महाभारतात कुरुक्षेत्रावर भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला भगवत गीता सांगितली. या दरम्यान अर्जुनाच्या विनंतीनुसार भगवंताने आपल्या विराट रूपाचे दर्शन अर्जुनाला घडवले. हे विराट रूप पाहून अर्जुनाचे डोळे दिपून गेले व त्याने श्री कृष्णाला पुन्हा मूळ रूपात येण्यासाठी विनवले. असाच एक ‘विराट’ नावाचा मानव क्रिकेट विश्वाला आपले अचाट रूप दाखवून अवघ्या क्रिकेट रसिकांचे डोळे दिपवून टाकत आहे. अशा या सध्याचा भारतीय क्रिकेट सम्राट विराट कोहलीचा ५ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्याच्या ३३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला शुभेच्छा.
पश्चिम दिल्लीच्या विकासपुरी या निर्वासितांच्या वसाहतीत जन्मलेला, वाढलेला विराट (Virat Kohli) जात्याच लढवय्या खेळाडू. वयाच्या १० व्या वर्षी वडील प्रेम कोहली यांनी प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांच्या हवाली हे रत्न केले आणि शर्मानी या रत्नाला असंख्य पैलू पाडून भारतीय क्रिकेटला हे अनमोल रत्न भेट दिले. प्रचंड मेहनती आणि नैसर्गिक गुणवत्ता ठासून भरलेल्या विराटने आपल्या गुरूंचे ऋण फेडले ते पराक्रमाची नवनवीन शिखरे सर करून.

वयाची १८ वर्षे पुरी होत असतानाच त्याने दिल्लीच्या रणजी संघात स्थान मिळवले. त्याची क्रिकेटवरील निष्ठा व संघासाठी वाटेल तो त्याग करण्याच्या वृत्तीचे दर्शन घडवणारा एक प्रसंग भारताचा माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद याने सांगितला आहे. २००६ च्या मोसमात कर्नाटक व दिल्ली यांच्यात रणजी सामना सुरु होता. कर्नाटकच्या ४४६ धावाना उत्तर देताना दिवसअखेर दिल्लीची स्थिती ५ बाद १०३ अशी होती व कोहली ४० वर नाबाद होता. त्याच दिवशी मध्यरात्री विराटच्या वडिलांचे निधन झाले.
घरी वडिलांचे पार्थिव शरीर असताना सुद्धा कोहली दुसऱ्या दिवशी मैदानावर हजर झाला कारण संघ अडचणीत होता. तो ९० धावांवर पंचांच्या सदोष निर्णयाचा शिकार ठरला तेव्हा पॅव्हेलिअन मध्ये येऊन रडला. त्याला दुःख झाले होते ते संघाला गरज असताना बाद झाल्याचे. वेंकटेश प्रसाद हे पाहून थक्क झाला आणि त्याने खूणगाठ बांधली की हा भविष्यात एक महान खेळाडू होईल. त्याच्यातील नेतृत्व गुण हेरून त्याला २००८च्या जुनिअर वर्ल्ड कप साठी भारताचा कप्तान करण्यात आले. त्यानं हा विश्वास सार्थ ठरवताना भारताला विश्वचषक जिंकून दिला. याच कामगिरीच्या आधारे त्याला भारतीय संघात स्थान मिळाले.
कोहली फक्त विजयासाठीच खेळतो. महाभारतात जस अर्जुनाला जसा फक्त पक्ष्याचा डोळा दिसत होता तद्वतच कोहलीला फक्त विजयाचे लक्ष्य दिसते याची प्रचिती देणारे दोन डाव अविस्मरणीय आहेत.

