देवभूमी उत्तराखंडामध्ये अनेक प्राचीन मंदिरे आहेत. या मंदिरांमध्ये भाविकांची सदैव गर्दी असते. या मंदिरांमध्ये एक प्रमुख मंदिर आहे, ते म्हणजे माता सुरकंदा देवीचे मंदिर(Surkanda Devi). देवीच्या 51 शक्तीपिठांपैकी हे एक शक्तीपिठ आहे. या माता सुरकंदा देवीच्या (Surkanda Devi) मंदिरात अधिक श्रावण महिन्यानिमित्त भक्तांची गर्दी झाली असून देवीचे दर्शन आणि तिचा अनोखा प्रसाद घेण्यासाठी देश-विदेशातून भक्त येत आहेत.
देवभूमी उत्तराखंडच्या टिहरी जिल्ह्यात असलेले सुरकंदा देवीचे मंदिर वर्षाचे बाराही महिने भक्तांनी गजबजलेले असते. पण आताच्या अधिक श्रावणानिमित्त या गर्दीत वाढ झाली आहे. आणखी एक कारण म्हणजे, देवीचा प्रसाद म्हणून येथे विशिष्ट झाडांची पानं दिली जातात. या झाडांची कोवळी पानं मिळवण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं या भागात येत आहेत. माता सुरकंदा देवीचे मंदिर हे अत्यंत सुंदर अशा पर्वतावर आहे. समुद्रसपाटीपासून 9,995 फूट उंचीवर असलेल्या या मंदिरात काली देवीची मूर्ती आहे. केदारखंड आणि स्कंद पुराणात या मंदिराचा महिमा सांगण्यात आला आहे. या मंदिरात देवी कालीची पूजा केल्यावर मनोकामना पूर्ण होते, असा उल्लेख केदारखंडमध्ये आहे.
देवराज इंद्राने या ठिकाणी प्रार्थना करून आपले हरवलेले राज्य परत मिळवल्याची कथाही सांगण्यात येते. माता सुरकंदा देवीच्या दर्शनानेच भक्त पावन होतात. त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होतात. देशभरात माता सतीची जी 51 शक्तीपिठं आहेत, त्यातील हे सुरकंदा देवीचे (Surkanda Devi) मंदिर प्रमुख आहे. माता सतीची कहाणी यामागे सांगितली जाते.
पौराणिक कथेनुसार, राजा दक्षाची कन्या सती हिने भगवान शंकराला आपला वर म्हणून निवडले होते. पण राजा दक्षाला जावई म्हणून भगवान शंकराला स्विकारु शकत नव्हता. एकदा राजा दक्षाने वैदिक यज्ञ आयोजित केला. यामध्ये सर्वांना आमंत्रित केले पण भगवान शंकर आणि देवी सती यांना आमंत्रण देण्यात आले नाही. आपल्या वडिलांनी एवढा मोठा यज्ञ केला आहे, त्याला आपण जाऊया म्हणू देवी सतीनं हट्ट धरला. भगवान शंकर यांनी देवी सती यांना या यज्ञाला जाण्यासाठी सांगितले. वडिलांच्या घरी गेलेल्या देवी सती यांना यक्षानं मानाची वागणूक दिली नाही. शिवाय भगवान शंकराचा अपमान केला. आपल्या पतीचा अपमान आपल्यामुळेच झाला, हे जाणल्यामुळे व्यथित झालेल्या देवी सती यांनी त्याच यज्ञकुंडात प्राणाची आहुती दिली. देवी सतीच्या मृत्यूची बातमी जेव्हा भगवान शिवाला मिळाली तेव्हा ते क्रोधित झाले. देवी सतीचे शरीर घेऊन ते हिमालयात गेले. पण त्यांचा क्रोध शांत होत नव्हता. तेव्हा भगवान शिवाचा क्रोध शांत करण्यासाठी आणि विश्वाचे रक्षण करण्यासाठी, भगवान विष्णुने सुदर्शन चक्रानं देवी सतीचे शरीर 51 भागात विभागले. देवी सतीच्या शरीराचे हे भाग जिथे पडले तिथे पवित्र शक्तीपीठाची स्थापना झाली. माता सतीचे मस्तक ज्या ठिकाणी पडले त्या जागेला सिरकंडा असे म्हणण्यात येऊ लागले. तेच स्थान म्हणजे सध्याचे सुरकंडा देवीचे मंदिर. या देवीच्या मंदिरात आल्यावर भक्तांना आत्मिक शांतीचा अनुभव येतो. याशिवाय या मंदिरात येऊन देवीची दर्शन घेतल्यावर सुख-शांती मिळते, असेही भक्त सांगतात. यासाठी देवीचा प्रसाद मोठा असतो. सुरकंदा देवीचा प्रसाद म्हणून कुठलाही गोड पदार्थ, किंवा लाडू, पेढे देण्यात येत नाहीत. तर येथे एका झाडांची पाने देण्यात येतात. सुरकंदा देवीच्या भक्तांना रोंसलीची पाने प्रसाद म्हणून दिली जातात. स्थानिक रहिवासी याला देवाचे झाड मानतात. यामुळेच या झाडाचे लाकूड पूजेशिवाय इतर कोणत्याही कामासाठी म्हणजे इमारती किंवा इतर व्यावसायिक ठिकाणी वापरले जात नाही. या झाडांची प्रसाद म्हणून मिळालेली पानं भक्त घरात जपून ठेवतात. या पानांमुळे घरातील सुख, समृद्धी वाढते, असे भक्तांचे सांगणे आहे.
===========
हे देखील वाचा : Bastille Day म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास
===========
सुरकंदा मंदिर (Surkanda Devi) वर्षभर भक्तांसाठी खुले असते. आता या श्रावण महिन्यानिमित्त येथे भक्तांची अधिक गर्दी होत आहे. देवीच्या दरबारातून बद्रीनाथ, केदारनाथ, तुंगनाथ, चौखंबा, गौरीशंकर, नीळकंठ अशा अनेक पर्वतरांगा दिसतात. अत्यंत नयनमनोहर असे दृश्य या मंदिरातून दिसते. या मंदिराच्या संकुलात भगवान शिव आणि हनुमानाचेही मंदिर आहे. या सर्व मंदिर परिसरात आता भक्तांचा मेळा जमला आहे.
सई बने