सगळ्यांनाच हवाहवासा आणि आवडणारा पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळा सुरु झाला की, वातावरणात थंडावा निर्माण होतो. उन्हाच्या तडाख्यामुळे तापून, सुलाखून निघालेल्या धरित्री मातेला आणि मनुष्याला हा पाऊस ओलावा देत शांत करतो. पावसाळा कितीही आवडत असला आणि हवाहवासा वाटत असला तरी हा ऋतू सर्वात जास्त आजार आपल्यासोबत घेऊन येतो. पाऊसामुळे निसर्ग जरी आनंदाने न्हाऊन निघत असला तरी माणसाला मात्र हा पाऊस लहान-मोठ्या आजारांचे देणं देऊन जातो. (Monsoon Diet and Health Tips)
या पावसाळ्यात वातावरण आणि हवामान इतके झपाट्याने बदलत असते की, त्यामुळे सतत आजारपण येत असते. सर्दी, ताप, खोकला यासोबतच इतर अनेक मोठे आजार देखील हा पाऊस आपल्याला देण्याचे काम करतो. पावसाच्या पाण्याची डबकी साठल्याने डासांपासून होणारे आजार, वातावरण आणि हवा दमट झाल्यामुळे दमा, ओलसर कपडे घातल्यामुळे त्वचाविकार, दूषित पाण्यामुळे होणारे पोटाचे विकार, संधिवात आदी अनेक आजार पावसाळ्यात सर्रास होताना दिसतात. मग अशा या पावसाळ्यातील आजारांपासून आपण स्वतःला कसे जपले पाहिजे?, काय काळजी घेतली पाहिजे? हे आपण या लेखातून जाणून घेऊया.
- पावसाळ्यात आपली पचनशक्ती मंदावते आणि भूक कमी लागते. यामुळे अनेकदा पचनाशी संबंधित आजार बळावतात. त्यामुळे या काळात पचनास जड पदार्थ खाणे टाळावे. हलका, पौष्टिक आहार घेत. ताजे आणि गरम गरम अन्नच खावे. पावसाळ्यात मांसाहार, जास्त थंड पाणी आणि कोल्ड्रिंक घेणे टाळावे. शिवाय मसालेदार आणि बाहेरचे उघड्यावरचे अन्न खाणे देखील बंद करावे.
- हिरव्या पालेभाज्यांचे सेवन देखील पावसाळ्यात धोक्याचे ठरू शकते. कारण या ऋतूमध्ये पालेभाज्यांवर जीवाणू आणि सूक्ष्म जीव आढळतात. त्यामुळे संसर्गाचा धोका अनेक पटींनी वाढतो.
- पावसाळ्यात पाणी मोठ्या प्रमाणावर दूषित होत असते. यामुळे अशा दूषित पाण्यापासून होणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी पाणी पिताना काळजी घ्या. पावसाळ्यात आपण स्वच्छ आणि सुरक्षित पाणी प्या. घरचे आणि उकळून थंड केलेले पाणी यासाठी सर्वात सुरक्षित ठरेल.
हे देखील वाचा : कमिटमेंट फोबिया म्हणजे काय? कसे रहाल दूर
- पावसाळ्यात अनेकदा बऱ्याच लोकांना दुधामुळे अपचन होण्याचा त्रास होतो. अशावेळेस कॉटेज चीज, ताजे दही, ताक आदी पदार्थ आपण खाऊ शकतो. यामुळे पचन सुधारत निरोगी राहण्यास मदत होते.
- आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी फळं खाणे उत्तम पर्याय आहे. मात्र पावसाळ्यात कोणतेही किंवा बाजारात उपलब्ध असलेली सर्वच फळं खाणे आजारांना आमंत्रण देणे ठरू शकते. त्यामुळे पावसाळ्यात फळं खाताना नाशपाती, सफरचंद आणि डाळिंब यांसारख्या फळांचा समावेश करा.
- पावसाळ्यात घराजवळ पाणी साठणार नाही आणि डबके तयार होणार नाही याची काळजी घ्या. शिवाय घरात देखील भंगार, टाकी, वॉटर कूलर, फुलांच्या कुंड्या यामध्ये पाणी साठू न देता त्याचा वेळेवर निचरा करा. साठलेल्या पाण्यात डासांची पैदास जास्त लवकर होऊन हेच डास आपल्याला विविध आजार देण्याचे काम करतात. त्यामुळे घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि कोरडा ठेवण्याचा प्रयत्न करा.
हे देखील वाचा : सकाळ ते संध्याकाळपर्यंत या 4 हेल्दी सवयी अंगी बाळगा, आजारपणापासून रहाल दूर
- पावसाळ्यात पाऊस नसेल तेव्हा काहींना छत्री किंवा रेनकोट सोबत घेण्याचा कंटाळा येतो. मात्र असे न करता सतत आपल्यासोबत या गोष्टी ठेवा जेणेकरून पाऊस अचानक केव्हाही आला तरी तुम्ही भिजणार नाही. कारण जर तुम्ही पाऊसात ओले झालात तर तुम्हाला सर्दी, खोकला, फ्लू, ताप आदी आजार होण्याचा धोका वाढतो.
- याशिवाय घरात रोज संध्याकाळी कपूर, कडुलिंबाची कोरडी पानं, धूप आदी गोष्टी जाळून धूर केल्यास जंतुसंसर्गाचा धोका कमी होऊन अल्लाहदायक वातावरणाची निर्मिती होते.
हे देखील वाचा : मानसिक तणाव ‘ या ‘ आजारांचे ठरते कारण, असे राहा दूर