Home » गुरु-शिष्य नाते आणि मराठी चित्रपट

गुरु-शिष्य नाते आणि मराठी चित्रपट

by Correspondent
0 comment
Share

गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः
गुरु आणि शिष्य हे नातं म्हणजे आपल्या संस्कृतीची एक सुंदर देणगी आहे… कुठलंही क्षेत्र असो, त्यात गुरुंनी दिलेली शिकवण कामी येते. या गुरुशिष्याच्या नात्यापासून चित्रपटसृष्टीही दूर नाही. या नात्यावर काही चित्रपट निघाले. पण असेही अनेक चित्रपट आहेत, त्यात अप्रत्यक्षरित्या गुरु शिष्याचे नाते मांडण्यात आले. गुरुला वंदन करण्यात आले. गुरुंनी दिलेला उपदेश… शिकवण.. आयुष्यभर जपणारा संदेश यातून देण्यात आला. मराठी चित्रपटांनी या नात्याला एक नव रुप दिलंय… या गुरुशिष्याच्या नात्यात कधी आई मुलगा आला तर कधी नेता आणि कार्यकर्ता आला. कधी मित्रांचं टोळकं गुरुच्या रुपात आलं. तर कधी चवदार पदार्थांचा शोधानं गुरुचा मार्ग दाखवला… उत्कृष्ठ कथा, संवाद आणि तेवढाच तोडीस तोड अभिनय… त्याला साजीरी गाणी यांनी सजवलेल्या या चित्रपटांनी गुरु-शिष्याच्या नात्याला वेगळ्या रुपात मांडले.

6 मार्च 1953 रोजी आलेला ‘श्यामची आई’ चित्रपट म्हणजे आई आपला आद्यगुरु असतो हा संदेश देणारा अप्रतिम चित्रपट. पांडूरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी यांच्या श्यामची आई या कादंबरीवर आचार्य अत्रे यांनी हा चित्रपट काढला आणि आईच्या रुपातील गुरुला जणू वंदन केलं. माधव वझे, वनमाला, दामूअण्णा जोशी यांच्या अप्रतिम अभिनयाने सजलेला हा कृष्णधवल चित्रपट राष्ट्रपती सुवर्णपदक विजेता ठरला… छम छम छम… छडी लागे छम छम… विद्या येई घम घम… हे आजही गायलं जाणारं गाणं श्यामची आई या चित्रपटातीलच. शिवाय भरजरी ग पितांबर दिला फा़डून… द्रौपदीचे बंधू शोभे नारायण…, घनदाट रानी वाहे झुळू झूळू पाणी…., आणि आई… कुणा म्हणू मी…. ही या चित्रपटातील गाणी गाजली. भाऊराव आणि यशोदा या जोडप्यापोटी जन्मलेला श्याम… अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून त्याची आई त्याला संस्काराचं बाळकडू पाजते. वडील स्वातंत्र्य आंदोलनात तुरुंगात जातात. आईच्या हाती पैसा नाही… पुस्तकासाठी हा श्याम काकांचा एक रुपया चोरतो… आपल्या श्यामला चोरीची सवय लागू नये म्हणून त्याला जबर शिक्षा देणारी आई, कधी त्याला मित्रांनी भित्रा म्हणू नये म्हणून पोहण्यासाठी विहीरीत उतरवणारी आई, कौटुंबिक वादातून झालेली वाटणी आणि मग आर्थिक तंगी त्यातून आईनं केलेला काटकसरीचा संसार… त्यात स्वतः चटके सोसत दुस-याला आनंद देण्याची आईची सवय… हे सर्व छोटा श्याम बघतो… पुढे शिक्षणासाठी दापोलीला जातो… इकडे आई एका धक्याने देवाघरी जाते… मग जीवाची तगमग सोसत छोटा श्याम आपल्या आईची शिकवण आठवतो… तिनं दिलेला गुरुमंत्र आठवतो… तिचं स्वप्न पूर्ण करतो… खूप शिकतो आणि स्वातंत्र्याच्या संग्रामात स्वतःला झोकून देतो… भारत मातेलाच आपली आई मानतो… आई ही मुलांची पहिली गुरु असते… हा संदेश देणारा श्यामची आई चित्रपट आज बघितला तरी डोळ्यात पाणी येतं… आणि आईच्या आठवणीनं मन हळवं होतं…

