यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता या वर्षी दहीहंडी उत्सव रद्द झाल्या असल्या तरी दहीहंडी समन्वय समितीच्या वतीने ह्यावर्षी कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी हा सण ‘महारक्तदान शिबिर’ आयोजित करून साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ह्या संदर्भात तशी प्रारंभिक सूचना समितीने केली आहे तसेच प्रशासकीय यंत्रणेबरोबर नुकतीच एक बैठक संपन्न झाली.
‘राज्य रक्त संक्रमण परिषद‘ चे असिस्टंट डायरेक्टर ‘डॉ. अरुण थोरात सर’ ह्यांच्या दालनात हे ‘महारक्तदान शिबिर‘ कसे आखण्यात यावे ह्याची सविस्तर चर्चा करण्यात आली असून. ह्यावेळी समितीच्या वतीने बाळा पडेलकर, अरुण पाटील, अभिषेक सुर्वे, किरण म्हात्रे, समीर सावंत व विनायक बांदेकर हे उपस्थित होते.
सध्या कोरोना मूळे राज्यातील हॉस्पिटलमध्ये रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे हे रक्तदान शिबिर हे एकाचं दिवशी आयोजित करण्यापेक्षा जवळपास पंधरा दिवसाचा करण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे हे रक्तदान शिबिर हे एकाच दिवशी करण्याऐवजी विभागवार किंवा इच्छुक गोविंदा पथकांच्या उपलब्धतेप्रमाणे ह्या २५ जुलैपासून ते गोपाळकाला पर्यंत (१२ ऑगस्ट) आयोजित करण्यात येणार आहे असे मत समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांनी व्यक्त केले .
कोरोना मुळे रक्तदान करताना प्रचंड काळजी घ्यावी लागणार आहे आणि ती काटेकोरपणे घेतली जाईल ह्याची काळजी घेऊन हा उपक्रम हाती घ्यावा. रक्तपेढीच्या वतीने सॅनिटायझर, थर्मल टेस्टर, ऑक्सिमिटर ही व्यवस्था असणार आहे. प्रत्येक रक्तदान झाले की तो बेड सॅनिटाईज केला जाईल. आपण फक्त आपल्या मंडळाकडून कुठलाही कोरोना बाधित पेशंट तिथे येणार नाही ह्याची काळजी घ्यावी असे समन्वय समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
तसेच रक्तदान करताना गर्दी होऊ नये म्हणून आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी आधी रक्तदात्याचे रजिस्ट्रेशन होईल व त्याला अमुक वेळ देण्यात येईल. त्यासाठी आपण आपल्याकडून कोण रक्तदाता इच्छुक आहे ह्याची यादी बनवायची आहे व समितीकडे/ रक्तपेढी कडे जमा करायची आहे. जेणेकरून त्यादिवशी कुठलाही गोंधळ उडणार नाही.
जर एखादा मंडळ स्वतंत्ररित्या हे रक्तदान शिबिर करू इच्छित असेल तर त्या रक्तदान शिबिर आयोजनाची तारीख, एकूण अंदाजे रक्तदाते ह्यांची संख्या हे समितीला लवकरात लवकर कळवावे, जेणेकरून समितीला ह्या संदर्भात पुढील पावले उचलता येतील.
महत्वाची गोष्ट म्हणजे जसे की काही मंडळ, आयोजक दहीहंडी पूर्वी ‘सराव शिबीर’ (चोरहंडी) आयोजित करतात त्याचप्रमाणे ह्यावर्षी ‘रक्तदान शिबीर’ ह्याचे आयोजन करावे असे आवाहन समिती तर्फे करण्यात येत आहे. आपल्याला ह्या मधल्या दिवसात कधीही जर हे ‘रक्तदान शिबीर’ आपल्या इथे आयोजित करायचे असेल तर आपण संध्याकाळच्या वेळेत देखील हे आयोजन करू शकतो , म्हणजे सकाळी कामावर गेलेले रक्तदाते संध्याकाळी रक्तदान करू शकतात’, तशी देखील व्यवस्था आपण करू शकतो पण तसे आपण समितीला आगाऊ कळवायला हवं असे देखील समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.