२०१२ मध्ये ऑस्ट्रेलियात तिरंगी एकदिवसीय स्पर्धेत आव्हान टिकवण्यासाठी भारताला श्रीलंकेविरुद्ध होबार्ट येथे ४० षटकात विजय मिळवणे अनिवार्य होते. श्रीलंकेने भारतापुढे ३२१ धावांचे आव्हान ठेवले होते. कोहली तिसऱ्या क्रमांकावर येऊन असा काही खेळला की भारताने ३६ षटकातच विजय मिळवला. कोहलीने अविश्वसनीय फटकेबाजी करून नाबाद १३३ धावा काढल्या.
या सामन्यानंतर केवळ तीन आठवडयांनी बांगला देशात मीरपूर येथे आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानच्या ३२९ धावांचा यशस्वी पाठलाग करून भारताने तो सामना जिंकला. कोहलीने क्रिकेटमधील शास्त्रोक्त फटके खेळून १४८ चेंडूत १८३ धावा काढल्या. ही खेळी बघून पाकिस्तानी खेळाडू अचंबित झाले कारण तोपर्यंत भारताने पाकिस्तानविरुद्ध एवढे मोठे लक्ष्य कधीही गाठले नव्हते.
अशीच संस्मरणीय खेळी त्याने २०१६ च्या टी २० विश्वकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहाली येथे केली. ऑस्ट्रेलियाच्या १६०धावांचे लक्ष्य गाठणे एकवेळ अशक्य वाटत होते. पण कोहलीने शेवटच्या तीन षटकात सामना फिरवताना जी नेत्रसुखद फलंदाजी केली त्याला तोड नाही. नाबाद ८२ धावा फाटकावून त्याने सामनावीराचा किताब तर मिळवलाच शिवाय भारताला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून दिला.

कोहलीसमोर उद्दिष्ट निश्चित असते. २०१४ च्या ऍडलेड कसोटीत तो नेतृत्व करीत होता. दुसऱ्या डावात ३६४ धावांचे लक्ष्य असताना त्याने विजयासाठी प्रयत्न केले. बचावात्मक खेळाऐवजी आक्रमक खेळून त्याने संघाच्या प्रयत्नांना दिशा दिली. वृद्धिमान साहाने थोडा संयम दाखवला असता तर भारत तो सामना जिंकू शकला असता. भारताने फक्त ४८ धावांनी सामना गमावला. कोहलीने या कसोटीत दोन्ही डावात शतक झळकावले.
वरील खेळीच्या अगदी उलट खेळी त्याने २०१६ च्या राजकोट कसोटीत इंग्लंडविरुद्ध केली. यावेळी मोईन अलीच्या फिरकीपुढे डाव कोसळत असताना एक बाजू लावून धरताना आपल्या नेहमीच्या खेळाला मुरड घालून त्याने अश्विन व जडेजा यांच्या साहाय्याने सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले. कोहली ९८ चेंडूत ४९ धावांवर नाबाद राहिला. इथे कुठल्याही स्थितीत सामना हरायचा नाही हे त्याचे उद्दिष्ट स्पष्ट होते.
कोहलीच्या नेतृत्वगुणांबद्दल मतभिन्नता आहे. संख्यात्मक दृष्टिकोनातून तो भारताचा सर्वात यशस्वी कप्तान आहे पण गुणात्मक दृष्ट्या काही त्रुटी नक्कीच आढळतात. त्याचा मैदानावरील अतिआक्रमकपणा काहीवेळा बेतालपणाच्या जवळ जातो. तो आपल्या भावनांना आवर घालू शकत नाही. तो उत्तम रणनीतीकार सुद्धा नाही.

