रोजच्या जेवणात राई आणि जिरे या दोन मोठ्या गोष्टी असतात. भाजीची किंवा डाळीची फोडणी द्यायची असेल तर मसाल्याच्या डब्यात या दोन गोष्टी लागतातच. त्यातही जिरे हे सर्वात महत्त्वाचे ठरते. विशेषतः उष्णतेमध्ये जि-याचा वापर हा औषधासारखा होतो. याच जि-याची चर्चा सध्या राजस्थानमध्ये होत आहे. राजस्थानमध्ये (Rajasthan) जि-याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. या जि-याला राजस्थानच्या बाजारात सोन्यापेक्षाही जास्त भाव मिळाला आहे, त्यामुळे सध्या राजस्थानच्या जि-याची चर्चा चालू आहे. राजस्थानच्या (Rajasthan) बाजारात जि-याची उलाढाल थोडीथोडकी नाही तर एका दिवसात 1 अब्ज रुपयांची झाली. आत्तापर्यंत झालेली ही सर्वात मोठी उलाढाल मानली गेली आहे.
राजस्थानच्या (Rajasthan) जि-याला जगभरात मोठी मागणी आहे. साधारण मार्च-एप्रिलमध्ये हे जिरे विकण्यासाठी बाजार समितीमध्ये आणले जाते. यावर्षी याच जि-यांनी शेतक-यांना मालामाल केले आहे. सोन्यापेक्षाही जि-याला किंमत मिळाल्यामुळे शेतकरी खुश झाले आहेत. राजस्थानच्या या बाजार समितीमध्ये 50,000 रुपये प्रति क्विंटल, म्हणजे 500 रुपये किलो दराने जिरे विकले गेले. जिऱ्याचा हा भाव जगातील आतापर्यंतचा उच्चांक ठरला आहे. भारतातील जिऱ्याची सर्वात मोठी बाजारपेठ गुजरातमधील उंझा बाजार समिती मानण्यात येते. तेथीही जि-याला 42 हजार रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला. त्यामुळे गुजरातच्या जि-यावर राजस्थानच्या (Rajasthan) जि-याला भाव मिळाल्याची चर्चा आहे. जि-याचा हा चढता भाव बघून मेरता बाजारात 700 हून अधिक शेतकऱ्यांनी एकाच दिवसात सुमारे 15,000 क्विंटल जिरे विकण्यास आणले. त्यामुळे बाजारात अभूतपूर्व असे दृष्य होते. सर्वत्र जि-याच्या गोणी पाहायला मिळाल्या आणि त्यासोबत जि-याचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. यामुळे पहिल्यांदाच मेरता बाजार रात्रभर सुरू होता. गेल्या वर्षभरात जि-याची मागणी वाढली आहे, परिणामी जिऱ्याचे दर दुप्पट झाले आहेत. हे भाव असेच चढे राहतील असा अंदाज असल्यामुळे जिरे पिकवणा-या शेतक-यांनी आनंद व्यक्त केला आहे.
मेरता बाजारातील अनेक व्यापा-यांनी या जि-याच्या वाढलेल्या दराबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. जिऱ्याच्या दरानं जशी उसळी घेतली, त्यानं आश्चर्य वाटल्याचे व्यापारी सांगतात. गेल्या वर्षी जि-याची किंमत 18 ते 20 हजार रुपये होती. त्यानंतर जिरे 25 हजारांपर्यंत पोहोचले. परंतु यावर्षी त्यानं चांगलीच उसळी घेतली. आता जिरे दुप्पट किंमतीत विकू लागले आहे. ही तेजी सोन्यापेक्षाही जास्त होती. यामुळे व्यापारी आश्चर्य चकीत झाले असले तरी जिरे पिकवणारे शेतकरी मात्र खूष झाले आहेत. कारण जिरे पिकवणे मोठे कष्टाचे काम असते. जिऱ्याची पेरणी हिवाळ्यात केली जाते. कडाक्याच्या थंडीत रात्री पाणी द्यावे लागते. याशिवाय जिऱ्यामध्ये अनेक प्रकारचे आजारही होतात. अगदी थोडीशी थंडी देखील त्याचे नुकसान करू शकते. राजस्थानमध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापासून जिऱ्याची पेरणी सुरू होते. मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात जिऱ्याची काढणी सुरू होते. आता यावर्षी आलेल्या जि-याच्या भावामुळे राजस्थानात जि-याचे उत्पादन वाढेल अशी आशा आहे. राजस्थानच्या (Rajasthan) मिरता बाजारात 34 हजार रुपये प्रतिक्विंटलपासून जि-याचा दर सुरु झाला. हाच दर एप्रिलपर्यंत थेट 50 हजारांवर येऊन थांबला. पहाटे चार वाजेपर्यंत वजनकाटणीचे काम सुरू होते. मेरता मंडईच्या इतिहासात प्रथमच एकाच दिवसात शंभर कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे सांगण्यात येते.
=======
हे देखील वाचा : पूर्ण झोप झाली तरीही अंग का दुखते?
======
सध्या भारतीय जि-याला परदेशात मोठी मागणी आहे, त्यामुळेही जि-याचे दर वाढल्याचे सांगण्यात येते. तुर्कस्तान-सीरियामध्ये जि-याचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते, मात्र तेथे अवकाळी पावसामुळे जिऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळेच एकट्या राजस्थानमध्ये 1 जानेवारीपासून 1.60 लाख क्विंटल जिऱ्याची बाजारात आवक झाली असून, सुमारे 4 अब्ज रुपयांचा व्यवसाय झाला आहे.
राजस्थानमधील (Rajasthan) जिरे सुवासिक आणि उच्च दर्जाचे आहे. येथील जालोर, पाली, जैसलमेर, जोधपूर आणि बारमेर या भागात मोठ्याप्रमाणात जिरे पिकवले जाते. भारत हा जगातील सर्वात मोठा जिरे उत्पादक देश आहे. भारतातून चीन, सिंगापूर, बांगलादेश, अफगाणिस्तान, सौदी अरेबिया, नेपाळ, अमेरिका, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका यासह इतर युरोपीय आणि अरब देशांमध्ये जिऱ्याची निर्यात केली जाते. त्यात राजस्थानमधील जि-याला मोठी मागणी असते. आता त्यात या जि-याला सोन्याचा भाव मिळाल्यामुळे राजस्थानचे जिरे उत्पादन घेणारे शेतकरी खूष झाले आहेत.
सई बने