जपानच्या समुद्रात, पाण्याच्या मधोमध एक असं बेट आहे, जे लांबून पाहिलं तर एखाद्या युद्धनौकेसारखं दिसतं. पण खरं तर हे एक छोटंसं शहर आहे, जे आज पूर्णपणे सुनसान आहे. या बेटाचं नाव आहे हाशिमा आयलंड त्याला बॅटलशिप आयलंड पण म्हणतात कारण ते युद्ध नौकेसारखं दिसतं. जपानच्या नागासाकीपासून फक्त १५ किलोमीटर अंतरावर आहे. हे बेट फक्त ११ एकरचं आहे १९५९ साली इथली लोकसंख्या ५,२०० होती. एकरात ५,२०० माणसं, म्हणजे एका एकरात ३३५ माणसं! आजच्या काळात चायनाची पॉप्युलेशन डेन्सिटी आहे ८४ माणसं प्रति एकर. पण हाशिमाचं रेकॉर्ड आजही कोणीच मोडू शकलं नाही. हे बेट जगातलं सगळ्यात जास्त लोकसंख्येचं ठिकाण होतं.
पण असं काय झालं, की हे बेट आज एक घोस्ट टाउन बनलंय? इथल्या इमारती पूर्णपणे निर्जन आणि सुनसान आहेत. आता इथे फक्त भयाण शांतता आहे. इथल्या शाळांमधून मुलांचा आवाज गायब झालाय, हॉस्पिटल्स रिकामी पडलीत, थिएटरमध्ये धूळ साचलीय. असं वाटतं, की सगळी माणसं रातोरात आपलं सगळं सामान, आयुष्य तसंच सोडून इथून निघून गेली. पण का? काय झालं होतं इथं? आणि का जपाननं तब्बल ३५ वर्षं या बेटावर टुरिस्टांना यायला बंदी का घातली होती? चला, ही कहाणी जाणून घेऊ. (Hashima Island)
ही गोष्ट सुरू होते १८०० सालापासून तेव्हा टाकाशिमा या बेटावर लोकांना जमिनीवर कोळसा सापडायचा. सुरुवातीला त्यांना याचं महत्त्व माहीत नव्हतं, पण नंतर गहि नावाच्या एका माणसाला चुकून याच्या उष्णता निर्माण करण्याच्या गुणधर्माचा शोध लागला. त्या दिवसापासून टाकाशिमा बेटावरील लोकांनी जमिनीवर विखुरलेला कोळसा गोळा करायला सुरुवात केली, ज्याने ते आपली घरं गरम ठेवायचे. हळूहळू १८५० पर्यंत नागासाकी एक आंतरराष्ट्रीय शिपिंग पोर्ट बनलं. अमेरिका, चायना, ग्रेट ब्रिटनच्या जहाजांना कोळशाची गरज होती, कारण त्यांची स्टीम इंजिन्स कोळशावर चालायची. आणि हा कोळसा? हा कोळसा टाकाशिमा आणि आजूबाजूच्या बेटांवर बऱ्याच प्रमाणात सापडायचा. पण जेव्हा कोळशाची डिमांड वाढली, आणि पाहता पाहता टाकाशिमाच्या पृष्ठभागावरील कोळसा संपला, तेव्हा त्यांनी आसपासच्या बेटांचा शोध घेतला, ज्यामध्ये हाशिमा बेट आलं. (Top Stories)
१९व्या शतकात मित्सुबिशी कंपनीनं हाशिमावर प्रॉपर कोळसा खाण सुरू केली. त्यांनी वर्कर्ससाठी काँक्रीटच्या इमारती बांधल्या, समुद्राच्या लाटांपासून बेटाला वाचवण्यासाठी भक्कम सी-वॉल उभारली. याच सी-वॉलमुळे हाशिमाला बॅटलशिपसारखं लूक मिळाला. १९१६ साली इथं ३,००० वर्कर्स राहायचे, जे दरवर्षी १५० टन कोळसा खणायचे. १९५९ पर्यंत हे प्रॉडक्शन ४,१०,००० टनांवर गेलं. पण हे बेट छोटं होतं, त्यामुळे इथं राहायची जागा कमी पडायची. मग मित्सुबिशीनं उंच काँक्रीटच्या इमारती बांधल्या, ज्या आजही तशाच उभ्या आहेत, पण आता त्या खंगाळलेल्या अवस्थेत.(Hashima Island)
