लोकसभा निवडणुकीतील धक्क्यानंतर पार पडलेल्या पहिल्या राजकीय कसोटीत भारतीय जनता पक्ष उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. जम्मू-काश्मिर या जिव्हाळ्याच्या राज्यात त्याने दमदार प्रदर्शन केले आहे. दिल्लीला लागून असलेल्या हरियाणामध्ये भाजपने दणदणीत विजय मिळविला आहे. सर्व सर्वेक्षणांना खोटे ठरवत भाजपने तेथे तिसऱ्यांदा सत्ता हस्तगत केली आहे. हरियाणात सत्तेची हॅट्रिक केल्यानंतर महाराष्ट्रात त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपचे मनोधैर्य आता नक्कीच वाढले असणार.
“तुम्ही एवढे बचावात्मक का आहात? पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आला आहे, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. ही खूप मोठी उपलब्धी आहे. कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त लोकांना मतदान करण्यावर भर द्यावा, इतकंच. फक्त जनतेपर्यंत पोहोचा आणि त्यांना मत देण्यासाठी प्रेरित करा”, असे गेल्याच महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना सांगितले होते. त्याची प्रचिती हरियाणात आली आहे.
महाराष्ट्रातील परीक्षा तर हरियाणापेक्षा कितीतरी मोठी आणि महत्त्वाची. राजकारणात ज्याला डॉमिनो इफेक्ट म्हणतात, ती प्रक्रिया घडेल अशी भाजपला आशा आहे. अनेक पत्ते किंवा ठोकळे एका पाठोपाठ ठेवून त्यांना मागच्या बाजूने पाडणे, याला डॉमिनो इफेक्ट म्हणतात. यातील एकही पत्ता किंवा ठोकळा पडला की त्याच्या आघाताने बाकीचे अन्य पत्ते किंवा ठोकळे पडतात. असेच काहीसे हरियाणाच्या पाठोपाठ महाराष्ट्रात होईल आणि तिथल्या यशामुळे इथेही यश मिळेल, असे भाजपला वाटणे स्वाभाविक आहे.
अवघ्या चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत हरियाणात काँग्रेसला 10 पैकी 4 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसची मंडळी खुशीची गाजरे खात होती. आपण जवळपास सत्तेत आलो आहोत, असाच त्यांचा आविर्भाव होता. हरियाणाच्या निकालांनी त्यांचा तो भ्रम दूर केला आहे. महाराष्ट्रात काँग्रेस जिचा एक भाग आहे त्या महाविकास आघाडीने लोकसभेच्या 48 पैकी 30 जागा जिंकल्या. त्यातही काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे 14 जागा मिळाल्या. त्यामुळे महाविकास आघाडीची अवस्था काही वेगळी नव्हती. शरद पवार यांचा अपवाद वगळला तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे सत्तेच्या स्वप्नात रंगले होते. त्यांनाही जबरदस्त फटका बसला आहे.
एकीकडे महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या वाटाघाटींमध्ये काँग्रेसला काहीसे नमते घ्यावे लागेल, तर एकूणच आघाडीला आपल्या प्रचाराची दिशा बदलावी लागेल. निव्वळ अँटी इनकम्बन्सीच्या जोरावर निवडणूक जिंकता येत नाही, हे हरियाणाने दाखवून दिले आहे. त्यामुळे जागा वाटपात आपल्याकडे जास्त जागा मागताना काँग्रेसचा पाया ठिसूळ झालेला असेल. दुसरीकडे महायुतीत भाजपला आणखी बळ येईल. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना कमी जागा घेण्यासाठी भाजप ठासून युक्तिवाद करू शकतो.
या निकालामुळे आणखी एक परिणाम होऊ शकतो. तो म्हणजे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा अच्छे दिन येऊ शकतात. हरियाणात भाजपच सत्ता राखणार हे मंगळवारी संध्याकाळपर्यंत स्पष्ट झाले तेव्हा मुंबईत भाजपच्या नेत्यांनी विजयाची सभा घेतली. त्यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी केलेल्या खोट्या प्रचाराचा भाजपला फटका बसला. अशा खोट्या प्रचाराला तशाच पद्धतीने उत्तर देण्याचा निर्णय पक्षाने घेतला होता. हरियाणामध्ये अग्नीवीर योजनेविरोधात अपप्रचार झाला. खेळाडूंना पुढे करून रान पेटविण्यात आले. वेगवेगळया समाज घटकांत फूट पाडण्याचे कारस्थान रचले गेले. मतदारांनी हा खोटा प्रचार नाकारत मागील निवडणुकीपेक्षा भाजपला मोठे यश मिळवून दिले. विरोधी पक्षनेते झालेल्या राहुल गांधींना हरियाणाच्या जनतेने पहिली सलामी दिली असून दुसरी सलामी महाराष्ट्रात मिळेल.”
याच वेळेस बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जे म्हणाले ते अधिक महत्त्वाचे आहे. ते म्हणाले, “हरियाणानंतर विजयाची घोडदौड सुरूच राहील. महाराष्ट्रात आम्ही मोठा विजय मिळवू. महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हरियाणा सारखाच विजय मिळविण्याचा निर्धार केला पाहिजे.”
