भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की लगबग सुरु होते ती गणपती बाप्पांच्या आगमनाची. बाप्पांचे आगमन चतुर्थीला झाले की, लगेच वेध लागतात ते त्यांच्या पाठोपाठ येणाऱ्या गौरींचे. गौरी, जेष्ठ – कनिष्ठा, महालक्ष्मी आदी अनेक नावांनी हा सण ओळखला जातो. प्रत्येक ठिकाणी या सणाला वेगळ्या नावाने ओळखले जाते. सोबतच त्या त्या जागेनुसार हा सण साजरा करण्याची पद्धत देखील वेगवेगळी असते.
हा सण म्हणजे महिला वर्गाचा आवडता सण समजला जातो. अगदी थाटात, वाजत गाजत आणि दणक्यात या गौरींचे घरोघरी आगमन केले जाते. त्यानंतर पुढील दोन दिवस त्यांचे कोडकौतुक झाले की, त्यांना तिसऱ्या दिवशी विसर्जित करण्याची पद्धत आहे. ज्येष्ठा गौरींना विदर्भात ‘महालक्ष्म्या’ म्हणतात. ‘लक्ष्मी’ या शब्दाआधी ‘महा’ हे विशेषण लावून ‘महालक्ष्मी’ हा शब्द तयार झाला. मराठवाड्यात ‘लक्ष्म्या’, तर कोकणात ‘गौरी’ म्हटले जाते.
भाद्रपद महिन्यात शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षरात गौरी आवाहन केले जाते. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण साजरा करण्याच्या प्रथा मात्र प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळ्या आहेत. अनेक ठिकाणी या गौरींना गणपती बाप्पाची बहीण म्हटले जाते तर काही ठिकाणी त्यांना गणपती बाप्पाची आई म्हटले जाते.
यावर्षी ज्येष्ठा गौरी आवाहन हे मंगळवार, १० सप्टेंबर रोजी होणार आहे. पंचांगानुसार भाद्रपद शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी ९ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजून ५३ मिनिटांनी सुरू होत असून, १० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजून ११ मिनिटांनी समाप्त होत आहे. उदया तिथीनुसार १० सप्टेंबर मंगळवार रोजी ज्येष्ठा गौरीचे आगमन होणार आहे. १० सप्टेंबर रोजी संपूर्ण दिवस शुभ मुहूर्त असल्याने तुम्ही दिवसभारत कधीही लाडक्या गौरीला घरी आणू शकतात.
मंगळवारी, 10 सप्टेंबर रोजी गौरीचे आवाहन आहे. तर बुधवारी, 11 सप्टेंबर रोजी गौरी पूजन केले जाणार असून गुरुवारी, 12 सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन होणार आहे. 10 सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून ते संध्याकाळी 6 वाजून 27 मिनिटांपर्यंत ज्येष्ठा गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त असणार आहे. तसेच या दिवशी दुपारी 3 ते दुपारी 4 वाजून 30 मिनिटांपर्यंत राहू काळ असणार आहे.
परंपरेनुसार घरातील मुख्य दारापासून ते गौरी स्थापनाच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढले जातात. त्यावर हळदी कुंकू टाकले जाते. त्यावरून गौरींचे मुखवटे आणले जातात. लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत गौरींचे मुखवटे आणतात. गौरीचे आगमन करताना ते वाजत गाजत केले जाते. अतिशय मंगलमय आणि शुभ वातावरणात या गौरी घरी येतात. स्त्रिया साज शृंगार करून या गौरींचे स्वागत करतात.
गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दूध-दुभत्याची अशा गोष्टी आवर्जून दाखवतात. महाराष्ट्रातील काही भागात सुगडाच्या तर काही ठिकाणी मुखवट्याच्या गौरी बसवल्या जातात. या दिवशी ज्येष्ठा आणि कनिष्ठा या दोन्ही गौरीचे आगमन होते. हिंदू धर्मानुसार गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे. काही ठिकाणी शाडू मातीचे, पितळेचे देखील मुखवटे असतात. त्यांना धड आणि कोठ्यांवर बसवले जाते. अनेक ठिकाणी खड्यांच्या गौरी देखील बसवल्या जातात.
