रामायणामध्ये भगवान राम आणि रावणाचे युद्धादरम्यान लक्ष्मण हे बाणानं बेशुद्ध झाले. तेव्हा त्यांच्यावर उपचार करण्यासाठी संजीवनी बुटी आणण्यासठी रामभक्त हनुमान यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. ही संजीवनी बुटी आणतांना बजरंगबली हिमाचल प्रदेशमधील एका मंदिरात थांबले होते. त्यावेळी त्यांच्या पावलांचे ठसे या मंदिरात उठले. आजही हनुमानांच्या पावलांचे हे ठसे या मंदिरात असून त्यांचे दर्शन घेण्यासाठी जगभरातील हनुमान भक्त या मंदिरात रोज भेट देतात. हे मंदिर हिमाचल प्रदेशमधील शिमला येथे आहे. जाखू मंदिर म्हणून ते ओळखले जाते. हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथील जाखू टेकडीवर असलेले हनुमान मंदिर फक्त धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध नाही तर या टेकडीवर ट्रेकिंगसाठीही हजारो पर्यटक येत आहेत. ( Jakhoo Hanuman Temple )

Jakhoo Hanuman Temple
हिमाचल प्रदेश हे राज्य देवभूमी म्हणून ओळखले जाते. याशिवाय हे राज्य त्याच्या नैसर्गिक सौदर्यांसाठी आणि पौराणिक दाखले असलेल्या मंदिरांसाठीही ओळखले जाते. या मंदिरामध्ये जाखू मंदिराचाही समावेश होतो. शिमला या सुंदर शहराच्या सर्वोच्च शिखरावर असलेले हे मंदिर फक्त श्रद्धेचे केंद्रच नाही तर रामायण काळातील एका महत्त्वाच्या घटनेचे साक्षीदारही आहे. पौराणिक कथेनुसार, रामायणाच्या युद्धादरम्यान, जेव्हा लक्ष्मण रावणाचा मुलगा मेघनाध याच्या बाणानं बेशुद्ध झाले तेव्हा वैद्य सुषेन यांना त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आणण्यात आले.
त्यांच्या सांगण्यावरुन भगवान रामाने भक्त हनुमान यांना हिमालयातून संजीवनी औषधी वनस्पती आणण्यास सांगितले. हनुमान हे संजीवनी औषधी वनस्पती घेण्यासाठी जात असताना, त्यांनी एका ऋषीला डोंगरावर ध्यान करत असतांना पाहिले. त्यांच्याकडून संजीवनीबद्दल जाणून घेण्यासाठी, हनुमानजी या पर्वतावर उतरले. हा जाखू पर्वत होता. त्यावर तपस्या करणा-या ऋषींचे नाव यक्ष ऋषी होते. असे मानले जाते की, त्यावेळी पर्वत बराच उंच होता, परंतु हनुमानाने त्यावर पाऊल ठेवताच हनुमानजींच्या प्रचंड वजनामुळे जाखू पर्वत जमिनीत अर्ध्यावर बुडाला. म्हणूनच आजही वरून हा पर्वत सपाट दिसतो. जाखू पर्वतावर हनुमानजी जिथे उतरले तिथे त्यांच्या पावलांचे ठसे उमटले. तिथेच आता मंदिर संकुल असून या मंदिर संकुलात बजरंगबलीच्या पावलांच्या या ठशांचे जतन करण्यात आले आहे. स्थानिकांचा या मंदिराबाबत असा विश्वास आहे की, येथेच हनुमानजींना हिमालयातील संजीवनी बुटीबाबत मार्गदर्शन मिळाले. ( Jakhoo Hanuman Temple )
यक्ष ऋषींकडून मार्गदर्शन मिळाल्यावर, परत येतांना पुन्हा या पर्वतावर येण्याचे आश्वासन यक्ष ऋषींना दिले होते. मात्र परत येतांना हनुमानजींना वाटेत, कालनेमी राक्षसाने युद्धासाठी आव्हान दिले. कालनेमी राक्षसाचा पराभव केल्यानंतर, हनुमानजींनी संजीवनी औषधी वनस्पती मिळवली. या सर्वात बराच वेळ गेल्यामुळे हनुमानजींनी यक्ष ऋषींना भेटण्यासाठी परत आले नाहीत. हनुमान परतले नाहीत तेव्हा यक्ष ऋषी चिंतेत पडले. त्यांची ही चिंता जाणून हनुमान स्वतः पर्वतावर ऋषींसमोर प्रकट झाले. असे म्हटले जाते की, ऋषींनी त्याच ठिकाणी हनुमानाची मूर्ती स्थापित केली. ही मूर्ती आजही मंदिरात असून त्याचे दर्शन घेण्यासाठी हनुमान भक्त या मंदिरात मोठ्या संख्येने येतात. या जाखू मंदिर संकुलात मोठ्या संख्येने माकडे आढळतात. असे मानले जाते की, भगवान हनुमानाच्या काळात येथे अस्तित्वात असलेल्या वानर सैन्याचे हे आहेत.
=======
हे देखील वाचा : Religious : भारतातील ‘या’ मंदिरांमध्ये चक्क पुरुषांना जाण्यास आहे मनाई
=======
२०१० मध्ये, हिमाचल प्रदेश राज्य सरकारने येथे १०८ फूट उंचीची हनुमानाची मूर्ती स्थापित केली आहे. भारतातील ही दुसरी सर्वात उंच मूर्ती मानली जाते. जाखू हनुमान मंदिरातील ही हनुमानजींची विशाल मूर्ती शिमला शहराच्या प्रत्येक कोप-याहून पहाता येते. पर्यटकांमध्ये हा पर्वत खूप लोकप्रिय आहे. शिमलामध्ये बर्फवृष्टीमध्ये होत असतांना हा संपूर्ण पर्वत बर्फाच्या चादरीखाली जातो. मात्र तेव्हाही येथील हनुमानाची उंच मूर्ती भाविक पाहू शकतात. या पर्वतावर भाविक पायी, खाजगी कारने किंवा रोपवेने जाऊ शकतात. पायी जाणाऱ्या भाविकांसाठी प्रवेशद्वाराजवळ लाकडी खांब बसवण्यात आले आहेत. या पर्वतावर गेल्यावर जाखू मंदिरातील भगवान हनुमानांच्या पावलांचे दर्शन घेता येतेच शिवाय येथून संपूर्ण शिमला शहराचे सौदर्य बघता येते. ( Jakhoo Hanuman Temple )
सई बने
