असे म्हणतात की, भारतीयांसाठी क्रिकेट हा खेळ नाही तर ती एक भावना आहे. आणि नक्कीच हे तंतोतंत खरे आहे. क्रिकेट ही सर्वच भारतीयांची अतिशय जवळची आणि भावुक अशी भावना आहे. याच क्रिकेटमध्ये आजपर्यंत अनेक दिग्गज क्रिकेटर होऊन गेले आहेत. प्रत्येक क्रिकेटरने त्यांचे वेगळेपण दाखवत आपली जागा भारतीय क्रिकेटमध्ये मजबूत केले. आजपर्यंतच्या क्रिकेटच्या इतिहासात अनेक यशस्वी फलंदाज होऊन गेले. यातलाच एक सिक्सर किंग असे बिरुद मिळवलेला युवराज सिंग सर्वांनाच माहित आहे.
आपल्या धडाकेबाज शैलीने युवीने खूप कमी काळात क्रिकेट जगतात आपले स्थान निर्माण केले. असा हा युवराज सिंग आज त्याचा ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. जगातील सर्वात स्फोटक फलंदाजांमध्ये युवराज सिंहचे नाव प्रकर्षाने घेतलेच जाते. युवराजने आपल्या कारकिर्दीत अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे. आजही त्याचे काही विक्रम अबाधित आहेत, ज्यांना मोडणे जवळपास अशक्य आहे. आज युवराज सिंहच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याची कारकीर्द जाणून घेऊया.
युवराज सिंगचा जन्म १२ डिसेंबर १९८१ रोजी झाला. तो मूळचा पंजाबमधील चंदीगडचा. युवराज सिंगने वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी पदार्पण केले. युवराज सिंगने भारताकडून ३०४ वनडे, ५८ टी-२० आंतरराष्ट्रीय आणि ४० कसोटी सामने खेळले आहेत. याशिवाय त्याने १३२ आयपीएल सामनेही खेळले आहेत. युवराज सिंहच्या नेतृत्वाखाली भारताने २००० मध्ये पहिल्यांदाच अंडर-१९ विश्वचषकावर नाव कोरले.
युवराजला त्याच्या वडिलांनी लहान वयातच क्रिकेटसाठी तयार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्याला अवघड प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. वयाच्या १३ व्या वर्षी त्याने पंजाब अंडर-१६ संघात आणि नंतर अंडर-१९ संघात प्रवेश करून आपली प्रतिभा दाखवली. १९९७ मध्ये युवराजने फर्स्ट क्लास क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक रेकॉर्ड बनवले.
वनडेत त्याने १४ शतके आणि ५२ अर्धशतकांसह ८७०१ धावा केल्या आहेत आणि १११ विकेट्सही घेतल्या आहेत. कसोटीत त्याने १९०० आणि ९ विकेट्स घेतल्या होत्या. तर टी-२० मध्ये त्याने ११७७ धावा केल्या आणि २८ विकेट्स घेतल्या. २००२ चॅम्पियन्स ट्रॉफी, २००७ टी-२० विश्वचषक आणि २०११ वनडे विश्वचषकाच्या विजेत्या संघाचाही तो भाग होता. युवराज सिंहनं आयपीएलमध्ये १३२ सामने खेळले आहेत. ज्यात त्याने २ हजार ७५० धावा केल्या आहेत.
टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. युवराज सिंगने टीम इंडियासाठी विविध प्रकारातील अनेक सामने खेळत स्वबळावर जिंकून दिले आहेत. २००७ साली झालेला पहिलाच टी-२० विश्वचषक आणि २०११ साली संपन्न झालेला एकदिवसीय विश्वचषक या दोन्ही विश्वचषकात त्याचे योगदान कधीच क्रिकेट चाहते विसरू शकणार नाही.
युवराज सिंग या डावखुऱ्या अष्टपैलू खेळाडूने दोन्ही स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आणि भारताला विजय सोपा करून दिला. मात्र असे असूनही युवराज सिंगला योग्य तो सन्मानजनक निरोप मिळाला नाही. २०१९ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
भारताने २००७ मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात पहिला टी-२० विश्वचषक जिंकला होता. भारताच्या विजयात स्टार फलंदाज युवराज सिंगने महत्वाची भूमिका बजावली. या स्पर्धेत युवराज सिंगने इंग्लंडविरुद्ध सामन्यात अवघ्या १२ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. याच सामन्यात युवराजने सहा चेंडूत सहा षटकार ठोकले आणि तो सिक्सर किंग झाला. स्टुअर्ट ब्रॉडच्या ओव्हरमध्ये युवराजने हे सिक्सर ठोकले.
युवराजच्या कारकिर्दीतील कठीण टप्पा २०११ च्या विश्वचषकानंतर एक कठीण टप्पाही आला. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर ते अशक्त झाले. उपचारासाठी तो अमेरिकेला गेला आणि दोन वर्षांनी बरा झाल्यानंतर तो संघात परतला. त्याने त्याच्या कारकिर्दीमध्ये अनेक चढउतार पाहिले. मात्र तो कठीण काळातही टिकून होता. त्याला त्याच्या चान्गल्या वाईट अशा प्रत्येक काळात आईने मोठी साथ दिली.
युवराजने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत बक्कळ पैसा कमावला आहे. तो अनेक प्रसिद्ध ब्रँड्सशी जोडला गेला आहे. युवराज सिंग हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. एका माहितीनुसार, युवराजची एकूण संपत्ती जवळपास २९१ कोटी रुपये आहे. त्यांची कमाई जाहिरात, मालमत्ता भाडे आणि गुंतवणुकीसह विविध स्त्रोतांमधून येते. युवराजने अनेक बड्या कंपन्यांमध्ये जाहिरातीत काम केले आहे.
रिपोर्ट्सनुसार, युवराज त्याच्या ब्रँड एंडोर्समेंटमधून दरमहा सुमारे १ कोटी रुपये कमावतो. रिअल इस्टेटमध्येही त्यांनी गुंतवणूक केली आहे. त्यांच्याकडे अनेक फिटनेस सेंटर आणि स्पोर्ट्स सेंटरही आहेत, ज्यातून ते मोठी कमाई करत आहेत.
युवराजकडे मुंबईतील दोन आलिशान अपार्टमेंटसह अनेक आलिशान मालमत्ता आहेत. वरळीतील लक्झरी रेसिडेन्शियल टॉवर ओंकारमध्ये दोन अपार्टमेंट खरेदी करण्यासाठी युवराज सिंगने २०१३ मध्ये ६४ कोटी रुपये खर्च केले होते. याशिवाय चंदीगडमध्ये युवराजची दोन मजली हवेली आहे. तर दुसरीकडे त्याचे गोव्यातही घर आहे, जे मोरजीच्या टेकडीवर असून, ते घर भाड्यानेही दिले जाते.
युवराज सिंगकडेही जबरदस्त कार कलेक्शन आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये बीएमडब्ल्यू एम 5 ई 60, बीएमडब्ल्यू एक्स 6 एम, ऑडी क्यू 5, लोम्बिरिगानी मर्सिएलागो, बेंटले कॉन्टिनेंटल जीटी यांचा समावेश आहे. युवराज सिंगने अभिनेत्री हेजल किचसोबत लग्न केले असून तो एक मुलगी आणि एक मुलगा यांचा बाबा देखील आहे.