या गौरींची देखील एक आख्यायिका सांगितली जाते. ‘समुद्र मंथन’ या लेखात सांगितल्याप्रमाणं, मंथनातून ‘श्री महालक्ष्मी’ आणि त्यांची बहीण ‘श्री अलक्ष्मी’चा जन्म झाला. श्री महालक्ष्मी म्हणजे ‘येणारं धन’ आणि श्री अलक्ष्मी म्हणजे ‘येणारं धन जे खर्च होतं’. याप्रमाणं लक्ष्मीची थोरली बहीण ‘अलक्ष्मी’ ही देखील पूजनीय आहे. ‘समुद्र मंथना’तून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघालं. साक्षात श्री विष्णूनं श्री लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला. त्यावेळी आपल्या ज्येष्ठा भगिनीचा विवाह (अलक्ष्मी) झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही, असं श्री लक्ष्मीनं सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला.
श्री अलक्ष्मीच्या उपद्रवी अवगुणामुळं तो तपस्वी वनात निघून गेला. तेव्हा श्री अलक्ष्मी अश्र्वत्थ (पिंपळाचे झाड) वृक्षाखाली रडत बसली. तिथून श्री विष्णू जात असता त्यांनी तिला रडताना पाहिलं. तिची हकिकत ऐकून त्यांनी तिचं सांत्वन केलं आणि तिला तीन ‘वर’ (वरदान) दिले. पहिला वर, जिथे भक्तीचा अभाव, आळस, व्यसनाधीनता, नास्तिकता, अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे. दुसरा वर, शनिवारी अश्र्वत्थास प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पिडा देऊ नये. तिसरा वर, दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठा नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल. तेव्हापासून ज्येष्ठा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ‘लक्ष्मी’ व ‘अलक्ष्मी’ या दोघी बहिणींची पूजा केली जाते, अशी आख्यायिका आहे.
गौरींच्या दिवशी फुलांनी आणि कलाकुसरीच्या वस्तूंनी सजावट केली जाते. बाजारात सुंदर आणि सुबक असे गौरीचे मुखवटे मिळतात. यामध्ये शाडू, पितळे, कापडी, फायबरचे असे अनेक प्रकार पाहायला मिळतात. काही जण केवळ मुखवट्यांची पूजा करतात, तर काही जणांकडे उभ्या गौरी असतात.
कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेली गौरी पाहायला मिळते. तसेच समुद्र किंवा नदीतील खडा आणून पूजण्याची रितही असते. काही ठिकाणी तांब्यावर चेहरा रेखाटून गौरी पूजन केले जाते. प्रत्येक कुटुंबात आपआपल्या पद्धतीनुसार गौरी बसविल्या जातात. मनोभावे गौरींची स्थापना करून त्यांचे पूजन केले जाते. महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मी पूजन असेही म्हटले जाते.
गौरींचे आगमन हे नक्षत्रानुसार होते. अनुराधा नक्षत्रामध्ये गौरींचे आगमन होते आणि मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन केले जाते. पहिल्या दिवशी तुळशीपासून पावला-पावलांनी डोक्यावरून गौरींना घरात आणले जाते. यावेळी ”गौरी आली, सोन्याच्या पावली…गौरी आली, चांदीच्या पावली…गौरी आली, गाई वासराच्या पावली…गौरी आली, पुत्र-पौत्रांच्या पावली…” असे म्हणत गौरींचे माहेरवाशीणीसारखे स्वागत केले जाते. त्यांना नवीन साड्या आणि दागदागिने घालून सजवले जाते.
अनेक ठिकाणी गौरी पूजनाच्या दिवशी ओवसा भरण्याची पद्धत असते. ओवसा म्हणजे गौरीला ओवाळणे किंवा ओवसणे , ज्याला ववसा असेही म्हटले जाते. या परंपरेद्वारे घरातील सुनेला मानसन्मान दिला जातो. त्यांना त्यांच्या आवडीच्या भेटवस्तू अथवा पैसेही दिले जातात. सायंकाळी विवाहित स्त्रियांना हळदी-कुंकवासाठी बोलावले जाते. तसेच कुटुंबातील सदस्य, नातेवाईंकाना आणि मित्र-मैत्रिणींना गौरीच्या दर्शनासाठी घरी बोलावतात.
तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन केले जाते. काही जणांकडे गौरीसह गणरायाचे विसर्जन केले जाते, तर काही जणांकडे विसर्जन झाल्यानंतर १० दिवसांनी गणपतीचे विसर्जन होते.