भाजपाची सत्ता आली आहे, आता इथे मारवाडीतच बोलायचं, मराठी चालणार नाही”, असं वक्तव्य गिरगावच्या खेतवाडीमधल्या एका अमराठी दुकानदाराने केलं आणि पुन्हा माय मराठीचा मुद्दा उफाळून वर आलाय. कवी सुरेश भट यांच्या कवितेच्या काही ओळी आहेत. ‘पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी’ या ओळी तेव्हाही आणि आताही तितक्याच खऱ्या ठरत आहेत. नुकतच आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. पण तरीही तिचे आपल्याच भूमीत होणारे हाल काही कमी झाले नाहीत. महाराष्ट्रात मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा मुद्दा अजूनही शमला नाहीये. काही महिन्यांपूर्वी एका एचआर रिक्रूटरने तिच्या लिंक्डइन जॉब पोस्टवर स्पष्टपणे लिहिलं होत की, The Marathi People Are Not Welcome Here ! ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर तिने माफी मागितली, पण दुदैव असं कि हे आपल्याच महाराष्ट्रात घडलं होत. त्यातच आता हा गिरगावचा मुद्दा वर आलाय, जिथे भाजपाचे आमदार मंगल प्रभात लोढा आहेत. पण हे मराठी सोडून मारवाडी बोलण्याचं प्रकरण काय आणि लोढा यांनी याला कसं उत्तर दिल जाणून घेऊया. (Girgaon)
मराठी ही जगातली तेरावी सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. मात्र तरीही भाषाद्वेष हा मराठीच्या पाचवीला पुजलेला आहे. महाराष्ट्रात नुकतच महायुतीच सरकार आलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि याच सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला. पण तरीही महाराष्ट्रात आणि चक्क गिरगावात मराठी बोलायचं नाही तर आता मारवाडी बोलायचं असं वक्तव्य एका स्थानिक दुकानदाराने केलं. गिरगाव ही मराठी संस्कृती जपणारी नगरी असूनही या ठिकाणी मराठीबद्दल द्वेष पहायला मिळाला. गिरगावच्या खेतवाडीमध्ये राहणाऱ्या विमल नावाची एक महिला काही वस्तू विकत घेण्यासाठी एका मारवाडी दुकानदाराच्या दुकानात गेल्या. (Social News)
तिथे त्यांनी मराठीत बोलायला सुरुवात केल्यावर दुकानदाराने ‘गिरगावात आता मराठी नाही तर मारवाडी बोलायचं’ असं म्हटलं. यावर दोघांचा वाद झाला. या वादात पुढे तो म्हणाला की ‘आता भाजपाची सत्ता आलीय. आता इथून पुढे मारवाडी भाषेतच बोलायचं !’ यानंतर विमल यांनी याची तक्रार भाजपाचे आमदार मंगल प्रभात लोढा यांच्याकडे केली. मात्र लोढा यांनी आपली तक्रार ऐकलीच नाही आणि उडवाउडवीची उत्तरं दिली, असं महिलेने एका न्यूज Channel ला सांगितलं. यानंतर विमल यांनी मनसेचं दार ठोठावलं आणि जे होणार होत तेच झालं, मनसे कार्यकर्त्यांनी सदर दुकानदाराला चोप दिला आणि माफी मागण्यास भाग पाडलं. (Girgaon)
हे सगळं प्रकरण मंगल प्रभात लोढा यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी एक सोशल मिडीया पोस्ट लिहिली, ज्यामध्ये ते मराठीत म्हणाले की, ‘गिरगावातील खेतवाडी परिसरात घडलेल्या भाषिक द्वेष पसरवणाऱ्या घटनेचा निषेध ! मराठी भाषा ही आपल्या महाराष्ट्राची मातृभाषा आहे, आपली अस्मिता आहे ! त्यामुळे इथे मराठीत न बोलता एका ठराविक भाषेत बोला ! अशी सक्ती कोणी करत असेल, तर ते चुकीचे आहे ! भाजपाचे नाव घेऊन, अशे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत ! आपली मुंबई सर्वांची आहे ! परंतु ती सर्वात आधी मराठी माणसाची आहे, त्यामुळे असा भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी, अशी आमची इच्छा आहे. जाहीर निषेध !” (Social News)
========
हे देखील वाचा : पाकिस्तानी हिंदूंची यशोगाथा
========
प्रकरण जेव्हा राज्य पातळीवर पोहोचलं, तेव्हा लोढा यांनी यामध्ये लक्ष घातलं. मात्र सुरुवातीला त्यांनी महिलेला सहकार्य केलं नाही, म्हणून त्यांच्यावर टीकादेखील होत आहे. आमदार असो वा खासदार असो किंवा नगरसेवक असो महाराष्ट्रात त्याला मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, याबाबत अजूनही कसले गांभीर्य दिसून येत नाही. लोकप्रतिनिधी या प्रकरणांमध्ये लक्ष घालत नाहीत, म्हणून अमराठी लोकांची मुजोरी वाढते आणि असे वाद घडत जातात. त्यामुळे यावर आतातरी तोडगा काढण सरकारच्याच हातात आहे. महाराष्ट्रात बरेच अमराठी आमदार आहेत. काहींना मराठी येत, काहींना आजही येत नाही. त्यामुळे भाषेची सक्ती आपण आपल्याच भूमीत राजकारण्यांपासून सर्वसामान्य लोकांना लावू, तेव्हाच मायबोली मराठी टिकेल, नाहीतर ‘आपुल्या घरात हाल सोसते मराठी’ ही उद्या या महाराष्ट्राची राज्य घोषणा होऊन जाईल. (Girgaon)