Home » केदारनाथ यात्रेला जाताय; ‘हे’ नवीन नियम ठेवा लक्षात…

केदारनाथ यात्रेला जाताय; ‘हे’ नवीन नियम ठेवा लक्षात…

by Team Gajawaja
0 comment
Kedarnath Yatra
Share

समस्त हिंदूसाठी अत्यंत पवित्र अशी केदारनाथ यात्रा (Kedarnath Yatra) 25 एप्रिलपासून सुरु होत आहे. या यात्रेसाठी लाखो भाविक येतात. त्याअनुशंगानं प्रशासनानं तयारी चालू केली आहे. मात्र बदलत्या हवामानाचा या तयारीला फटका बसत आहे. आताही केदारनाथ मार्गावर 10 ते 15 फूट बर्फ आहे. हा बर्फ हटवून यात्रेकरुंसाठी मार्ग करण्याचे काम चालू आहे. आता बाबा केदारनाथाची यात्रा अधिक सुखकर करण्यासाठी प्रशासनानं दर्शन टोकन पद्धती रुजू केली आहे. केदारनाथची यात्रा करणा-या यात्रेकरुंनी हा नवीन नियम जाणून घेणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी केदारनाथाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी एकाच वेळी गर्दी केल्यामुळे भाविकांना एकाच जागी तासतासभर उभे रहावे लागले.  त्यामुळे यावर्षीपासून भाविकांना बाबा केदारनाथाचे दर्शन अधिक सुलभ व्हावे म्हणून या टोकन पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. (Kedarnath Yatra) 

चारधाम यात्रेपूर्वी उत्तराखंड पर्यटन विभागाने नवीन योजना लागू केली आहे. 25 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या केदारनाथ यात्रेत (Kedarnath Yatra) यंदा टोकन प्रणाली लागू होणार आहे. या यात्रेला देश-विदेशातून लाखो भाविक येतात. त्यांना अधिक सुलभरित्या दर्शन करण्यासाठी या पद्धतीचा उपयोग होणार आहे. केदारनाथ धामचे दरवाजे 25 एप्रिलला उघडणार असले तरी या यात्रेचे बुकींग आधीपासूनच सुरु झाले आहे. येथे हेलिकॉप्टरही भाविकांच्या सुविधेसाठी आहेत. हेलिकॉप्टरचे बुकींग मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हाऊसफूल झाले आहे. त्यावरुनच किती यात्रेकरु यावेळी केदारनाथाच्या चरणी येणार आहेत, याची कल्पना येते. केदारनाथ हे भारतातील उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील पवित्र हिंदू मंदिर आहे. हिमालयातील चार धामांपैकी हा एक धाम आहे. केदारनाथ मंदाकिनी नदीच्या मुखाजवळ वसलेले आहे. अत्यंत उंचीवर असलेल्या या तिर्थस्थळापर्यंत जाण्यासाठी लाखो भाविक येत असले तरी तिथल्या बदलत्या हवामानाचा फटका त्यांना बसतो.(Kedarnath Yatra)  

केदारनाथ मंदिर हे भव्य बर्फाच्छादित गढवाल हिमालयाच्या रांगांमध्ये वसलेले आहे. या केदारनाथाच्या यात्रेसाठी (Kedarnath Yatra) जगभरातून लाखो भाविक येतात. प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन यंदा टोकन पद्धत लागू करण्यात आली आहे. उत्तराखंड पर्यटन विभाग या सर्वांचे नियोजन करत आहे.  टोकन बुक करुन येणारे भक्त केदारनाथ धामला (Kedarnath Yatra) भेट देऊ शकतील. पहिल्या टप्प्यात टोकन देण्यासाठी पाच काउंटर उभारण्यात आले असून त्यासोबतच भाविकांची ऑफलाइन नोंदणीही केली जाणार आहे. यासोबतच प्रवाशांची बायोमेट्रिक नोंदणीही केली जाणार आहे.

भगवान केदारनाथच्या या यात्रेसाठी (Kedarnath Yatra) आता काही दिवसच उरले आहेत. त्यामुळे प्रशासनाची धावपळ सुरु झाली आहे. केदारनाथमध्ये चांगली व्यवस्था करण्यात जिल्हा प्रशासन गुंतले आहे, परंतु हवामान प्रशासनासाठी आव्हान ठरत आहे. केदारनाथ मंदिराकडे जाणारे रस्ते अजूनही बर्फांनी व्यापले आहेत. हवामान स्वच्छ झाल्यास केदारनाथ आणि आसपासचा बर्फ वितळेल आणि काम पुढे होईल, अशी आशा प्रशासनानं व्यक्त केली आहे.  

केदारनाथ धाममध्ये (Kedarnath Yatra) अजूनही 10  फुटांपेक्षा जास्त जाडीच्या बर्फाची चादर आहे. यासोबत ज्या जागेवर भाविकांसाठी तंबू वसाहत उभारण्यात येते ती सर्व जागाही अद्याप बर्फांनं व्यापली आहे. केदारनाथाकडे जाणारा रस्ताच त्यामुळे खंडित झाला आहे. अशा परिस्थितीत पाण्याची व्यवस्था करतानाही परिश्रम करावे लागत आहेत. तत्सम यंत्रणा दुरुस्त केल्या जात आहेत. 15 एप्रिलपर्यंत केदारनाथ धाममधील काम पूर्ण होईल, असे सांगण्यात येत आहे. सर्व विभागांना हे काम पूर्ण करण्यासाठी 20 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

========

हे देखील वाचा : ‘या’ कल्चरल सेंटरमध्ये भारताच्या कानाकोप-यातील संस्कृतीचे दर्शन घडणार

=======

चारधाम यात्रा 2023 साठी 13 दिवसात 2 लाख भाविकांनी नोंदणी केली आहे. यावेळी प्रवाशांना वायफायची सुविधाही मिळणार आहे. केदारनाथसाठी 1.12 लाख आणि बद्रीनाथसाठी 92 हजार यात्रेकरूंनी नोंदणी केली आहे. पर्यटन विभागातर्फे ही नोंदणी 21 फेब्रुवारीपासून खुली करण्यात आल्यावर भाविकांची एकच गर्दी उसळली आहे. गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे पोर्टल उघडण्याची तारीख औपचारिकपणे निश्चित झाल्यानंतरच दोन्ही धामांसाठी नोंदणी सुरू केली जाणार आहे. या यात्रेसाठी भाविकांची वाढती संख्या पाहता त्यांची व्यवस्था ठेवण्यासाठी आता नव्या पर्यायांचा विचार होत आहे. त्यातूनच केदारनाथासाठी आता टोकन पद्धत सुरु करण्यात येणार आहे. तसेच यावेळी भाविकांना वायफायची सुविधाही मिळणार आहे. 2018 मध्ये प्रशासनाने केदारनाथ यात्रा (Kedarnath Yatra) मार्गावर नऊ ठिकाणी मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली होती,  त्याचाच हा पुढचा टप्पा आहे. आता 25 एप्रिलपासून यात्रा सुरु झाल्यावर प्रशासनाची खरी परीक्षा ठरणार आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.