त्यानंतरही गुरुशिष्य नात्यातील अनोखे रंग सांगणारे चित्रपट आले. 20 जानेवारी 2010 रोजी आलेला ‘झेंडा’ हा कार्यकर्ता व नेता या राजकीय गुरुशिष्याच्या नात्याला अधोरेखीत करणारा वास्तववादी चित्रपट. अवधूत गुप्ते हे चित्रपटाचे सर्वेसर्वा. सिद्धार्थ चांदेकर, राजेश श्रुंगारपुरे, सचिन पाटील, संतोष जुवेकर, पुष्कर श्रोत्री, सुनील तावडे, चिन्मय मांडलेकर यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटानी राजकीय पक्ष, नेते आणि त्यामागे होणारी कार्यकर्त्यांची होरपळ दाखवली आहे. यातून कार्यकर्त्यांना संदेशही दिला आहे. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते पहिला गुरु मानतात ते त्यांच्या नेत्याला. ही नेते मंडळी त्यांना जो आदेश देतात तो त्यांच्यासाठी अंतिम असतो. अनेकवेळा त्या आदेशामागील फायदे तोटे न बघता ही मंडळी त्याचे पालन करतात… त्यामागचं वास्तव लक्षात आल्यावर आपला वापर करण्यात आली ही मनाला बोच देणारी भावना…. कुठलंही क्षेत्र वाईट नसतं. पण प्रत्येक ठिकाणी छापाकाटा हा खेळ असतोच. तु्म्हाला यशाची चव चाखायची असेल तर हा खेळ तुम्ही खेळावा लागतो. झेंडा या चित्रपटातून हाच गुरुसंदेश देण्यात आला आहे. नेता-कार्यकर्ता या गुरुशिष्याचे अनोखे नाते सांगणा-या चित्रपटाचे विठ्ठला… कोणता झेंडा घेऊ हाती… हे गाणं बरच बोलकं आहे…

प्रश्न कोणाला पडतात. आणि पडले तर त्यांचा पाठपुरावा कोण करतो. प्रत्येक माणूस संशोधक असतो. साधनं… साध्य वेगळं असतं. पण प्रत्येकामध्ये एक सचोटीची भावना असते. ही भावनाच गुरुसारखी नवीन दिशा दाखवते. फक्त या सचोटीला मेहनतीची जोड द्यायला हवी हा संदेश देणारा ‘हापूस’ चित्रपट आठवतो का… गुरुशिष्य नातं म्हणजे किती व्यापक आहे, हे सांगणारा हा आणखी एक चित्रपट. 25 जून 2010 रोजी आलेला हापूस म्हणजे कोकणी माणसाची मानसिकता…. व्यापाराबद्दलची भीतीची भावना… आणि त्या भीतीवर मात करण्याची जिद्द याची कथा आहे. कोकणातील एका शेतकरी कुटुंबाची ही गोष्ट… अण्णा गुरव आणि त्यांचा मुलगा अजित गुरव. दोघेही दोन ध्रुवांवर. अण्णा गुरव म्हणजे पत्रिका बघितल्याशिवाय घरातून पाऊलही बाहेर न टाकणारे. तर अजित गुरव म्हणजे संशोधक वृत्तीचा तरुण. कोकणाचं सोनं म्हणजे हापूस आंबा. या हापूस आंब्यावर तो संशोधन करतोय. कोकणी माणूस या हापूससाठी मेहनत घेतो, पण त्यातून उत्पन्नाची वेळ येते तेव्हा तो मागे हटतो. मग व्यापा-याच्या आधीन होतो. तो देईल तसा कवडीमोल दर घेऊन गप्प बसतो…. हाच व्यापारी या हापूसला बाजारात सोन्याच्या दरानं विकतो आणि मालेमाल होतो…. हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी अजित पुढे सरसावतो. त्याला त्याच्या वडीलांचाच प्रथम विरोध होतो. मगा गावक-यांचा… आणि व्यापा-याचा… इथेही तोच नियम… काही नवीन करायचं असेल तर त्यातील नफा-तोटा समजून घ्यायला हवा. अजित सुरुवात करतो… पडतो… धडपडतो… पण हरत नाही… लढतो… त्याची जिंकण्याची शक्तीच त्याची गुरु ठरते… शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, सुबोध भावे, मधुरा वेलणकर, पुष्कर श्रोत्री, शुभम देशपांडे, सुलभा देशपांडे, मृणाल देशपांडे, मानसी मागीकर, विद्याधर जोशी, स्वरशा जाधव, सुनील देव यांच्या अभिनयानं सजलेला हापूस हा चित्रपट आपल्यातील आत्मिक शक्तीचं बळ… दाखवतो. गुरुशिष्य नात्यातील आणखी एक हा पदर….

