Home » आवळा नवमीचे आरोग्यदायी महत्त्व

आवळा नवमीचे आरोग्यदायी महत्त्व

by Team Gajawaja
0 comment
Amla Navami
Share

हिंदू सण आणि त्यातील आहार या सर्वांचा अभ्यास केला तर आरोग्यासाठी पूरक गोष्टींचा यात खुबीनं वापर केल्याचे आढळून येते.  तसेच काहीसे अक्षय नवमीचे आहे. अक्षय नवमी म्हणजेच आवळा नवमीची पूजा ही हिंदू धर्मामध्ये महत्त्वाची मानली जाते.  या दिवशीपासून आवळ्याचा आहारातही समावेश करण्यात येतो.  थंडीची चाहूल लागल्यावर आवळा बाजारात येतो.  आवळा हे बहुगुणी असे फळ आहे. (Amla Navami)

आवळ्याचा आहारात समावेश केल्यास कॉलेस्ट्रोल ते मधूमेह सारख्या अनेक आजारांवर मात करता येते.  तसेच शरीराला बळकटी देण्याचे कामही नियमित आवळ्याच्या सेवनानं होते.  याच आवळ्याच्या झाडाला आवळा नवमीनिमित्त पुजण्यात येते.  आवळ्याच्या झाडात विष्णुचा वास असतो, आणि त्याची पुजा केल्यावर कुटुंबावर भगवान विष्णुची कृपा राहते, असे मानण्यात येते.  याचदिवसापासून आवळ्याचा आहारात केल्यास त्याचा खूप फायदा होतो, असे सांगण्यात येते. (Amla Navami)

हिंदू धर्मग्रंथांमध्ये आवळा नवमीबाबत अनेक आख्यायिका सांगण्यात आल्या आहेत.  त्यामध्ये प्रामुख्यानं आवळ्याचे आहारातील महत्त्वही सांगण्यात आले आहे.  मात्र कोणतीही गोष्ट आहारात समाविष्ट करण्यापूर्वी, त्याची पूजा करण्याची प्रथा हिंदू धर्मात आहे. त्यामुळे यापासून शरीराला फायदा होतो, असे मानण्यात येते.  त्यामुळेच आवळा नवमीची पूजा ही आस्था आणि आयुर्वेद यांचा मेळ असल्याचे सांगितले जाते. 

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला आवळा नवमी म्हणतात. आवळा नवमीच्या दिवशी भगवान विष्णुचे भक्त उपवास करतात.  तसेच या दिवशी भल्या पहाटे उठून आवळ्याच्या झाडाची आणि भगवान विष्णूची पूजा करण्याची प्रथा आहे.  धार्मिक ग्रंथानुसार आवळा वृक्षात आवळा नवमीपासून भगवान विष्णूचा वास असतो. कार्तिक पौर्णिमेपर्यंत भगवान विष्णू या आवळ्याचा वृक्षात राहतात.   त्यामुळे या काळात  भगवान विष्णुची  उपासना केल्याने पुण्य प्राप्त होते. म्हणून आवळा नवमीला अक्षय नवमीही म्हटले जाते.  या काळात होणारी आवळ्याचा वृक्षाची पुजा, ही मनुष्याला चांगले आरोग्यही प्रदान करते, असे मानले जाते.  (Amla Navami)

धार्मिक मान्यतेनुसार या काळात आवळ्याच्या झाडावरून अमृताचे थेंब टपकतात, त्यामुळे या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसून अन्न खाण्याची परंपरा आहे, असे केल्याने आरोग्य चांगले राहते.  आजही ग्रामीण भागात, ही परंपरा मोठ्या उत्सहानं पार पाडली जाते. अशावेळी कामानिमित्त बाहेर गेलेले कुटुंब एकत्र येते. रात्रभर ही मंडळी आवळ्याच्या झाडाखाली राहतात.  झाडाची पुजा करुन त्याला नैवेद्य अपर्ण करतात. तिथेच अन्न प्राशन करतात.  पहाटेच्यावेळी आवळ्याच्या झाडातून पडणारे दवबिंदू हे औषधी असल्याचे मानण्यात येते.  त्यामुळे कुटुंबातील लहान मुलांनाही आवर्जून अशावेळी घेऊन जाण्यात येते.  

आवळा नवमीला भगवान विष्णूने कुष्मांड राक्षसाचा वध केला, म्हणून याला कुष्मांड नवमी म्हणतात.  यावेळी मंगळवार, 21 नोव्हेंबर रोजी पहाटे 03:16 वाजता ही आवळा नवमी सुरु झाली.  22 नोव्हेंबर रोजी पहाटे 01:09 वाजता समाप्त होईल.  धार्मिक मान्यतेनुसार द्वापर युगाची सुरुवात आवळा नवमीपासून झाली होती.  (Amla Navami)

याशिवाय आवळा नवमीला आणि त्यापासून पुढचे काही दिवस फक्त आवळा झाडाची पुजाच करण्यात येते असे नाही, तर या दिवशापासून आवळ्याच्या झाडाची लागवड करण्याचेही महत्त्व सांगितले आहे.  एकूण या सर्व पुजेतून मनुष्याचे आरोग्य कसे सुदृढ राहिल याचे महत्त्व सांगण्यात आले आहे.  

=========

हे देखील वाचा : सकाळी उठल्यानंतर भीती वाटण्यामागे असू शकते ‘हे’ कारण

=========

आवळा हे बहुगुणी असे फळ आहे.  हिवाळ्यात आवळा खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे होतात.  विशेषतः रिकाम्या पोटी आवळा खाल्यास त्याचा मोठा फायदा होतो आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.  त्याचा त्वचा आणि केसांनाही चांगला फायदा होतो.  याशिवाय आवळ्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, लोह, अँथोसायनिन, फ्लेव्होनॉइड्स आणि पोटॅशियम असतात.  या सर्व गोष्टी शरीरासाठी पोषक असतात.   आवळा रिकाम्या पोटी खाल्ल्याने शरीर चांगले डिटॉक्स होते. रोग प्रतिकारशक्ती वाढते.  आवळ्याचा ज्युस प्यायल्यानं वजनही नियंत्रणात रहाते.  आवळा हा त्वचेवरील सर्व डाग दूर करतो.  आवळ्याचा ज्युस नियमीत घेतल्यास पचनसंस्थेला चालना मिळते.  आतड्यांचे रोग दूर करण्यास याचा फायदा होतो.  शिवाय भूक लागतेही आणि अन्न पचण्याची ताकदही यामुळे वाढते.  यामुळेच आवळा नवमीला हिंदू शास्त्रामध्ये मोठे महत्त्व आहे.  आवळा नवमीपासून आवळ्याचा आहारात नियमीत समावेश केल्यास त्याचा मोठा फायदा मिळतो.  

सई बने  

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.