अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या क्वालीफायर २ सामन्यात शुभमन गिल नावाच्या वादळापुढे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली. गुजरातने दिलेल्या विशाल लक्षाचा पाठलाग करताना मुंबईच्या नाकीनऊ आले आणि महत्वाच्या सामन्यात त्यांना ६२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यातील पराभवामुळे मुंबईचे आयपीएलच्या या हंगामातील आव्हान संपुष्टात आले आहे तर गुजरातच्या विजयाने त्यांचे अंतिम सामन्यातील स्थान निश्चित झाले आहे. अंतिम सामन्यात गुजरातसमोर चेन्नईचे आव्हान असेल.(MI vs GT)
मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत गुजरातला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. धुवाधार सुरुवात करत गुजरातच्या सलामीवीरांनी ५४ धावांची सलामी दिली. पॉवरप्लेचा खेळ संपल्यानंतर गुजरातचा पहिला फलंदाज माघारी परतला. व्रीद्धीमान साहा वैयक्तिक १८ धावांवर असतांना पियुष चावलाने त्याला ईशान किशन करवी झेलबाद केले. त्यानंतर मात्र शुभमन गिलने सर्व सूत्रे आपल्या हाती घेत चौफेर फटकेबाजी केली. जबरदस्त फार्मात असलेल्या शुभमन गिलने मागच्या चार सामन्यातील आपले तिसरे शतक पूर्ण करत विक्रम केला.(MI vs GT)
चालू हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे. शुभमन गिलला बाद करणे अगदी अशक्य वाटत असतांना आकाश मधवालने सोळाव्या षटकात त्याला झेलबाद केले. ६० चेंडूत १२९ धावा करत शुभमन गिलने आयपीएल कारकिर्दीतील आपले तिसरे शतक पूर्ण केले. साई सुदर्शनने ३१ चेंडूत ४३ धावा करत त्याला योग्य साथ दिली. शेवटच्या षटकात कर्णधार हार्दिक पांड्याने फटकेबाजी करत संघाची धावसंख्या ३ बाद २३३ इथपर्यंत पोहोचवली.(MI vs GT)
गुजरातने दिलेल्या या विशाल धावसंख्येचा पाठलाग करायला उतरलेल्या मुंबईची सुरुवात काही विशेष झाली नाही. डोळ्याला झालेल्या दुखापतीमुळे ईशान किशन सलामीला फलंदाजी करायला आला नाही. त्याच्या जागी आलेल्या नेहल वढेराला आपली चमक दाखवता आली नाही. अवघ्या ४ धावांवर फलंदाजी करत असतांना मोहम्मद शमीने त्याला पव्हेलीयनचा मार्ग दाखवला. कर्णधार रोहित शर्माला देखील मोक्याच्या सामन्यात आपली छाप सोडता आली नाही. ८ धावांवर असतांना मोहम्मद शमीने त्याचा बळी मिळवला.
========
हे देखील वाचा : IPL मध्ये आतापर्यंत ‘या’ खेळाडूंनी पटकावली आहे ऑरेंज कॅप
========
तिलक वर्माने आक्रमक फलंदाजी करत सामना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याने बाद होण्यापूर्वी १४ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. राशीद खानच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला. सुर्यकुमार यादव आणि कॅमेरून ग्रीन यांनी धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न केला. सुर्यकुमारने ३८ चेंडूत ६१ धावा केल्या तर ग्रीनने २० चेंडूत ३० धावांची खेळी केली. यांच्याव्यतिरिक्त मुंबईच्या कुठल्याही फलंदाजाला चांगली खेळी करता आली नाही आणि त्यांचा डाव १७१ धावांवर गडगडला. आयपीएल प्लेऑफ मधील मुंबईचा हा २०१४ नंतरचा पहिलाच पराभव ठरला.