19 जुलै 2013 रोजी प्रदर्शित झालेला ‘दुनियादारी’ हा चित्रपट म्हणजे मैत्रीला गुरुसारखं जपणा-या मित्रमंडळींसाठी मोठी पर्वणी ठरला. लेखक सुहास शिरवाळकर यांच्या कांदबरीवर संजय जाधव यांनी दिग्दर्शित केलला दुनियादारी हा सुंदर अविष्कार… दुनियादारीनं मराठी चित्रपटांची ताकद सिद्ध केली. कथा, संवाद, चित्रण, गाणी याबाबतीत मराठी चित्रपटसृष्टी ख-या अर्थानं दादा आहे, याची दखल या दुनियादारीनं घ्यायला लावली. एका महाविद्यालयातल्या मित्रांच्या टोळक्याची ही कथा. मित्र हे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील गुरुच असतात. चांगल्या-वाईट गोष्टी त्यांच्याकडून शिकता येतात. किंबहुना त्या आपसूक शिकवल्या जातात. या दुनियादारीमध्ये मित्रमंडळीमधील हे गुरुशिष्य नातं मोठ्या रंजक पद्धतीनं मांडण्यात आलं आहे. श्रेयस नावाचा मुलगा कॉलेजच्या विश्वात येतो… तिथं त्याला मित्र भेटतात. त्यांच टोळकं होतं. हे टोळकं त्याला मैत्रीची परिभाषा शिकवतं… मन मोकळं करायला तो शिकतो… डेअरींग म्हणजे काय हे तो शिकतो… अगदी सिगरेट प्यायलाही शिकतो… मनमोकळं जगायला शिकतो… हसायला शिकतो… आणि हसता हसता आपल्या गुरुमंडळींना सोडून निघून जातो… पण जातांना या सर्वांना एका धाग्यात बांधून जातो… अगदी पन्नाशीमध्ये सुद्धा ही मंडळी जेव्हा त्यांच्या नाक्यावर भेटतात… तेव्हाही त्याच शिकवणीला आठवून रमतात…. जिंदगी जिंदगी.. दोस्तो की दुनियादारी मे हसी मेरी जिंदगी…, टिक टिक वाजते डोक्यात… धड धड वाढते ठोक्यात…, देवा तुझ्या गाभा-याला उंबराच नाही…. या अप्रतिम गाण्यांनी हा चित्रपट सजला आहे. गुरुशिष्याचं नातं एकाच तराजूत कधी मोजता येत नाही. परिस्थितीनुसार, गरजेनुसार हे नातं बदलतं… हेच यातून स्पष्ट होतं. नेहमी छान छान बोलायचं… कितीही कठीण परिस्थिती असली तरी नेहमी आनंदी रहाण्याचा मंत्र हा मित्र रुपी गुरु आपल्या शिष्यांना देतो… त्यावेळी मात्र डोळ्यातून पाणी येतं…

