अमिताभ बच्चन ! सत्तरच्या दशकांत या एका नावाने बॉलीवूडवर एकहाती वर्चस्व निर्माण केलं होतं. सुपरहिट मसाला पिक्चरचं समीकरण अमिताभ (Amitabh Bachchan) शिवाय अपूर्णच असायचं. तो असला म्हणजे पिक्चर सुपरहिटचं, सगळ्या निर्मात्यांमध्ये हिच भावना घर करून बसली होती. राजेश खन्नाच्या ‘रोमांटिक बॉय’ची जागा आता अमिताभच्या ‘अंग्री यंग मॅन’ ने घेतली होती. अमिताभ सुपरस्टार झाला. त्याची लोकप्रियता एवढ्या शिखरावर पोहोचलं होतं की, प्रसिद्ध फ्रेंच दिग्दर्शक फ्रान्कॉय तृफोने अमिताभचं (Amitabh Bachchan) ‘वन मॅन इंडस्ट्री’ या शब्दांत वर्णन केलं होतं. अमिताभ (Amitabh Bachchan) त्याकाळी अनुभवत असलेले हे स्टारडम काही एका रात्रीत आलेलं नव्हतं. यशाचा डोळे दिपवणारा लख्ख प्रकाश अनुभवण्या अगोदर अमिताभने अपयश्याच्या कित्येक काळोख्या रात्रींचा सामना केला होता.
ऑल इंडिया रेडीओने एकेकाळी नाकारलेल्या अमिताभच्या आवाजाने आज संपूर्ण जगाला भुरळ घालून ठेवली आहे. फक्त आपल्या स्वप्नांची शिदोरी घेवून मुंबईत आलेल्या तरुणाला १९६९ पर्यंत फक्त नकारच मिळत राहिले. इथे आपल्यासाठी काहीच नाही, अशी समजूत करून अमिताभ जेव्हा हे सगळं सोडून जायला निघाला होता, तेव्हाच नशिबाने त्याची साथ दिली.
१९६९ साली त्याला पहिला चित्रपट मिळाला. ‘सात हिंदुस्तानी’ अमिताभसाठी रुपेरी पडद्याचे दारं खोलणारा ठरला. अमिताभची चित्रपटांमध्ये एन्ट्री झाली खरी, सात हिंदुस्तानी मधील कामगिरीबद्दल त्याला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला परंतु अजूनही त्याला हवी ती ओळख मिळाली नाही. सात जणांची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘सात हिंदुस्तानी’मध्ये अमिताभ एक होता. त्याच्यावर त्यावेळी कुनाचेच लक्ष गेले नाही.
पहिला चित्रपट मिळाला म्हणजे चित्रपटामधील मार्ग सुकर होतो, साधारण असा समज असतो, होतही असेल. परंतु अमिताभच्या बाबतीत असे काहीच घडले नाही. पहिला चित्रपट मिळाल्यानंतर पुढचा चित्रपट मिळायला अमिताभला तब्बल दोन वर्षे वाट बघावी लागली. १९७१ साली ‘आनंद’ घडला. सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत काम करणे, त्याकाळी फार मोठी गोष्ट होती. अमिताभला ह्रिशीदाने संधी दिली आणि अमिताभदेखील त्या संधीचे सोने करायला चुकला नाही.(Amitabh Bachchan)
खरतर ‘आनंद’चे मुख्य आकर्षण राजेश खन्ना होते. अमिताभने मात्र आपल्या कामाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. ‘आनंद’नंतर अमिताभचं आयुष्य कसं बदलून गेलं याची प्रचीती एका प्रसंगावरून येते. ‘आनंद’चा प्रीमियर होता. अमिताभ प्रीमियरला निघाले होते. वाटेत एका पेट्रोल पंपवर ते आपल्या गाडीत पेट्रोल भरायला थांबले. एका चित्रपटात काम करूनदेखील त्यांना प्रसिद्धी लाभली नव्हती. त्यांनी पेट्रोल भरले आणि प्रीमियरला निघून गेले. चित्रपटाचा प्रीमियर झाला. चित्रपट सगळ्यांना भावला. राजेश खन्नाचं भरपूर कौतुक झालं. त्या कौतुकाचा थोडा तुकडा अमिताभच्या देखील (Amitabh Bachchan) वाट्याला आला. आनंद प्रदर्शित झाला होता.
=======
हे देखील वाचा : एकेकाळी जेवणासाठी सुद्धा नव्हते पैसे… आज साउथ इंडस्ट्रीत बोलबाला
======
चित्रपटाचा प्रीमियर संपून अमिताभ परत घरी जायला निघाले. जातांना वाटेत परत त्याच पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला थांबले. यावेळी मात्र चित्र वेगळं होतं. आजूबाजूचे लोक अमिताभभोवती गराडा घालत, आनंदमधील त्याच्या कामाचं कौतुक करायला लागले. अमिताभ बच्चन हे नाव आता लोकांना परिचित झालं होतं. एका रात्रीत जरी हे घडलं असलं तरी अमिताभने मात्र याअगोदार कित्येक रात्रींचा दिवस करत या स्वप्नवत रात्रीची वाट बघितली होती, ती नशीब बदलणारी रात्र घडवून आणली होती. कितीही एका रात्रीचे दाखले दिले तरी अमिताभ बच्चन हे रसायन, ही जादू काय एका रात्रीत घडलेली नाही, घडत नाही.