हे खरे आहे. देवेंद्र फडणवीस हे सध्या महाराष्ट्र भाजपमधील सर्वात मोठे नेते आहेत, यात दुमत नाही. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या प्रचाराची धुरा त्यांनाच सांभाळावी लागेल, हेही स्पष्ट आहे. परंतु हरियाणाच्या निवडणुकीतून भाजपने जो धडा घेतला त्यातून फडणवीस यांना नेतृत्वाची अधिक संधी मिळेल हे प्रकर्षाने दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जे विश्लेषण आले त्यामध्ये एक महत्त्वाचा निष्कर्ष असा होता, की यंदाच्या निवडणुकीत कुठलाही एक राष्ट्रीय मुद्दा महत्त्वाचा नव्हता. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या समस्या आणि मुद्दे होते, त्यावरच मतदारांनी मतदान केले. त्यामुळेच राष्ट्रीय पातळीवर अद्यापही आपली लोकप्रियता टिकून ठेवलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचा भाजपला ठिकठिकाणी हवा तेवढा फायदा झाला नाही.
या निष्कर्षाकडे बाकी कोणी लक्ष दिले असो अथवा नसो, परंतु भाजपच्या धुरीणांनी त्याकडे लक्ष दिले हे या निवडणुकांनी दाखवून दिले. कारण यावेळी नरेंद्र मोदींनी हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत फारसा प्रचार केला नाही. तिथे गेल्या म्हणजे 2019 मधील निवडणुकीत मोदी यांनी 10 सभा घेतल्या होत्या. यंदा ही संख्या चक्क केवळ चार एवढी खाली आली. त्या ऐवजी भाजपने मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांच्या नेतृत्वाखाली प्रचार चालविला. त्यात राज्यव्यापी किंवा राष्ट्रव्यापी मुद्द्यांऐवजी अगदी छोट्या छोट्या पातळीवरच्या मुद्द्यांना स्थान देण्यात आले. त्याचा लाभ भाजपला झाला.
हीच रणनीती आणखी पुढे नेऊन विविध राज्यांतील स्थानिक नेत्यांना आणखी मोकळीक देण्याची खेळी भाजप खेळू शकतो. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे तर फडणवीस यांना अधिक वाव देण्यात येईल, असा त्याचा अर्थ होतो. गेल्या काही वर्षांमध्ये फडणवीस यांचे स्वातंत्र्य कमी करून त्यांच्यावर दिल्लीचा वचक ठेवण्यात आला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात नेहमी केली जाते. त्यांना बळजबरीने उपमुख्यमंत्री करणे, हेही त्याचाच एक भाग. अगदी लोकसभा निवडणुकीतही फडणवीस यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करत उमेदवारी तिकिटांचे वाटप करण्यात आले, असे बोलल्या गेले. त्यामुळे महाराष्ट्र भाजपचा कारभार दिल्लीतून चालतो की काय, असेही प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले.
======
हे देखील वाचा : जीवनास कलाटणी देणारे महात्मा गांधींचे अमूल्य विचार
======
फडणवीस यांना थोडेसे आणखी स्वातंत्र्य दिले, तर या समस्या येणार नाहीत. सैनी यांच्याप्रमाणेच फडणवीस हेसुद्धा अगदी स्थानिक पातळीवर रणनीती आखून विरोधकांना बेजार करू शकतात. अगदी तालुका पातळीवरच्या नेत्यांची शक्तिस्थाने तसेच कमकुवत बाजू त्यांना माहीत आहेत. खोट्या प्रचाराचा जो मुद्दा त्यांनी हरियाणाच्या निकालानंतर उपस्थित केला तोच मुद्दा महाराष्ट्रातही लागू आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर फडणवीस यांनी वारंवार त्याची वाचता केली आहे. त्यामुळे त्याचा मुकाबला करण्याचीही काही एक रणनीती फडणवीस यांनी तयार केली आहे. ती ते प्रचारात वापरू शकतात. लोकसभेच्या अपेक्षाभंगानंतर मरगळलेल्या भाजप कार्यकर्त्यांना पुन्हा चैतन्य देण्याचे काम फडणवीस यांच्याशिवाय अन्य कोणी करू शकणार नाही. ‘होय, आम्ही हे करू शकतो, आम्ही ते करू’ हा मंत्र संघटनेतील लोकांना तेच देऊ शकतात.
लोकसभेच्या निकालानंतर फडणवीस यांनी मांडलेला आणखी एक मुद्दा हरियाणातील निवडणुकीने अधोरेखित केला आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आणि महाराष्ट्र विकास आघाडीच्या मतांच्या टक्केवारीत फक्त 0.3% एवढे अंतर होते. आज हरियाणात विजयी झालेला भाजप आणि पराभूत झालेला काँग्रेस यांच्यामधील मतांचा फरकही 0.85% एवढा आहे. मतांमधील हे अंतर भरून काढण्याची भाषा फडणवीस हे सातत्याने करत आहेत. त्यासाठी संघ कार्यकर्त्यांची मदत भाजपला मिळणे अत्यावश्यक आहे. आजच्या घडीला संघाकडून ही मदत मिळविण्याची क्षमता फडणवीस यांच्यातच आहे.
म्हणूनच केंद्रीय नेतृत्वावर सर्व भिस्त न ठेवता स्थानिक नेत्यांना अधिक वाव देण्याचे धोरण भाजपने आखले, तर त्याचा सर्वाधिक फायदा फडणवीस यांनाच होणार आहे. हे धोरण भाजप अंगीकारतानाही दिसत आहे. सरतेशेवटी, याचा सगळ्याचा मथितार्थ हाच आहे, की हरियाणाच्या निकालामुळे भाजपला जोश आला आहे आणि त्यामुळे फडणवीस यांना पुन्हा अच्छे दिन येण्याची शक्यता आहे.