अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांच्या विरोधात मोठी शोध मोहीम सुरु केली आहे. या शोधमोहीमेत ज्यांच्याकडे योग्य कागदपत्र नाहीत, त्यांना पकडण्यात येत असून त्यांना त्यांच्या मुळ देशात परत पाठवण्यात येत आहे. या सर्व कालावधीत या बेकायदेशीर स्थलांतरितांना ज्या तुरुंगात ठेवण्यासाठी ट्रम्प प्रशासनानं आदेश दिला आहे, त्या तुरुंगाचे नाव ऐकल्यावर कट्टर अतिरेक्यांनाही घाम फुटतो. हा तुरुंग म्हणजे, क्युबा मध्ये असलेला ग्वांतानामो बे तुरुंग. या तुरुंगात अमेरिकेन सैन्यानं पकडलेले सर्व अतिरेकी, गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगार यांना ठेवण्यात येते. या तुरुंगातून बाहेर पडणे मुंगीलाही शक्य नसल्याचे सांगण्यात येते. येथे कैद असलेल्या कैद्यांच्या मनावर मोठा मानसिक आघात होतो. (Guantanamo Bay)
या ग्वांतानामो बे तुरुंगात कैद्यांना जी वागणूक देण्यात येते, त्यावरुनही मोठे वाद निर्माण झाले आहेत. जगातील काही मोजक्या धोकादायक तुरुंगात या ग्वांतानामो बे तुरुंगाचा समावेश होतो. याला नरकाची उपमाही देण्यात आली आहे. याच तुरुंगात आता ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांना ठेवण्याचे आदेश दिल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सरकारसमोर विशिष्ट लक्ष ठेवले आहे. यात अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरितांना वर्षभरात बाहेर काढण्याचे त्यांचे धोरण आहे. यासाठी त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्याच्या क्षणापासूनच पोलीसांना आदेश दिले आहेत. सध्या अमेरिकेमध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांना शोधण्यासाठी विशेष दल स्थापन करण्यात आले आहे. या दलानं पहिल्या दिवसापासून दमदार कामगिरी करत स्थलांतरितांना अटक केली. या स्थलांतरितांना पकडून विमानात नेतानाचे फोटो प्रसिद्ध झाले. विमानातून या स्थलांतरितांना नेमकं कुठे नेण्यात आले, हा प्रश्न विचारण्यात येत होता. (International News)
आता खुद्द ट्रम्प यांनीच याचे उत्तर दिले आहे. या स्थलांतरितांना त्यांच्या देशात परत पाठवण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होईपर्यंत या कैद्यांना क्यूबा येथील ग्वांतानामो बे तुरुंगात ठेवण्यात येणार आहे. ग्वांतानामो बे हे नाव पुढे आल्यापासून अनेक स्थलांतरितांच्या मनात भीतीचा गोळा उठला आहे. कारण ग्वांतानामो बे हा तुरुंग म्हणजे, पृथ्वीवरील नरक म्हणून कुप्रसिद्ध आहे. या तुरुंगात अनेक दहशतवाद्यांना ठेवण्यात आलेले आहे. अशा तुरुगांत रहाण्याच्या कल्पनेनंच अनेकांची पाचावर धारण बसली आहे. ग्वांतानामो बे तुरुंगात कैद्यांना शारीरिक आणि मानसिक छळ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती इतक्या भयानक आहेत की त्यांच्याबद्दल ऐकूनच अंगावर काटा येतो. येथे कैद्यांना अगदी लहान जागेत, पूर्ण अंधारात ठेवले जाते. त्यांना झोपण्याचीही परवानगी देण्यात येत नाही. कैदी जर झोपले तर त्यांना मोठे आवाज करुन उठवण्यात येते. त्यामुळे ग्वांतानामो बे तुरुंगात गेलेल्या कैद्यांचे मानसिक खच्चीकरण होते. (Guantanamo Bay)
अमेरिकेत बेकायदेशीरपणे आलेल्या स्थलांतरितांमध्ये अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत. त्यांनी अमेरिकेत येऊनही गुन्हे केले आहेत. अशांसाठी ग्वांतानामो बे तुरुंगच योग्य असल्याचे मत डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे. ट्रम्प यांनी पेंटागॉन आणि गृह सुरक्षा विभागाला ग्वांतानामो बे येथे 30000 स्थलांतरितांसाठी घरे उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. 1903 मध्ये बांधलेल्या या तुरुंगात दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय असलेल्यांना ठेवण्यात येत आहे. या संशयीतांनी गुन्हा कबूल करेपर्यंत त्यांच्यावर होत असलेले टॉर्चर एवढे भयानक आहे की, 2008 मध्ये माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ग्वांतानामो बे तुरुंग बंद करण्यात यावा अशी मागणी केली होती. (International News)
==============
हे देखील वाचा : Donald Trump : ऑर्डर टू डिपोर्ट
Donald Trump : पुतिनच्या वाटेवर ट्रम्प !
===============
याच तुरुंगात अमेरिकेतील 9-11 कटात सहभागी असलेल्या खालिद शेख मोहम्मद आणि यूएसएस कोल बॉम्बर अब्द अल-रहीम अल-नासिरी यांच्यासह इतर आरोपींना ठेवण्यात आलेले आहे. 9-11च्या हल्ल्यानंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून पकडलेल्या अल कायदाच्या सदस्यांसह भयानक दहशतवादी आणि संशयितांना याच तुरुंगात ठेवण्यात आलेले आहे. आता त्यांच्यात अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरितांना ठेवण्यात येणार आहे. ट्रम्प यांनी तुरुंगात 30 हजार कैद्यांची व्यवस्था करण्याचे आदेश दिल्यामुळे अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतरितांना पकडण्याची मोहीम तीव्र होणार असे संकेत आहेत. (Guantanamo Bay)
सई बने