऊन थार एक्सप्रेसने अखंड ज्योत मंदिरात आणली. त्यावेळी येथे मोठा उत्सव साजरा झाला होता. आता याच मंदिरामधील ही अखंड ज्योत बघण्यासाठी आणि हिंगलाज मातेला नमन करण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक येत आहेत. हिंगलाज माता मंदिर हे पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील हिंगलाज येथे हिंगोल नदीच्या काठावर असलेले हिंदू धर्मियांचे महत्त्वाचे मंदिर आहे. हे मंदिर देवी सतीला समर्पित असून देवीच्या 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. येथे देवीला हिंगलाज देवी किंवा हिंगुला देवी म्हणून देखील ओळखले जाते. नानी मंदिर म्हणून या मंदिराची ओळख आहे. (Social News)

============

हे देखील वाचा : Navratri : ‘या’ मंदिरात देवीला प्रसन्न करण्यासाठी चक्क दिल्या जातात शिव्या

==============

पाकिस्तानमधील हिंदू समाजासाठी हे मंदिर पूजनीय आहे, तसेच बलुचिस्तानधील अनेक मुस्लिम भाविकही या मंदिरात जाऊन मातेला वंदन करतात. या मंदिराची यात्रा ही सर्वात कठिण यात्रा मानली जाते. मंदिर कराची शहराच्या वायव्येस 250 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिरात जाण्यासाठी मकरान वाळवंटातील खारथर टेकड्यांची रांग पार करावी लागते. हिंगोल नदीच्या पश्चिम तीरावर हे जागृत स्थान आहे. हिंगलाज माता मंदिर एका नैसर्गिक गुहेत आहेत. येथे मातीची वेदी बांधली आहे. देवीची मानवनिर्मित प्रतिमा नाही. हिंगलाज मातेचे रुप म्हणून एका लहान खडकाची पूजा केली जाते. स्थानिक मुस्लिम देखील हिंगलाज मातेचा आदर करतात आणि मंदिराचे रक्षण करतात. या देवीला बीबी नानी म्हणतात. या मंदिरातही आता पाकिस्तानात रहाणारे हिंदू भाविक देवीचा उत्सव साजरा करीत आहेत. (Hinglaj Mata Temple)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.