Health Care Tips : बायपोलर डिसऑर्डर ही एक गंभीर मानसिक आजार आहे, ज्यामध्ये व्यक्तीचे मूड, ऊर्जा पातळी आणि कार्यक्षमता यामध्ये तीव्र चढ-उतार होतात. या आजारात व्यक्ती कधी अति उत्साही (मॅनिया) अवस्थेत असते तर कधी तीव्र नैराश्य (डिप्रेशन) अनुभवते. या चक्राचा प्रभाव केवळ मानसिक नाही, तर शारीरिक आरोग्यावरसुद्धा होतो. विशेषतः वाढत्या वयात या आजाराच्या लक्षणांची तीव्रता वाढत जाते आणि रुग्णाला अधिक आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यामागे अनेक कारणे असतात – शरीरातील जैविक बदल, मानसिक ताणतणाव, शारीरिक व्याधी, औषधोपचारांवरील प्रतिक्रिया आणि सामाजिक एकाकीपणा हे महत्त्वाचे घटक ठरतात.
वय वाढल्यावर मेंदूतील न्यूरोकेमिकल्स, जसे की सेरोटोनिन, डोपामिन आणि नॉरएपिनेफ्रिन यांचे प्रमाण कमी होऊ लागते. हे रसायन मानसिक स्थिरतेसाठी अत्यंत आवश्यक असतात. यांची असंतुलित पातळी बायपोलर डिसऑर्डरची (Bipolar disorder) लक्षणे अधिक तीव्र करतात. शिवाय, वृद्धापकाळात झोपेचे चक्र बदलते, शरीराची सहनशक्ती कमी होते आणि हॉर्मोनल बदलही मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. या सगळ्याचा परिणाम म्हणजे मूड स्विंग्स अधिक तीव्र आणि अनियंत्रित होतात. विशेषतः मॅनिक फेसेसमध्ये निर्णयक्षमता कमी होते, अस्थिरता वाढते आणि रुग्ण चुकीची आर्थिक किंवा वैयक्तिक निर्णय घेऊ शकतो, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात गोंधळ निर्माण होतो.

Health Care Tips
वृद्ध वयात बायपोलर डिसऑर्डरच्या उपचारात औषधांवर अवलंबून राहावे लागते. परंतु याच वयात अनेक रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, संधिवात यासारख्या इतर शारीरिक आजारांची जोड मिळते. त्यामुळे औषधांचे परस्पर परिणाम (drug interactions) अधिक गंभीर ठरतात. त्यातून काही दुष्परिणाम होऊ शकतात, जसे की गोंधळलेपणा, विस्मरण, आळस किंवा हालचालींमध्ये अडथळा. या दुष्परिणामांमुळे अनेक वेळा औषधोपचारात बदल करावा लागतो, ज्यामुळे मूडमध्ये अस्थैर्य येऊ शकते. याशिवाय, काही वृद्ध रुग्ण औषधे नियमित घेण्यास विसरतात किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे आजार पुन्हा बळावतो.(Health Care Tips)
===========
हे ही वाचा :
डिमेंशियाची समस्या अनुवांशित असते का? घ्या जाणून
ओव्हर इटिंग केल्याने होऊ शकतात या गंभीर समस्या, अशी घ्या काळजी
============
मानसिकदृष्ट्या, वाढत्या वयात एकटेपणा, निवृत्तीनंतरचा रिकामपणा, जोडीदार किंवा जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूचा आघात यामुळे भावनिक अस्थैर्य वाढते. या भावना बायपोलर डिसऑर्डरच्या लक्षणांना आणखी गडद करतात. काही वेळा समाजातील कलंकामुळे वृद्ध व्यक्ती त्यांची अवस्था लपवू पाहतात आणि वेळेवर उपचार घेत नाहीत, ज्यामुळे त्रास वाढतो. योग्य सामाजिक आधाराची कमतरता आणि नातेसंबंधांतील दुरावा यामुळे आत्मभान, आत्ममूल्य यामध्ये घट होऊन नैराश्य वाढते.