एक मात्र खरे की तो संघातल्या खेळाडूंच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो. तो प्रतिस्पर्धी संघाशी तसेच पंचांशी हुज्जत घालायला बिचकत नाही. नुकत्याच संपलेल्या इंग्लंडमधील मालिकेत गोलंदाजांची कुरापत काढणाऱ्या जो बटलरला त्याने मैदानातच सुनावले होते.
कप्तान कोहलीच्या त्रुटींवर फलंदाज कोहली मात करतो. त्याची धावा पळण्याची चपळाई तर आश्चर्यचकित करणारी आहे. तो पहिली धाव जेवढ्या वेगात व जोशात घेतो तेवढीच शंभरावी/दीडशेवी धाव सुद्धा तितक्याच इंटेन्सिटीने घेतो. त्याचे कव्हर ड्राइव्हज, सरळ ड्राइव्हज विवियन रिचर्ड्स व सुनील गावस्करची आठवण करून देतात. तो कधीही आपली विकेट फेकत नाही तसेच गोलंदाजाला डोक्यावर बसवत नाही. त्याचे काही लॉफटेड शॉट्स अविश्वसनीय असतात. दोन क्षेत्ररक्षकांमधून चेंडू फाटकावणे ही त्याची खासियत आहे.
भारताला बरेच वेळा कप्तान कोहलीने नव्हे तर फलंदाज कोहलीने जिंकून दिले आहे.
विराट भारताचा अव्वल क्षेत्ररक्षक आहे. त्याने अनेक कठीण झेल सहजपणे घेतले आहेत. त्याचा पिक अप आणि थ्रो तर थेट रिचर्ड्सची आठवण करून देतात. २०१८ च्या इंग्लंविरुद्धच्या बर्मिंगहॅमच्या पहिल्या कसोटीत पहिल्या डावात जो रूटला धावबाद करताना तो कव्हर्समधून काही अंतर मागे पळाला आणि तेथूनच त्याने अचूक फेक केली. त्याच्या अत्त्युच्य दर्जाच्या क्षेत्ररक्षणाचे रहस्य त्याच्या जबरदस्त तंदुरुस्तीमध्ये आहे.

नियंत्रित आहार, विहार आणि व्यायाम यामुळे तो नवोदितांचं रोल मॉडेल ठरला तर नवल नाही. त्याचे कामगिरीतले सातत्य व शतकांची रास ओतण्याची क्षमता बघून कपिल देव चकित झाला. तो म्हणाला की विराट या अतिताणामुळे कदाचित ‘बर्न आऊट’ होऊ शकतो. गेल्या दोन वर्षात कोहलीचे कसोटीत शतक झालेले नाही तसेच कामगिरीतले सातत्य कमी झाले आहे यावरून कपिलची भीती खरी ठरल्यासारखी वाटते. पण झुंजार विराट यातून पुन्हा भरारी घेईल हे निश्चित.
सध्याच्या काळात तो क्रिकेटविश्वातला सर्वोत्तम फलंदाज आहे कारण तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये ५० पेक्षा अधिक सरासरी राखणारा तो एकमेव खेळाडू आहे.
टी २० विश्वचषकातल्या अपयशापासून धडा घेऊन त्याने आता एक दिवसीय तसेच कसोटी संघाचे कर्णधारपद सोडून निव्वळ फलंदाजीवर लक्ष केंद्रित करून खेळाचा आनंद लुटावा. तो अजून किमान ५ वर्षे क्रिकेट खेळू शकतो. असे झाल्यास तो सचिनचे सर्व विक्रम मोडीत काढेल यात शंका नाही. सध्यापर्यंत त्याने ७० आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत. सचिनसारखी शतकांची शंभरी गाठणे त्याला मुळीच अशक्य ठरू नये.
कसोटी क्रिकेटमध्ये ७७०० च्या वर धावा, एकदिवसीय सामन्यात १२००० हून अधिक धावा तर टी २० मध्ये ३००० पेक्षा जास्त धावा करून कोहली नावाच्या ‘विराटने’ समस्त क्रिकेट विश्वाचे डोळे दिपवून टाकले आहेत आणि म्हणूनच तो ‘अचाट व विराट’ मानव ठरतो असे म्हणणे वावगे ठरू नये.
– रघुनंदन भागवत
(लेखक क्रीडा अभ्यासक आहेत)
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.