सूरत या गुजरातमधील शहराला भारताची डायमंड सिटी म्हणून ओळखले जाते. सूरतमध्ये जगभरातील हि-यांचे व्यापारी खरेदी विक्रीसाठी येतात. या सूरत सारखे एक शहर महाराष्ट्रातही आहे. अर्थात हे शहर म्हणजे, महाराष्ट्राचे डायमंड नाही, तर गोल्ड सिटी म्हणून ओळखले जाते. हे शहर म्हणजे, जळगाव. उत्तर महाराष्ट्रातील जळगावला महाराष्ट्राची ‘गोल्ड सिटी’ म्हणून ओळखले जाते. कारण सर्वात शुद्ध सोने जळगावमध्ये मिळते आणि या सोन्याचा भावही चांगला असतो. त्यामुळे सोन्याचे दर कितीही चढले तरी जळगावच्या सराफा बाजारातील दुकानांमधील गर्दी कमी होत नाही. (Jalgaon)
महाराष्ट्राभरातून अनेकजण या दुकांनात सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी गर्दी करतात. आता दिवाळी आणि त्यानंतर येणा-या लग्नसराईसाठी याच जळगावमधील ज्वेलर्समध्ये मोठी गर्दी होत आहे. पिढीजात सोन्या चांदीची विक्री करणारे येथील ज्वेलर्सच्या दुकानात जुन्या ते आधुनिक पद्धतीच्या दागिन्यांची निर्मिती केली जाते. त्यामुळे भारतभरातील नावाजलेले सुवर्णकलाकार येथे आहेत. जळगावचे सोने आणि त्यातील चमक कशी वाढत आहे, हे जाणणे उत्सुकतेचे आहे. सोन्याच्या किंमत ही स्थानिक ज्वेलर्स, आयात कर आणि आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किमतींवर अवलंबून असते. सोन्याची मागणी आणि पुरवठा यांचाही त्यांच्या किमतीवर परिणाम होतो. जळगावसारख्या शहरात मोठ्या प्रमाणात हे व्यवहार होतात. सोने खरेदी हा भारतीयांचा आवडीचा विषय आहे. (Social News)
अगदी एक ग्रॅमपासून सोने खरेदी केली जाते. आता येणा-या गुरु पुष्य योगाला किमान एकग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी अनेकांची गर्दी होते. तर दिवाळीला लक्ष्मीपुजनालाही अशीच सोन्याची खरेदी होते. शिवाय लग्नसराईमध्ये सोन्याची खरेदी केली जाते. सोन्याचे भाव आभाळाला पोहचले तरी भारतीय सोन्याच्या खरेदीमध्ये अव्वल आहेत. कारण भारतीय सोने खरेदी ही गुंतवणूकीच्या दृष्टीने अधिक करतात. अशावेळी आपण खरेदी करीत असलेले सोने ही शुद्ध असेल याची ते आधी खात्री करुन घेतात. यामध्ये जळगाव हे पहिल्या क्रमांकावर आहे. जळगावमधील अनेक सोन्यांच्या पिढ्या जशा वंशपरंपरागत आहेत. तसेच त्यांच्या कडील ग्राहकही वंशपरंपरागत आहेत. येथे सर्व प्रकारचे सोन्याचे दागिने पुरवणारी अनेक दुकाने आहेत. अगदी भारताच्या प्रत्येक प्रांतातील वैशिष्ठ्यांचे सोन्याचे दागिने जळगावमध्ये तयार होतात. त्यामुळे जळगावमध्ये जुने सोन्याचे दागिने देऊन नवीन घडवणा-यांची संख्याही अधिक असते. (Jalgaon)
या सर्वात जळगावमध्ये सोन्याचा भाव कसा ठरतो हे जाणण्यासारखे आहे. देशातील निर्यात आणि आयातीतील चढ-उतार सोन्याच्या किमतीवर परिणाम करतात. भारत सोन्याची आयात डॉलरमध्ये करतो. हा दर वाढला की आयात खर्च वाढतो आणि जळगावात सोन्याचा भाव वाढतो. मागणी आणि पुरवठा परिस्थितीचा परिणाम जळगावातील रोजच्या सोन्याच्या दरावर होतो. जळगावमध्ये सोने हे शुद्ध असले तरी ग्राहकांना आपण खरेदी करत असलेल्या सोन्याची शुद्धता पडताळून बघण्याचेही सांगितले जाते. 24 कॅरेट सोने हे शुद्ध असते. पण त्यासोबत 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोनेही उपलब्ध असते. अशी फसवणूक होऊ नये म्हणून जळगाव ज्वेलर्ल असोसिएशनतर्फे हॉलमार्क असलेल्या सोन्याच्या दागिन्यांची खरेदीचा आग्रह केला जातो. (Social News)
======
हे देखील वाचा : नव्याची आशा !
======
सध्या जळगावमधील सराफा बाजार हा ग्राहकांच्या गर्दीनं फुलला आहे. दिवाळीसाठी नव्या दागिन्यांची घडणावळ चालू आहे. सोबत चांदी कितीही तेजीत असली तरी चांदीच्या दागिन्यांचीही येथून मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. यामुळेच जळगावला सोन्याचे क्लस्टर बनवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे मत महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनीही व्यक्त केले आहे. राज्यपाल राधाकृष्णन यांनी जळगावातील सोन्याच्या व्यापाराची मोठी उलाढाल पाहून महाराष्ट्राच्या या गोल्डसिटीची किर्ती सर्वदूर होण्यासाठी अधिक प्रयत्न होण्याची गरज असल्याचे सांगितले. उद्योग आणि नोकरशहा यांनी यासाठी एकत्र काम करावे असे आवाहनही त्यांनी केले. सूरत येथे डायमंड व्यवसायासाठी आवश्यक असे अभ्यासक्रम चालवण्यात येतात. भविष्यात जळगावमध्येही सोने व्यापारासंबंधी आणि त्यातील डिझाईन संदर्भात अभ्यासक्रम सुरु झाले तर एक नवे क्षेत्र तरुणांसाठी उपलब्ध होणार आहे. (Jalgaon)
सई बने