Home » ग्रीनचे तडाखेदार शतक, मुंबई विजयी !

ग्रीनचे तडाखेदार शतक, मुंबई विजयी !

by Team Gajawaja
0 comment
MI vs SRH
Share

कॅमेरून ग्रीनचे धुवाधार शतक आणि कर्णधार रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या बळावर मुंबईने हैद्राबादवर (MI vs SRH) ८ गडी आणि १२ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला. वानखेडे स्टेडीयमवर झालेल्या या सामन्यात हैद्राबादने मुंबईसमोर २०० धावांचे लक्ष ठेवले होते. लक्षाचा पाठलाग करणाऱ्या मुंबईची सुरुवात खराब झाली. सलामीवीर ईशान किशन अवघ्या १४ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर माघारी परतला.

ईशान बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या कॅमेरून ग्रीन आणि कर्णधार रोहित शर्माने मुंबईचा डाव सांभाळला. मिळालेल्या दोन जीवदानांचा फायदा घेत रोहित शर्माने आपले अर्धशतक पूर्ण केले. ग्रीन आणि रोहित यांनी दुसऱ्या गड्यासाठी १२८ धावांची मजबूत भागीदारी करत संघाला विजयाच्या जवळ आणून ठेवले. ३७ चेंडूत ५६ धावा ठोकणाऱ्या रोहित शर्माला मयंक डागरने झेलबाद केले. (MI vs SRH)

रोहित शर्माने मुंबईकडून खेळतांना पाच हजार धावा पूर्ण करण्याचा मान मिळवला. एका संघाकडून खेळतांना पाच हजार धावांचा टप्पा गाठणारा आयपीएलच्या इतिहासातील तो केवळ दुसरा खेळाडू ठरला. यापूर्वी विराट कोहलीने बंगळूरूकडून खेळतांना ही किमया साधली आहे. (MI vs SRH)

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर ग्रीनने आपली फटकेबाजी सुरूच ठेवली. सुर्यकुमार यादवने देखील त्याला योग्य साथ दिली. त्याने १६ चेंडूत २५ धावांची खेळी केली. ग्रीनने मैदानाच्या चारही बाजूला फटकेबाजी करत आयपीएल कारकिर्दीतील आपले पहिले शतक पूर्ण केले. त्याने अवघ्या ४७ चेंडूत ८ चौकार आणि ८ षटकार ठोकत १०० धावा केल्या. ग्रीनच्या या शतकी खेळीच्या बळावर मुंबईने १८ षटकातच विजयाला गवसणी घातली. मुंबईकडून शतक झळकावणारा ग्रीन सहावा खेळाडू ठरला. सनथ जयसूर्या, सचिन तेंडूलकर, रोहित शर्मा, लेंडल सिमन्स आणि सुर्यकुमार यादव या खेळाडूंनी यापूर्वी मुंबईकडून शतकी खेळी करण्याचा पराक्रम आपल्या नावावर केला आहे. (MI vs SRH)

तत्पूर्वी हैद्राबादला विवरांत शर्मा आणि मयंक अग्रवाल यांच्या तडाखेबंद फलंदाजीच्या बळावर चांगली सुरुवात मिळाली. विवरांत शर्माने ४७ चेंडूत ६९ धावा ठोकल्या तर मयंक अग्रवालने ४६ चेंडूत ८३ धावांची खेळी केली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी १४० धावांची भागीदारी करत हैद्राबादला जलद सुरुवात मिळवून दिली.(MI vs SRH)

========

हे देखील वाचा : IPL मध्ये आतापर्यंत ‘या’ खेळाडूंनी पटकावली आहे ऑरेंज कॅप

========

आकाश मधवालने विवरांत शर्माला माघारी पाठवत या भागीदारीला ब्रेक लावला. त्याच्यापाठोपाठ मयंक अग्रवालदेखील माघारी परतला. चांगल्या सुरुवातीनंतरदेखील हैद्राबादच्या मध्यफळीतील फलंदाजांना चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन करता आले नाही आणि त्यांचा डाव ५ बाद २०० धावांपर्यंतच पोहोचू शकला. हेन्री क्लासेन, ग्लेन फिलीप, मार्क्रम आणि हरी ब्रूक हे फलंदाज चमक दाखवण्यास अपयशी ठरले.

मुंबईकडून ख्रिस जॉर्डनने ४ षटकात ४२ धावा देत १ बळी मिळवला. युवा आकाश मधवालने शेवटच्या षटकांत अप्रतिम मारा करत ४ षटकात ३७ धावा देत ४ फलंदाजांना माघारी परतवले. या दोघांव्यतिरिक्त मुंबईच्या इतर गोलंदाजांना बळी मिळवण्यात अपयश आले. हैद्राबादकडून भुवनेश्वर कुमार आणि मयंक डागर हे दोनच गोलंदाज बळी मिळवण्यात यशस्वी ठरले. भुवनेश्वरने २६ धावा देत तर डागरने ३७ धावा देत १ बळी मिळवला.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.