मुंबईमधली प्रसिद्ध ठिकाणं कोणती? या प्रश्नावर लगेच उत्तरं मिळतात. गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, गिरवाव चौपाटी, जुहू चौपाटी, मत्सालय, नेहरु तारांगण, राणीची बाग…अशी न संपणारी यादी चालू होते. देशाची आर्थिक राजधानी हा बहुमान लाभलेलं हे शहर देश-विदेशात प्रसिद्ध आहे. पण या शहरामध्ये जेवढी प्रसिद्ध ठिकाणं आहेत तेवढीच कुप्रसिद्ध ठिकाणंही आहेत. मुंबईत अशी काही भीतीदायक ठिकाणं आहेत जिथे भुतांचा वावर असल्याच्या गोष्टी सांगण्यात येतात. मायानगरीतल या भुतांच्या ठिकाणांबद्दल अगदी उघडपणे चर्चा होत असून या ठिकाणी रात्रीच काय पण दिवसा उजेडी जाण्यासाठीही मोठी हिम्मत लागते. अशाच ठिकाणांबद्दल (Haunted Places In Mumbai)
१. मुकेश मिल्स
मुंबईतल्या अशा भीतीदायक ठिकाणांमध्ये अगदी पहिल्या क्रमांकावर आहे ती मुकेश मिल्स. दक्षिण मुंबईतील कुलाबा येथील एन ए सावंत रोडवरील मुकेश मिल्सची स्थापना १८५२ मध्ये झाली. सुमारे 11 एकर जागेत ही गिरणी आहे. कपड्यांच्या या गिरणीला 1970 मध्ये अचानक शॉर्ट सर्किटने आग लागली. त्यात मुकेश मिल्स जळून पूर्णपणे खाक झाली.
काही वर्षांनी गिरणीची दुरुस्ती करण्यात आली आणि ती चालू होते न होते तोच तिला पुन्हा आग लागली. यात मिल्सपूर्णपणे जळली. या दुर्घटनेत अनेक कामगारांचा मृत्यू झाला. त्यापासून मुकेश मिल्सचे नुसते अवशेष राहिले. भर मुंबईमध्ये 11 एकर जागेत पसरलेल्या या गिरणीच्या जागेचा उपयोग मग शुटींगसाठी करण्यात येऊ लागला.
1984 पासून या जागेत शुटींग करण्यात येऊ लागले, खासकरून हॉन्टेड चित्रपटांचे! कारण अशा चित्रपटांसाठी ही मुकेश मिल्स उत्तम लोकेशन होतं. पण तेव्हापासूनच या मिल्सच्या जागेत कुणीतरी आहे. याची जाणीव होऊ लागली. दिग्दर्शक रेन्सिल डिसिल्वा यांनाही या जागेत शुटींग करताना विचित्र अनुभव आले. दस्तुरखुद्द अमिताभ बच्चनलाही या जागेत काहीसा विचित्र अनुभव आल्याचे सांगितले जाते.
अमिताभ बच्चन यांचे गाजलेले गाणे जुम्मा..चुम्मा…दे हे प्रथम याच मुकेश मिल्समध्ये चित्रित होणार होते. पण अमिताभ बच्चन यांना या जागेत काहीसे विचित्र अनुभव आल्याने हे चित्रीकरण अन्यत्र करण्यात आले. 2015 मध्ये बदलापूर चित्रपटाचे काही चित्रीकरण मुकेश मिल्समध्ये झाले होते. चित्रीकरणादरम्यान अभिनेत्री यामी गौतमी घाबरली, तसंच टिममधील एका मुलीची तब्बेत बिघडली आणि ती मुलाच्या आवाजात बोलू लागली अशा चर्चा तेव्हा रंगल्या होत्या. (Haunted Places In Mumbai)
अभिनेत्री बिपाशा बसू आणि इमरान खान यांच्याही एका चित्रपटाचे चित्रीकरण मुकेश मिल्समध्ये झाले होते. या दोघांनीही येथून लवकरच पॅकअप केल्याचे वृत्त आले. मुकेश मिल्सला लागूनच असलेला समुद्र किनारा आणि मुकेश मिल्सचे जळलेले भग्नावषेश यामुळे या भागाला अधिकच भीतीदायक स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळेच इथे चित्रीकरण शक्यतो दिवसा उजेडी होतात. सायंकाळी मुकेश मिल्स परिसरात भयाण शांतता असते.
