दिवाळी आल्यावर काही गोष्टी पहिल्या नजरेसमोर येतात. फराळ, आकाशकंदिल, पणत्या आणि फटाके….अगदी पहिली अंघोळ झाल्यावर धूमधडाम असा मोठा आवाज करणारी फटाक्यांची माळ लावण्याचीही स्पर्धा लागते. मात्र गेल्या काही वर्षामध्ये फटाके लावले की वायू प्रदूषण वाढत आहे. दिल्लीमध्ये तर दिवाळीमध्ये वायू प्रदूषण सर्वाधिक वाढल्याचे लक्षात आले आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने 29 सप्टेंबर 2021 रोजी फटाके निर्मितीवर काही बंधने घातली. त्यानंतर फटाक्यांना पर्याय काय होऊ शकतो यावर शोध सुरु झाला. यातूनच ग्रीन फटाक्यांचा (Green Fireworks) शोध लागला. या ग्रीन फटाक्यांमध्ये वायू प्रदूषण वाढवणारी हानिकारक रसायने नसतात. यामध्ये अॅल्युमिनियम, बेरियम, पोटॅशियम नायट्रेट आणि कार्बनचा वापर केला जात नाही. हिरव्या फटाक्यांमध्ये (Green Fireworks) घातक रसायनांचे प्रमाण खूपच कमी असते. त्यामुळे या फटाक्यांचे प्रदूषण कमी होते. दरवर्षी दिवाळीनंतर दिल्लीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. हे पाहता गेल्या वर्षीपासून दिल्ली-एनसीआरमध्ये दिवाळीत ग्रीन फटाके वापरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण हे ग्रीन फटाके फार कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. अर्थात या ग्रीन फटाक्यांमुळे प्रदूषण होतच नाही असे नाही, मात्र यांचा वापर केल्यास 30 ते 35 टक्के प्रदूषण कमी होते. त्यामुळे वायु प्रदूषण रोखण्यासाठी ग्रीन फटाके हा कायमस्वरूपी उपाय नाही असे तज्ञ सांगतात.
बाजारात जे नेहमी फटाके दिवाळीमध्ये उपलब्ध होतात त्यापेक्षा ग्रीन फटाक्यांची (Green Fireworks) किंमत जास्त आहे. मात्र हे फाटके लावल्यावर प्रकाश कमी पसरतो. हे फटाके अगदी कमी म्हणजेच फक्त 5-10 टक्केच बाजारात उपलब्ध आहेत. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने हे ग्रीन फटाके विकसित केलेले आहेत. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (CSIR-NEERI) यांच्या समन्वयानं या फटाक्यांची निर्मिती करण्यात आली आहे. भारताच्या वायू प्रदूषणाच्या समस्येवर हा एक पर्यावरणपूरक उपाय असल्याचे मानले जाते. सध्या या ग्रीन फटाक्यांचे दोनच प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये फुलझारी आणि डाळिंबाचा समावेश आहे. फुलझारी साधारण 350-400 रुपयांना आणि डाळिंब 400-450 रुपयांपर्यंत किंमत आहे.
हे फटाके तामिळनाडूतील शिवकाशी येथे बनवले जात आहेत. मात्र कच्च्या मालाचा पुरवठा खूपच कमी असल्यामुळे त्यांच्या निर्मितीवरही परिणाम झाला आहे. तामिळनाडूशिवाय राजस्थानमध्येही ग्रीन फटाके (Green Fireworks) बनवले जात आहेत. येथील ग्रीन फटाक्यांनाही मोठी मागणी आहे. मात्र आवश्यक कच्चा माल नसल्यामुळे या फटाक्यांच्या निर्मितीवर बंधने येत आहेत.
ग्रीन फटाक्यांमुळे (Green Fireworks) पर्यावरणाची अजिबात हानी होत नाही, असे नाही. फक्त तीस टक्के प्रदूषण या फटाक्यांमुळे कमी होते. कारण ग्रीन फटाक्यांमध्ये बेरियम नायट्रेटचा वापर केला जात नाही. याशिवाय अॅल्युमिनियमचे प्रमाणही खूपच कमी ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये राखेचा वापर केलेला नाही. त्यामुळे हे फटाके फोडल्याने प्रदुषणाचे प्रमाण 30 ते 35 टक्क्यांनी कमी होईल असा दावा आहे. बाजारात नेहमी जे फटाके मिळतात त्यांचा आवाज 160 डेसिबल होतो. तर या ग्रिन फटाक्यांचा आवाज 110-125 इतक्या डेसिबल मध्ये मोजला गेला आहे. महत्त्वाचे म्हणजे या फटाक्यांना पेट्रोलियम अँड एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन (PESO), डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (DPIIT), वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने मान्यता दिली आहे. PESO ही स्फोटके, पेट्रोलियम सारख्या पदार्थांच्या सुरक्षिततेचे नियमन करणारी नोडल एजन्सी आहे. त्याचे मुख्य कार्यालय नागपूर मध्ये आहे.
=======
हे देखील वाचा : दिवाळीत घरी आवर्जून आणतो ‘ही’ वस्तू
======
दिवाळी आणि त्यानंतरही दिल्ली सोबत अन्यही प्रमुख शहरात हवेची गुणवत्ता खालावत चालली आहे. फटाक्यांच्या आवाजामुळे आणि त्यातून निर्माण होणा-या प्रदुषणामुळे जसा माणसाला त्रास होतो, तसाच प्राण्यांनाही होतो. वृद्ध आणि आजारी असलेल्यांना या फटाक्यांच्या धुराचा खूप त्रास होतो. विशेष करुन दम्याचा त्रास ज्यांना आहे, त्यांचे दुखणे दिवाळी आणि त्यानंतर काही दिवस वाढलेले असल्याचे दिसून आले आहे. यासर्वांवर उपाय शोधण्यात येत होता. त्यातूनच ही ग्रीन फटाके संकल्पना पुढे आली आहे. मात्र या ग्रीन फटक्यांच्या निर्मितीला अनेक बंधने असल्याचे स्पष्ट झाले आहे. या फटाक्यांची निर्मिती वाढली तर फटाखे निर्मितीमध्ये गुतलेल्या छोट्या छोट्या उद्योजकांवर मंदिचे संकट येणार आहे. तसेच त्यांच्याकडे काम करणारे कामगार बेरोजगार होणार आहेत. कारण हे ग्रीन फटाके (Green Fireworks) तयार करण्यासाठी मोठ्या युनिटला परवानगी देण्यात येणार आहे. भारतातील सुमारे 70% फटाके तामिळनाडूतील शिवकाशी येथे तयार होतात. या भागातील कामगारांवर बेरोजगारीची कु-हाड कोसणार आहे.
अर्थात ही ग्रीन फटाक्यांची संकल्पना लोकांमध्ये रुजण्यासही वेळ द्यावा लागणार आहे. यांची किंमतही इतर फटाक्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्यांना मागणी कमी आहे. पण हेच ग्रीन फटाके सक्तीचे केले तर इतर फटाक्यांवर मात्र ऐन दिवाळीत शांत बसण्याची वेळ येणार आहे.
सई बने