पण इथलं आयुष्य सोपं नव्हतं. खाणीत काम करणं म्हणजे जीव धोक्यात घालणं. तापमान ३५ डिग्री सेल्सियस, ह्युमिडिटी ९५%, आणि धोकादायक परिस्थिती. अनेक वर्कर्सचा यात मृत्यू झाला. इतकंच नाही, दुसऱ्या महायुद्धापूर्वी आणि दरम्यान चायनीज आणि कोरियन कैद्यांना इथं जबरदस्तीनं कामाला लावलं जायचं. याच कारणामुळे आजही जगभर जपानवर टीका केली जाते. मग दुसऱ्या महायुद्धंनंतर स्वत:ची इमेज सुधारण्यासाठी मित्सुबिशीनं वर्कर्ससाठी शाळा, हॉस्पिटल, सिनेमागृह, जिम्नॅशियम्स बांधली. या सर्व सुविधा कामगारांसाठी मोफत ठेवल्या गेल्या, पण त्या बदल्यात कामगारांना बेटाच्या देखभालीसाठी मेहनत घ्यावी लागायची. पिण्याचं पाणी मेनलँड जपानवरून यायचं, आणि नंतर समुद्रातून पाइपलाइन्स टाकल्या गेल्या. कोळशामुळे हे निर्जन बेट जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशामध्ये बदललं होतं.(Top Stories)
पण मग १९६० नंतर सगळं बदललं त्याकाळी कोळशाची जागा पेट्रोलनं घ्यायला सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाची मागणी कमी झाली. हाशिमा बेट समुद्रात एकटं होतं, त्याला सुनामी आणि समुद्री वादळांचा धोका होता. सी-वॉल तुटायची, त्याच्या दुरुस्तीवर खर्च व्हायचा. हळूहळू हाशिमा प्रॉफिटेबल राहिलं नाही. १९७० साली मित्सुबिशीनं २,००० वर्कर्सना काढलं किंवा दुसऱ्या ठिकाणी हलवलं. आणि शेवटी, १५ जानेवारी १९७४ रोजी मित्सुबिशीनं हाशिमाची कोळसा खाण कायमची बंद केली.(Hashima Island)
===============
हे देखील वाचा : Japan’s Earthquake : जपानच्या शक्तिशाली भूकंपानंतर 18 देशांना त्सुनामीचा धोका !
===============
रातोरात हजारो वर्कर्स आणि त्यांची कुटुंबं बेट सोडून निघून गेले. इथे असलेले घरं, शाळा, हॉस्पिटल, थिएटर सगळं तसंच राहिलं. जणू काही वेळ थांबली. सामान, कपडे, मुलांचे खेळणी, सगळं तसंच पडलंय. पण माणसं? ती सगळी गायब झाली. जपाननं तब्बल ३५ वर्षं या बेटावर टुरिस्टांना यायला बंदी घातली. काहींचं म्हणणं होतं, की जपानला इथल्या जबरदस्तीच्या कामगार कॅम्प्सचं सत्य लपवायचं होतं. पण जपानचं म्हणणं होतं, की चोरी आणि धोकादायक परिस्थितीमुळे ही बंदी आहे.
२००९ साली जपाननं हे बेट टुरिस्टांसाठी उघडलं, पण फक्त काही भागच. इथल्या इमारती धोकादायक झाल्या, वादळामुळे काही पडल्या, काही पडायच्या मार्गावर आहेत. तरीही, हे बेट फिल्ममेकर्सना भुरळ घालतं. २००९ च्या लाइफ आफ्टर पीपल सिरीज आणि २०११ च्या जेम्स बाँडच्या स्कायफॉल मूव्हीचं शूटिंग इथं झालं. जपाननं हाशिमाला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून नॉमिनेट केलं, पण साउथ कोरिया आणि चायनानं त्याला विरोध केला, कारण इथल्या कामगारांवर केलेल्या अन्यायाच्या इतिहासामुळे. शेवटी, जपाननं १९४०च्या फोर्स्ड लेबरची कबुली दिली, आणि हाशिमाला हेरिटेज साइटचा दर्जा मिळाला. (Hashima Island)
आज हाशिमा आयलंड एक भयाण घोस्ट टाउन आहे. इथल्या रस्त्यांवर फक्त वाऱ्याचा आवाज आहे, आणि काँक्रीटच्या भिंतींवर इतिहासाच्या खुणा आहेत. ही कहाणी तुम्हाला कशी वाटली? कमेंटमध्ये सांगा.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics