अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवसात घेतलेले काही निर्णय वादात सापडणार आहेत. यात अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांचा प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम हा पुरस्कार देऊन केलेल्या सन्मानाचा उल्लेख होणार आहे. कारण जॉर्ज सोरोस याची किर्ती नाही तर अपकिर्ती अमेरिकेतील जनतेलाही माहित आहे. त्यामुळे जॉर्ज सोरोस यांनी मानवतेसाठी असे काय केले, की त्यांचा अमेरिकेतील सर्वोच्च पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला, असा सवाल आता जो बिडेन यांना विचारण्यात येत आहे. सोरोस यांना सन्मानित करण्याच्या निर्णयावर एक्सचे सीईओ इलॉन मस्क यांनीही टिका केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन हे आपल्या कार्यकाळाच्या अखेरच्या दिवसातील समारंभात गर्क आहेत. नुकताच त्यांनी अमेरिकेतील मान्यवरांचा प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम हा अमेरिकेतील सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मान केला. यामध्ये माजी परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन आणि भारतामधील होणा-या आंदोलनामागे ज्यांची प्रेरणा आणि अर्थकारण असते ते अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांचा समावेश आहे. जो बिडेन यांनी घेतलेल्या या निर्णयावर अमेरिकेतील सोशल मिडियात सडकून टिका करण्यात येत आहे. (George Soros)
कारण जॉर्ज सोरोस हे फक्त भारतात नाही तर अमेरिकेतील निवडणूक प्रक्रियात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करण्यात येतो. कायम वादात असलेल्या या सोरोस महाशयांनी असे कोणते देशासाठीचे काम केले आहे, असा सवाल थेट बिडेन यांना विचारण्यात येत आहे. यासोबत टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क यांनीही बिडेन यांच्यावर टीका केली आहे. अमेरिकेत प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम या पुरस्काराला खूप महत्व आहे. भारतामध्ये जसे पद्म पुरस्कार मानाचे समजले जातात, तसाच अमेरिकेतील हा पुरस्कार आहे. व्हाईट हाऊसच्या निवेदनानुसार, हा पुरस्कार देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान असून युनायटेड स्टेट्सची समृद्धी, मूल्ये किंवा सुरक्षितता, जागतिक शांतता किंवा इतर महत्त्वाच्या सामाजिक, सार्वजनिक किंवा खाजगी प्रयत्नांमध्ये अनुकरणीय योगदान दिलेल्या व्यक्तींना देण्यात येतो. त्यामुळेच जॉर्ज सोरोस यांनी यापैकी नेमके कुठले कार्य केले आहे, असा रोखठोक सवाल अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना विचारण्यात येत आहे. जॉर्ज सोरोस यांची आत्तापर्यंतची कारकिर्द वादात सापडलेली आहे. (International News)
सोरोस यांची गणना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत होते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतलेल्या सोरोस यांनी सुरुवातीच्या दिवसात रेल्वे पोर्टर आणि वेटर म्हणूनही काम केले आहे. 1956 सोरोस अमेरिकेत आले. तिथे त्यांनी युरोपियन सिक्युरिटीजमध्ये विश्लेषक म्हणून काम केले. असे असले तरी सुरुवातीपासून सोरोस यांच्यावर सरकारला अस्थिर करण्यासाठी पैशाची शक्ती वापरल्याचा आरोप करण्यात येत आहे. असा आरोप फक्त भारतातूनच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये सोरोस यांनी तेथील सरकारविरोधात काम केल्याचे आरोप आहेत. 1997 मध्ये थायलंडचे चलन कमकुवत करण्यातही सोरोस यांचाच हात असल्याचा आरोप आहे. शिवाय बँक ऑफ इंग्लंडला बुडवणारा अब्जाधीश म्हणूनही त्यांना ओळखले जाते. सोरोस यांनी हेज फंड मॅनेजर म्हणून ब्रिटिश चलन पौंड कमी करून अब्जावधी नफा कमावला. भारतात सोरोस हे कॉंग्रेस पक्षाचे पाठिराखे म्हणून ओळखले जातात. भारतात सरकारविरोधी जी आंदोलने चालतात, त्यांना सोरोस हे पैसे पुरवत असल्याचा आरोप आहे. शेतकरी आंदोलनाच्या मागे हेच सोरोस असल्याचाही आरोप कऱण्यात येतो. (George Soros)
========
हे देखील वाचा : Mar-a-Lago Resort : कसे आहे, ट्रम्पचे वैभवशाली रिसॉर्ट !
Torres कंपनीचा घोटाळा नेमका कसा झाला ? किती जणांचं नुकसान ?
======
एवढ्यावरच सोरोस थांबलेले नाहीत. तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातही त्यांनी प्रचार केल्याची माहिती आहे. त्यामुळेच एलॉन मस्क यांनी जो बिडेन यांनी केलेल्या या सन्मान सोहळ्याला हास्यास्पद सोहळा असे म्हटले आहे. जे सोरोस मानवतेचा द्वेष करतात, त्यानाच मानवतेच्या संरक्षणासाठीचा पुरस्कार देणे हा सर्वात मोठा विनोद असल्याची बोचरी टिका मस्क यांनी केली आहे. तर ऑनलाइन समालोचक ब्लेक हॅबियन यांनीही बिडेन सरकारच्या या निर्णयावर टिका केली आहे. जो बिडेन यांनी जॉर्ज सोरोस यांच्यासह 19 जणांचा प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम हा पुरस्कार देऊन सन्मान केला. त्यात अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन, अमेरिकेचे माजी ॲटर्नी जनरल रॉबर्ट एफ. केनेडी, अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी, अभिनेता डेन्झेल वॉशिंग्टन आदींचा समावेश आहे. सोरोस यांचा अपवाद वगळता अन्य कुणावरही टिका करण्यात आली नाही. (International News)
सई बने