वाराणसी येथील काशी विश्वनाथ कॉरिडोरची भव्यता दिवसेंदिवस वाढत आहे. यावर्षाच्या सुरुवातीस काशी विश्वनाथ (Kashi Vishwanath Dham) कॅरिडोरला भेट देणा-या पर्यटकांच्या संख्येनं विक्रम केला आहे. आता याच बाबा भोलेनाथांच्या भक्तांसाठी आणखी एक खुशखबर आली आहे. बाबा भोलेनाथांचे भक्त काशी विश्वनाथ धाममध्ये रात्रीही राहू शकणार आहेत. यासोबत हे भक्त या कॅरिडोर परिसरातील रात्रीची नयनरम्य रोषणाई पाहू शकणार आहेत आणि बाबा विश्वनाथाच्या पहाटेच्या आरतीसाठीही उपस्थित राहू शकणार आहेत. आतापर्यंत रात्री 11 वाजेपर्यंत हा बाबा विश्वनाथांचा संपूर्ण कॉरिडॉर रिकामा करण्यात येत असे. त्यानंतर रात्री अडीच वाजता मंगला आरतीसाठी भाविकांना प्रवेश मिळत असे. मात्र आता हेच भाविक याच परिसरात राहू शकणार आहेत.
बाबा विश्वनाथ कॉरिडॉरमध्ये बांधलेले गेस्ट हाऊस सुरू झाल्यानं ही सुविधा उपलब्ध झाली आहे. आता बाबा भोलेनाथांचे भाविक गेस्ट हाऊसमध्ये संपूर्ण रात्र राहू शकणार आहेत. काशी विश्वनाथ कॉरिडॉर ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. त्यात हे थ्री स्टार हॉटेलसारख्या सुविधा असलेले गेस्ट हाऊस बांधण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे गेस्ट हाऊस काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या आत आणि गंगेच्या काठावर बांधण्यात आले आहे. यामुळे रात्रीच्या वेळी भाविकांना रोषणाईचा आनंद घेता येणार आहे. या गेस्ट हाऊसमध्ये आलिशान सुविधांसह डॉर्मिटरीज देखील उपलब्ध आहेत.

भीमशंकर भवन नावाच्या गेस्ट हाऊसमधील खोल्यांचे बुकिंग ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. येथे राहणाऱ्यांसाठी टूर पॅकेजची व्यवस्थाही करण्यात आली आहे. एसी वसतिगृहातील खोलीचे भाडे 560 रुपये आहे. वसतिगृहात एकूण 36 खाटा बसवण्यात आल्या आहेत. गेस्ट हाऊसच्या तीन मजल्यांमध्ये एकूण 18 खोल्या उपलब्ध आहेत. एका खोलीत दोन बेड ठेवण्यात आले आहेत. www.southerngrandkashi.com ला भेट देऊन लोक रूम बुकिंग आणि गेस्ट हाऊसची माहिती मिळवू शकणार आहेत.
श्रीकाशी विश्वनाथ धाम (Kashi Vishwanath Dham) येथे शिवरात्री, श्रावण महिना आणि काशीतील इतर उपवासांनाही भाविकांना फळे दिली जाणार आहेत. याच कॅरिडोरमध्ये भव्य फूड कोर्टही उभारण्यात येत आहे. फूड कोर्टमध्ये भोले बाबांच्या भक्तांना उपवासाची थाळीही देण्यात येणार आहे. सध्या काशी विश्वनाथ धाम (Kashi Vishwanath Dham) येथे जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. भाविकांची वाढती संख्या पाहता योगी सरकारने यात्रेकरूंना आवश्यक असलेल्या सुलभ दर्शनासोबतच धाममध्ये अशी सर्व व्यवस्था केली आहे. धाममध्ये राहण्यापासून ते खाण्यापर्यंत सर्व आवश्यक गोष्टी भाविकांना उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.
काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या निर्मितीपासून बनारसमधील पर्यटन उद्योगाने मोठी झेप घेतली आहे. मध्यंतरी आलेल्या कोरोनाच्या मंदीमुळे पर्यटन क्षेत्राची मोठी हानी झाली होती. मात्र काशी कॅरिडोरच्या निर्मितीपासून या भागात पर्यटकांची संख्या पाचपट वाढली असून हॉटेल व्यावसायिक आणि त्यावर अवलंबून असलेल्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. काशी कॉरिडॉर पर्यटन उद्योगासाठी जॅकपॉट ठरत आहे. सध्या महिन्याला सुमारे 20 ते 30 लाख पर्यटक काशीला पोहोचत आहेत. सुट्टीच्या दिवशी ही संख्या दुप्पट होत असल्यानं या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. (Kashi Vishwanath Dham)
बनारसमध्ये पूर्वी ठराविक हॉटेल होती. मात्र आता इतर अनेक हॉटेल्स बांधली जात आहेत. लहान-मोठ्या मिळून सुमारे 1200 हॉटेल्सची नोंदणी झाली आहे. तसेच गेस्ट हाऊस किंवा काही घरांमध्येही पर्यटकांची सोय करण्यात येत आहे. या पर्यटकांमध्ये परदेशी पर्यटकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या भागात होणारी विकासकामे सोबत असलेली स्वच्छता परदेशी पर्यटकांना आवडल्याचे स्पष्ट होत आहे.
======
हे देखील वाचा : तुंगनाथ मंदिराबाबत इशारा
======
काशी कॉरिडॉरच्या निर्मितीनंतर प्रत्येक क्षेत्रात अनेक पटींनी वाढ झाली आहे. सध्यस्थितीत काशीमध्ये दर महिन्यातील सर्व दिवस हॉटेल बुक असतात. तसेच वाहतूक व्यवस्था करणारेही आलेल्या पर्यटकांमध्ये व्यस्त असतात. बाबा विश्वनाथाच्या मंदिराला भेट देणा-या भाविकांची संख्या वाढल्यामुळे फुले आणि पुजेच्या वस्तूंची विक्री करणा-यांकडेही मोठ्या प्रमाणात मागणी असते. बाबा विश्वनाथ कॅरिडोरचे काम सध्या जोमानं सुरु आहे. हे काम पूर्ण झाल्यावर भक्तांचा हा ओघ यापेक्षाही वाढणार आहे.
सई बने