Home » गुजरातचा प्लेऑफ मध्ये प्रवेश तर मुंबईचा दुसऱ्या स्थानाचा निर्धार

गुजरातचा प्लेऑफ मध्ये प्रवेश तर मुंबईचा दुसऱ्या स्थानाचा निर्धार

by Team Gajawaja
0 comment
IPL Match
Share

गुजरातचा प्लेऑफ मध्ये प्रवेश

सोमवारी झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने सलामीवीर फलंदाज शुभमन गिलच्या शतकाच्या बळावर हैद्राबादचा ३४ धावांनी पराभव करत आपला प्लेऑफ प्रवेश निश्चित केला. या सामन्यातील पराभवानंतर मात्र हैद्राबादचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले आहे.

गुजरातने प्रथम फलंदाजी करत वीस षटकात ९ गडी गमावत १८८ धावा केल्या. त्यांच्याकडून सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या युवा शुबमन गिलने आपला फॉर्म कायम राखत संघाला धडाकेबाज सुरुवात करून दिली. गिलचा जोडीदार साहा लवकर माघारी परतल्यानंतर त्याने साई सुदर्शनच्या साथीने डावाला आकार दिला. साई सुदर्शनने चांगली फटकेबाजी करत ३६ चेंडूत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४७ धावा ठोकल्या. (IPL Match)

त्यानंतर मात्र कुठल्याही फलंदाजाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. एकट्या शुभम गिलने खिंड लढवत संघाला १८८ धावांच्या आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली. हैद्राबादकडून भुवनेश्वर कुमार याने टिच्चून मारा करत ४ षटकात ३० धावांच्या मोबदल्यात ५ बळी मिळवले. फारुकी, मार्को यांसेन, टी. नटराजन यांनी प्रत्येकी एक बळी मिळवत त्याला योग्य साथ दिली.(IPL Match)

लक्षाचा पाठलाग करायला उतरलेल्या हैद्राबादला अपेक्षित सुरुवात मिळाली नाही. त्यांचे दोन्ही सलामी फलंदाज लवकरच माघारी परतले. त्यानंतर मात्र गुजरातच्या गोलंदाजांनी हैद्राबादच्या फलंदाजांना खेळपट्टीवर स्थिरावू दिले नाही. हैद्राबादकडून हेन्रिक क्लासेन आणि भुवनेश्वर कुमार यांनी थोडीफार खिंड लढवली. त्यांच्याव्यतिरिक्त इतरांना काही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही आणि याचाच फटका हैद्राबादला बसला. गुजरातकडून मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा यांनी सुरेख गोलंदाजी करत प्रत्येकी चार बळी मिळवले.(IPL Match)

मुंबईचा दुसऱ्या स्थानाचा निर्धार

आयपीएलमध्ये आज खेळल्या जाणाऱ्या लढतीत मुंबई आणि लखनऊ आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्वाचा आहे. मुंबईने आजच्या सामन्यात विजय मिळवला तर चेन्नईला मागे ढकलत ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानाचा कब्जा घेतील आणि याउलट लखनऊने सामना खिशात घातला तर ते मुंबईला मागे सारून तिसऱ्या स्थानावर उडी घेतील. दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणे पुढील वाटचालीसाठी तेवढेच महत्वाचे असल्याने सामना चुरशीचा होईल यात मात्र शंका नाही.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईचे १२ सामन्यात १४ गुण आहेत तर कृणाल पांड्याच्या नेतृत्वातील लखनऊचे १२ सामन्यात १३ गुण आहेत. दोन्ही संघांसाठी महत्वाचे असणारे दोन गुण मिळवण्यात दोन्ही संघांचे फिरकीपटू महत्वाची भूमिका बजावतील. सामना लखनऊ येथील एकाना स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. येथील खेळपट्टी फिरकीपटूला पोषक असल्याकारणाने दोन्ही संघांची फिरकीपटूच्या कामगिरीवर मदार असणार आहे. लखनऊकडे कर्णधार कृणाल पांड्यासह, अमित मिश्रा, रवी बिष्णोई यांच्यासारखे फिरकीपटू आहेत तर मुंबईकडे अनुभवी पियुष चावला, कुमार कार्तिकेय, हृतिक शोकीन यांच्यासारख्या फिरकीपटूचा भरणा आहे.(IPL Match)

======

हे देखील वाचा : बंगळूरूच्या आशा कायम, चेन्नईची प्लेऑफची प्रतीक्षा वाढली

======

दोन्ही संघांना आपल्या प्रमुख खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. मुंबईसाठी कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म चिंतेचा विषय असला तरी सुर्यकुमार यादव मात्र भन्नाट फॉर्ममध्ये आहे. त्याच्या शतकाच्या बळावर मागच्या सामन्यात मुंबईने गुजरातचा धुव्वा उडवला होता. टीम डेव्हिड, कॅमरून ग्रीन, निहाल वढेरा यांनीदेखील सातत्याने चांगली कामगिरी करत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे. लखनऊला कृणाल पांड्या, निकोलस पुरन, मार्कस स्टोइनिस यांच्याकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा असेल.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.