पंडित भानु शंकर या स्वरांची दैवी देणगी लाभलेल्या शास्त्रीय गायकांची कहाणी असलेला ‘कट्यार काळजात घुसली’ हा गुरुशिष्य परंपरेतील जबाबदारी, गुरुला त्याची गुरुदक्षिणा देणं म्हणजे काय हे दाखवणारा चित्रपट… सुबोध भावे दिग्दर्शित या चित्रपटात सचिन पिळगावकर, शंकर महादेवन आणि सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यातून प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी अभिनयात पदार्पण केले. एका राजदरबारातील शास्त्रीय गायकांला सलग चौदा वर्षे कोणी पराभूत करु शकले नाही. पंडित भानु शंकर शास्त्री म्हणजे स्वरांची दैवी देणगी लाभलेला माणूस… तशीच त्याची वृत्तीही… प्रसन्न… तृप्त… या पंडितांना, खानसाहेब आफताब हुसेन बरेलीवाले भेटतात… शास्त्रींजींच्या संपन्न आयुष्याचा त्यांना हेवा वाटतो. याच हेव्यातून एक स्वार्थ जन्माला येतो… आणि खानसाहेब शास्त्रीजींना हरवण्याचा विडा उचलतात… एका फसवेगिरीतून का होईना ते शास्त्रींजींना हरवतात… त्यांचे वैभव खेचून घेतात… त्यांना बेघर करतात… इथे शास्त्रीजींचा सदाशिव नावाचा शिष्य असतो. आपल्या गुरुंचा झालेला हा अपमान पाहून सदाशिव पेटून उठतो… तो खानसाहेबांना हरवण्याचा विडा उचलतो… त्यासाठी त्यांच्या तोडीचं गाणं शिकतो… तेही खानसाहेबांकडूनच… त्यासाठी कितीतरी अपमान सहन करतो… पण आपल्या गुरुला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व पचवतो… पुन्हा दरबार भरतो… त्यात सदाशिव आपल्या शास्त्रीजींना न्याय मिळवून देतो… एक शिष्य आपल्या गुरुंना गुरुदक्षिणा देतो… आणि या नात्याचा अर्थ सांगतो… गुरुकडून फक्त घ्यायचे नसते… तर आपल्या शिष्याचा अभिमान वाटेल अशी समाधानाची गुरुदक्षिणा गुरुला द्यायचीही असते हा मंत्र या चित्रपटातून मिळतो… यातील गाण्याबाबत काय बोलावे… अजरामर गाणी… दिल की तपीश, भोला भंडारी, घेई छंद मकरंद.. प्रिय हा मिलिंद, कट्यार काळजात घुसली, लागी कलेजवा कट्यार, मन मंदीरा, सुर से सजी, सूर निरागस हो…, तेजोनिधी लोह गोल ही अनेकवेळा ऐकूनही पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटणारी गाणी म्हणजे मराठी संगिताची दौलत ठरली. कट्यार…. मधून उलगडलेलं गुरुशिष्याचे हे नातं नक्कीच अनुकरणीय असं…

मरीठी पदार्थांची चव म्हणजे काय… ही चव म्हणजे आईची माया… या चवीचा शोध घेत एक मुलगा लंडन वरुन परत येतो. त्याला परदेशातली लढ्ढ पगाराची नोकरी सोडून हॉटेल सुरु करायचं असतं… तेही मराठी पदार्थांचं… हे ऐकणारा प्रत्येकजण त्याला वेड्यात काढतो… हा आदित्य खरच वेडा असतो… घरच्या मंडळींना खोटं सागूंन तो मित्रांकडे रहातो… त्यांच्यासाठी जेवण बनवतो… आणि आपल्याला कोण चांगला आणि अस्सल मराठी स्वयंपाक बनवायला शिकवेल हे शोधत फिरतो… बाईलवेडी कामं करतो म्हणून त्याला चिडवलं जातं… पण त्याचा शोध चालू असतो… याच शोधात मित्राच्या डब्यातला गुलाबजाम तो खातो.. आणि आईच्या हाताची चव त्याला लाभते… मग तो पोहचतो….. राधाकडे… ती भारी असते… शेजा-यांच्या मते ती स्वतःला बच्चन समजते… ही राधा त्याला राब-राब-राबवून घेत… अगदी भांडींही घासून घेते… पण आदित्य पक्का चेला असतो… त्याला आपल्या गुरुची ताकद माहीत असते… गुरुतले गुण माहीत असतात… त्यामुळे तो तिच्या प्रत्येक आदेशाला प्रमाण मानतो… मग हे गुरु-शिष्याचे नाते विश्वासाच्या प्रमाणात चोख बसते… राधा त्याला सर्व ठेवणीतले पदार्थ शिकवते…. आणि आदित्य त्या बदल्यात तिला काय देतो… तर तिचा आत्मविश्वास तिला देतो… तिच्या हरवलेल्या जीवनात नवीन पहाट आणतो… नवी आशा देतो… गुलाबजाम हा गुरुशिष्याच्या नात्यात चिकाटी किती असावी हे दाखवणारा चित्रपट. सचिन कुंडलकर दिग्दर्शित या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर आणि सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत आहेत. आपल्याला काय शिकायचेय… त्यासाठी कोणता गुरु असावा याचा शोध घ्यावा लागतो… म्हणजे आपल्या ध्येयाची वाट सफल… संपन्न होते हा संदेश या गुलाबजाम मध्ये मिळतो… गुरुकडून सर्व शिकल्यावर त्या गुरुलाही त्याच्या गरजेची गुरुदक्षिणा देणे हे त्या शिष्याचे कर्तव्य असते… या चित्रपटातून हाच संदेश मिळतो…

गुरुशिष्याच्या नात्यावर अनेक असे समृद्ध चित्रपट आपल्या मायमराठीमध्ये आले आहेत. त्यातील कथेचा गाभा वेगळा असेल… पण संदेश एकच आहे… तो म्हणजे,

गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।

गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.