Home » Pratyangira Temple: या ज्योतिर्लिंगाशेजारी आहे रावणाच्या कुलदेवीचे मंदिर

Pratyangira Temple: या ज्योतिर्लिंगाशेजारी आहे रावणाच्या कुलदेवीचे मंदिर

by Team Gajawaja
0 comment
Share

मध्यप्रदेशातील उज्जैन नगरी ही बाबा महाकालांची नगरी म्हणून ओळखली जाते. सोबतच या शहराची ओळख मंदिरांचे शहर म्हणूनही आहे. उज्जैनमध्ये १०० हून अधिक प्रमुख मंदिरे आणि शेकडो लहान तीर्थक्षेत्रे व तीर्थस्थळे आहेत. या प्रसिद्ध मंदिरांमध्ये महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, हरसिद्धी माता मंदिर, कालभैरव मंदिर, चिंतामण गणेश मंदिर आणि सांदीपनी आश्रम यांचा समावेश आहे. राजा विक्रमादित्य यांनी यापैकी काही मंदिरांची स्थापना केल्याची कथा सांगण्यात येते. यापैकी सर्वच मंदिरांचा पौराणिक कथांमध्ये संदर्भ आढळतो. बाबा महाकाल मंदिराप्रमाणेच सांदीपनी आश्रमाचीही मोठी महती आहे. येथेच भगवान कृष्णाचे शिक्षण झाले आहे. त्यामुळेच उज्जैन नगरी ही भगवान शंकरांसोबत भगवान कृष्णाच्या भक्तांसाठीही पूजनीय नगरी आहे. मात्र यासोबत रावणासाठीही उज्जैन नगरी पूजनीय होती. कारण याच नगरीमध्ये रावणाची कुलदेवी असलेल्या माता प्रत्यांगिरा देवीचे मंदिर आहे. शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी रावण या देवीची पूजा करत असे. असे मानले जाते की माता प्रत्यांगिरा या निकुंबला देवीचे रूप आहेत. निकुंबला देवीचा जन्म भगवान नरसिंहांना शांत करण्यासाठी झाला होता. माता प्रत्यांगिरा या शौर्याच्या देवी मानल्या जातात. युद्धावर जाण्यापूर्वी या देवीचे दर्शन घेण्याची प्रथा होती. ( Pratyangira Temple ) 

उज्जैन नगरीमध्ये अनेक मंदिरे आहेत. येथील प्रमुख मंदिरांमध्ये बाबा महाकाल मंदिर आणि कालभैरव मंदिराचा समावेश आहे. उज्जैनमधील बहुतांश प्रसिद्ध मंदिरे बाबा महाकाल मंदिराभोवती आहेत. उज्जैनमध्ये येणारे भाविक या प्रसिद्ध मंदिरांत दर्शनासाठी जातात, मात्र अनेक भाविकांना येथे माता प्रत्यांगिरा देवीच्या मंदिराबाबत माहिती नसते. माता प्रत्यांगिरा या शौर्याच्या देवी आहेत. तसेच त्या लंकाधीश रावणाच्या कुलदेवी असल्यामुळे काही भाविक या मंदिरात जाण्यास उत्सुक नसतात. परंतु माता प्रत्यांगिरा देवीचे महात्म्य ज्यांना माहिती आहे, ते भाविक आवर्जून या मंदिराला भेट देतात. माता प्रत्यांगिरा देवीचे मंदिर उज्जैनमधील प्रसिद्ध महाकाल मंदिर आणि माता बगलामुखी मंदिर यांच्या दरम्यान आहे. हे मंदिर भैरवगड रोडवरील बगलामुखी धामजवळ आहे. हे मंदिर शत्रूंचा नाश करण्यासाठी, नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि तांत्रिक अडथळ्यांपासून मुक्तता देण्यासाठी प्रसिद्ध आहे.

माता प्रत्यांगिरा देवीचे रूप देवीच्या इतर अवतारांपेक्षा वेगळे आहे. देवीची मूर्ती काळ्या पाषाणात कोरलेली असून तिचे उग्र रूप दर्शवते. तिचा चेहरा सिंहासारखा असून उर्वरित शरीर देवीच्या रूपासारखे आहे. त्यामुळे देवीला नरसिंह आणि शिव यांचे एक अद्वितीय रूप मानले जाते, जे अजिंक्यतेचे प्रतीक आहे. त्यामुळेच माता युद्धासाठी सदैव सज्ज असल्याचे मानले जाते. पूर्वीच्या काळात युद्धाला जाताना राजेमंडळी माता प्रत्यांगिरा देवीचे दर्शन घेत असत. त्यामागे मातेसारखे शौर्य अंगी यावे, अशी भावना असे. याशिवाय माता प्रत्यांगिरा मंदिराबाबत आणखी एक वैशिष्ट्य सांगितले जाते. आई बगलामुखीप्रमाणेच आई प्रत्यांगिरा देवी तंत्रदेवी म्हणून पूजली जाते. या देवीच्या केवळ दर्शनाने मनुष्याच्या शरीरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, असे सांगितले जाते. तांत्रिकांची देवी म्हणूनही माता प्रत्यांगिरा देवीची ओळख आहे. त्यामुळे कालभैरव मंदिरानंतर उज्जैनमधील याच मंदिरात सर्वाधिक तांत्रिक आढळतात. ( Pratyangira Temple ) 

=======

हे देखील वाचा : Temple : मंदिर उघडण्यापूर्वीच झालेली असते पूजा; ‘हे’ आहे मध्यप्रदेशातील अनोखे मंदिर

=======

माता प्रत्यांगिरा देवीची पुराणानुसार कथा अशी आहे की, जेव्हा भगवान विष्णूंनी आपला भक्त प्रल्हाद यांचे रक्षण करण्यासाठी नरसिंह अवतार धारण केला आणि हिरण्यकशिपूचा वध केला, तेव्हा त्यांचा क्रोध शांत झाला नाही. भगवान नरसिंहाच्या या रौद्र रूपामुळे देव आणि राक्षस दोघेही भयभीत झाले. भगवान नरसिंहांचा राग शांत करण्यासाठी माता प्रत्यांगिरा देवीचे आवाहन करण्यात आले. देवांच्या आवाहनानंतर माता प्रत्यांगिरा प्रकट झाल्या आणि भगवान नरसिंहांना शांत केले. तेव्हापासून माता प्रत्यांगिरा रौद्र रूपातही पूजल्या जाऊ लागल्या. रामायणातही देवीच्या या उग्र रूपाचा उल्लेख आहे. देवीच्या या रूपाची पूजा रावण आणि त्याचा पुत्र मेघनाद करत असत. रामायणात या देवीचा उल्लेख निकुंबला देवी म्हणून करण्यात आला आहे. अलिकडच्या वर्षांत या मंदिराचेही नूतनीकरण करण्यात आले आहे. ( Pratyangira Temple ) 

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.