Home » Hanukkah : ज्यू समुदायाच्या प्रकाशोत्सवाला रक्ताचा डाग !

Hanukkah : ज्यू समुदायाच्या प्रकाशोत्सवाला रक्ताचा डाग !

by Team Gajawaja
0 comment
Share

ज्यू धर्मियांचा सर्वात मोठा उत्सव असलेला हनुक्का उत्सव ऑस्ट्रेलियामध्ये साजरा करत असलेल्या ज्यू समुदायावर मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील बोंडी समुद्रकिना-यावर हनुक्का उत्सवाला लक्ष्य करून झालेल्या सामूहिक गोळीबारात चाबाडचे प्रतिनिधी रब्बी एली श्लांजरसह दहा जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले आहेत. हा हल्ला “हनुक्का बाय द सी” कार्यक्रमात झाला, जिथे सुमारे २००० ज्यू धर्मिय उत्सवाची पहिली मेणबत्ती पेटवण्यासाठी जमले होते. यालाच प्रकाशोत्सव असेही म्हणतात. या प्रकाशोत्सवाला रक्ताचा डाग लावणा-यांना धडा शिकवला जाईल, अशी घोषणा इस्रायल सरकारनं केली आहे. (Hanukkah)

या घटनेनंतर सिडनी येथील बोंडी समुद्र किना-यावर आणीबाणी सदृश्य परिस्थिती आहे. हा सर्व परिसर ऑस्ट्रेलियन पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी येथून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. तर नागरिकांनी बोंडी बीच परिसरापासून दूर राहण्याचे आणि सुरक्षा दलांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. ऑस्ट्रेलिया ज्यू समुदयाला लक्ष कऱण्यात आल्यामुळे जगभरातील अन्य देशांमधील ज्यू धर्मियांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच इस्रायली दूतावासांना संरक्षण देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या बोंडी समुद्रकिना-यावर घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानं जगाला धक्का बसला आहे. या समुद्रकिनाऱ्यावर धार्मिक उत्सव शांततेत पार पाडणा-या ज्यू धर्मियांवर अंधाधूंद गोळीबार करण्यात आला. (International News)

“हनुक्का बाय द सी” नावाचा हा उत्सव दरवर्षी बोंडीच्या चाबाडद्वारे आयोजित केला जातो. यासाठी ऑस्ट्रेलियातील आणि अन्य देशातील ज्यू धर्मिय येथे हजारोंच्या संख्येनं जमले होते. हनुक्का उत्सव हा ज्यू समुदायासाठी श्रद्धा आणि एकतेचे प्रतीक मानला जातो. याच उत्सवात अचानक झालेल्या गोळीबारामुळे एकच घबराट उडाली. या ठिकाणी लहान मुलांची संख्याही अधिक होती. गोळीबार सुरु झाल्यावर सुरुवातील ही आतिषबाजी आहे, असे वाटले, मात्र नंतर रक्ताचे पाट वाहू लागल्यानं पालकांनी आपल्या मुलांना वाचवण्यासाठी धडपड सुरु केली. लोक त्यांच्या मुलांना वाळूवर ओढत नेत होते. सुमारे ४० राउंड गोळीबार झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. आणखी एका प्रत्यक्षदर्शींनं सांगितले की, शेकडो लोक हनुक्का साजरा करत होते. मेणबत्त्या जळत होत्या, संगीत वाजत होते. (Hanukkah)

मग अचानक मोठा आवाज झाला. पहिल्या काही सेकंदांसाठी, काय घडत आहे ते कोणालाही समजले नाही. आम्हाला वाटले की, हा उत्सवाचा भाग आहे. पण नंतर काही लोक पडताना पाहिले आणि काही जण लपण्यासाठी पळत होते. काही लोक लहान मुलांना हातात धरून जमिनीवरुन ओढत नेत होते. गोळीबार करणारे दोन हल्लेखोर होते. त्यापैकी एका हल्लेखोराला एका व्यक्तीनं मोठी बहादुरी दाखवून पकडले आहे. या हल्ल्यात दहा व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला आहे, आणि अनेक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करुन समुद्रकिना-यावरील घटनेनं आपल्याला मोठा धक्का बसल्याचे सांगितले आहे. (International News)

मुख्य म्हणजे, जिथे हा हल्ला झाला, तो ऑस्ट्रेलियाचा बोंडी समुद्रकिनार सर्वात सुरक्षित मानला जातो. या हल्ल्यानं इस्रायलमध्येही मोठा धक्का बसला आहे. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या घटनेमागे नेमकं कोण आहे, हे शोधून बदला घेणार, अशी घोषणा केली आहे. हनुक्का हा यहुदी लोकांचा प्रकाशांचा उत्सव आहे. अंधारावर प्रकाश आणि श्रद्धेच्या विजयाचे प्रतीक म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. ‘हनुक्का’ म्हणजे हिब्रूमध्ये ‘समर्पण’ हा अर्थ आहे. जेरुसलेममधील मंदिराच्या पुनर्समर्पणाचे स्मरण करून आठ दिवस हा उत्सव साजरा केला जातो. प्रत्येक रात्री, एक विशेष मेणबत्ती पेटवली जाते. पारंपारिक पदार्थ प्रत्येक ज्यू घरात यावेळी केले जातात. यात बटाटा पॅनकेक्स आणि जेली डोनट्स या पदार्थांचा समावेश असतो. (Hanukkah)

======

हे देखील वाचा : America VS Venezuela : सद्दामच्या वाटेवर मादुरो…

=======

काही जण एकत्र येऊन हा हनुक्का उत्सव साजरा करतात. यानिमित्तानं ज्यू कुटुंबे एकमेकांना भेटवस्तू देतात आणि प्रार्थना करतात. यहूदी कॅलेंडरनुसार किसलेव्ह महिन्याच्या २५ तारखेला हा दिवस सुरू होतो साधारणपणे नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये आठ दिवस हा हनुक्का उत्सव साजरा होतो. असाच हा प्रकाशाचा उत्सव साजरा करण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये जमलेल्या ज्यू नागरिकांवर हल्ला झाला आहे. आता या सर्व प्रकऱणाचा तपास इस्रायल सरकारही करणार असून यातील दोषींना लवकरच त्यांच्या कृत्याची शिक्षा देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले आहे. (International News)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.