Home » रोगांपासून मुक्त करणारी शिमल्याची हटेश्वरी माता

रोगांपासून मुक्त करणारी शिमल्याची हटेश्वरी माता

by Team Gajawaja
0 comment
Hateshwari Temple
Share

हिमाचल प्रदेशातील बहुतेक प्राचीन मंदिरे महाभारत काळात बांधली गेली आहेत आणि या प्रत्येक मंदिरामागे एक कथा आहे. या मंदिरांमध्ये प्रमुख मंदिर म्हणून माता हटेश्वरी देवीच्या मंदिराकडे (Hateshwari Temple) बघितले जाते. या मंदिराला हातकोटी मात मंदिर असेही म्हटले जाते. माता हटेश्वरीचे मूळ स्थान डोंगरातील घनदाट जंगलाच्या मधोमध असलेल्या खरसाळी नावाच्या ठिकाणी आहे. या मंदिराला नुकतीच अभिनेत्री प्रिती झिंटा हिनं भेट देऊन माता हटेश्वरीची पूजा केली. प्रिती झिंटा हिचे मुळ गाव शिमल्याला आहे. त्यामुळे आपल्या गावातील देवीची पूजा करण्यासाठी प्रिती अमेरिकेहून शिमल्याला दाखल झाली होती. प्रितीनं भेट दिलेल्या या मंदिराबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता आहे.  हटेश्वरी माता ही रोग मुक्ती देवी म्हणूनही ओळखली जाते. मातेच्या दरबारात हजेरी लावल्यास निरोगी आरोग्य मिळते अशी स्थानिकांची भावना आहे.  पांडवांचे वास्तवही या मंदिराच्या परिसरात होते, त्यामुळे मंदिराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.  

माता हटेश्वरी मंदिर (Hateshwari Temple) शिमला येथे आहे. देवभूमी म्हणून गौरवलेल्या हिमाचल प्रदेशात अनेक मंदिरे आहेत. त्यातील शिमला जिल्ह्यातील रोहडू भागात असलेले माता हटेश्वरी मंदिर (Hateshwari Temple) शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते. हे मंदिर शिमल्यापासून सुमारे 100 किमी अंतरावर आणि पब्बर नदीच्या उजव्या तीरावर वसलेले आहे. 800 वर्षी जुने असलेल्या या मंदिरात भक्तांची कायम गर्दी असते. कारण हटेश्वरी माता सर्व दु:ख नष्ट करणारी माता आहे, अशी भावना आहे. त्यामुळे आरोग्याचे वरदान मागण्यासाठी स्थानिक येथे गर्दी करतातच पण या शक्तिपीठाला भेट देण्यासाठी अन्य राज्यातूनही भाविक नित्यनेमानं येतात. हे मंदिर अत्यंत प्राचीन असून सुमारे 800 वर्षापूर्वी बांधल्याचे सांगण्यात येते.  मंदिराला लागून, एकेकाळी सनपूरच्या टेकडीवर विराट नगरी नावाचे एक मोठे शहर होते. याच विराट राजाच्या दरबारात  पांडवांनी गुप्त रुपानं निवास केल्याचे सांगण्यात येते.  

त्यामुळेच या स्थानाला मोठे महत्त्व आहे. या हटेश्वरी मातेच्या मंदिरात (Hateshwari Temple) प्राचिन कलाकुसरीचे अत्यंत चांगले नमुने पाहायला मिळतात. हे मंदिरही रमणीय स्थानावर बांधण्यात आलं आहे. मंदिर सोनपुरी टेकडीवर विष्कुलती, रैनाळा आणि पब्बर नद्यांच्या संगमावर आहे. मुळात हटेश्वरी माता मंदिर शिखरकर नगर शैलीत बांधले गेले होते. मात्र त्याची पडझड झाल्यावर या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. त्यात हे मंदिर पहाडी शैलीत बांधण्यात आले. मंदिराच्या नैऋत्य दिशेला शिखर शैलीची चार छोटी मंदिरे आहेत. ही मंदिरे मुख्य अर्धनारीश्‍वरी मंदिराचा भाग मानली जातात. माता हटेश्वरी मंदिरातील (Hateshwari Temple) गर्भगृहात मातेची महिषासुर मर्दिनीच्या रुपात मुर्ती आहे. ही मुर्ती प्रंचंड मोठी असून अवघ्या हिमाचलप्रदेशमध्ये अशी मोठी मुर्ती नाही. या मुर्तीबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. अनेक वर्षापूर्वी ब्राह्मण कुटुंबात दोन सख्ख्या बहिणी होत्या. त्यांनी लहान वयातच संन्यास घेतला आणि भ्रमणासाठी घर सोडले. गावोगावी जाऊन त्या लोकांच्या समस्या जाणून त्या सोडवण्याचा प्रयत्न करायच्या. यातील एक बहिण हातकोटी गावात पोहोचली. तिने येथे एका शेतात बसून दिव्य तप केले.  हे तप करतांना ही मुलगी अदृश्य झाली आणि तिच्या जागी देवीची अत्यंत सुंदर मुर्ती तयार झाली. या अलौकिक चमत्काराची माहिती तत्कालीन जुब्बल राज्याच्या राजाला मिळाली.  राजा या स्थानापर्यंत पायी चालत आला.  त्यानं या पुतळ्याला सोन्याचा मुलामा देण्याचा प्रयत्न केला.  खोदकाम केल्यावर देवीच्या पायाशी दुधानं भरलेला कलश मिळाला.  तेव्हा राजानं या स्थानी मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. गावाच्या नावाने देवीला हटेश्वरी माता मंदिर असे नाव पडले.  

========

हे देखील वाचा : भगवान शंकराचे ‘हे’ अनोखे समुद्री मंदिर…

========

मंदिरातील पुजारीच गर्भगृहात जाऊन मातेची पूजा करू शकतात. या मंदिराबाबत आणखी एक आख्यायिका आहे. ती म्हणजे मोठ्या तांब्याच्या कलशाची.  मंदिराच्या बाहेर, प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला लोखंडी साखळीने बांधलेला तांब्याचा कलश आहे. त्याला स्थानिक भाषेत चारू म्हणतात. चारूच्या गळ्यात लोखंडी साखळी बांधलेली आहे. पावसाळ्यात जेव्हा पब्बर नदीला पूर येतो, तेव्हा हा चारु त्या पुरात जाण्याच प्रयत्न करतो, असे स्थानिक सांगतात. त्यामुळे त्या कलशाला लोखंडी साखळीनं बांधण्यात आले आहे. हा चारु, अर्थात कलश पुराच्या पाण्यात वाहून गेला तर गावावर मोठे संकट येणार असल्याचे मानले जाते.  

दरवर्षी नवरात्रोत्सवानिमित्त दोनवेळा हटेश्वरी माता मंदिरात मोठी जत्रा होते. यावेळी हजारो भाविक माता हटेश्वरी मंदिराला (Hateshwari Temple) भेट देतात. मंदिरापासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेल्या खारा पाथर येथे पर्यटकांसाठी हिमाचल प्रदेश टुरिझमने बांधलेले हॉटेल आहे.  या मंदिरात वर्षातील बाराही महिने भाविकांची गर्दी असते.

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.