२. आरे कॉलनी
सध्या मेट्रो ट्रेनच्या शेडमुळे आरे कॉलनीचे नाव गाजत असले तरी या परिसराबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. स्थानिक शक्यतो या भागात रात्री प्रवास करण्याचे टाळतात. एकतर आरे कॉलनीला लागूनच असलेल्या जंगलामधून अनेक हिंस्त्र प्राणी रात्री येथे येतात. शिवाय काही स्थानिक या भागात रात्री एक महिला लिफ्ट मागत फिरत असल्याचे सांगतात. त्यामुळे मुंबईतल्या भीतीदायक ठिकाणांमध्ये आरे कॉलनीचाही समावेश होतो. (Haunted Places In Mumbai)
३. एशियाटीक लायब्ररी
मुंबईतील एशियाटीक लायब्ररी म्हणजे भारतातील सर्वात मोठ्या ग्रंथालयापैकी एक आहे. ही लायब्ररी बघण्यासाठी अनेक देशी-विदेशी पर्यटक येतात. मात्र या लायब्ररीबाबतही अनेक गोष्टी सांगण्यात येतात. या ब्रिटीशकालीन लायब्ररीमध्ये आजही काही इंग्रजांचे आत्मे असून लायब्ररीच्या शांततेत त्यांचा भास होत असल्याचं काहीजण सांगतात.
=====
हे देखील वाचा – ‘Haunted’ मानला जातो सुरतचा ‘हा’ बीच, विकिपीडियावरही केला गेलाय भयावह उल्लेख!
=====
४. ताज हॉटेल
मुंबईतील ताज हॉटेल तर पर्यटकांचे सर्वात आवडते ठिकाण आहे. ताज हॉटेलमध्ये जाता आले नाही तरी त्याच्या बाहेर उभे राहून फोटो काढणारे अनेक पर्यटक आहेत. याच ताज हॉटेलबाबातही काही भीतीदायक गोष्टी सांगण्यात येतात. या दंतकथामध्ये हॉटेलच्या वास्तुविशारदांच्या कथेचा समावेश आहे. हे हॉटेल फ्रेंच वास्तुविशारद श्री. चेंबर्स यांनी डिझाइन केले होते. पण इंग्लंडहून इथे आल्यावर त्यांच्या रचनेनुसार हॉटेल तयार झालेलं नसल्याचं त्यांनी पाहिलं. त्यामुळे निराश होऊन त्यांनी हॉटेलच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून जीव दिला. या घटनेनंतर चेंबर्स यांचे भूत दिसल्याच्या वावड्या उठल्या होत्या. (Haunted Places In Mumbai)
५. टॉवर ऑफ सायलेन्स
सर्वात अधिक भीतीदायक जागा म्हणून उल्लेख होतो तो ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ म्हणजेच पारशी लोकांच्या स्मशानभूमीचा. मुंबईतील मलबार टेकडीवर स्थित ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ हे मुंबईचा सर्वात पॉश असाच भाग आहे. याच भागात घनदाट झाडीमध्ये साधारण १०० व्या शतकात हे ठिकाण बांधल्याचे सांगितले जाते. टॉवर ऑफ सायलेन्सला फक्त एक लोखंडी गेट आहे. मुंबईतील स्थानिक लोकांमध्ये या ठिकाणाविषयी अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत. रात्रीच्या वेळी येथून मोठ्याने ओरडण्याचे आणि रडण्याचे आवाज येत असल्याचे लोक सांगतात. (Haunted Places In Mumbai)
याशिवाय संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, माहीम येथील कनोसा प्राथमिक शाळेजवळ असलेली डिसूझा चाळ यांचाही उल्लेख मुंबईतील भीतीदायक ठिकाणांमध्ये केला जातो.
– सई बने