Home » युरोपिय महासंघासाठी ‘हा’ देश ठरतो आहे डोकेदुखी, कारण … 

युरोपिय महासंघासाठी ‘हा’ देश ठरतो आहे डोकेदुखी, कारण … 

by Team Gajawaja
0 comment
Russia - Europe issue
Share

युरोप! अत्यंत समृद्ध खंड! निसर्गाची देणगी लाभलेला असा हा भाग. त्यातही पश्चिम युरोप तर आर्थिक सुबत्तेचं प्रतिकच जणू! युरोपामध्ये देश जगात सगळ्यात ज्यास्त आर्थिकदृष्ट्या समृद्ध असणारे विकसित देश आहेत. जगातल्या तमाम लोकांना जेवढं अमेरिकेचं आकर्षण आहे, तेवढंच आकर्षण युरोपबद्दलही आहे. या युरोपकडे विपुल प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती आहे. असं हे छान छान चित्र जरी समोर दिसत असलं तरी सध्या युरोपीय महासंघ म्हणजे युरोपीय देशांचा एकसंध असा संघ सध्या एका मोठ्या संकटातून जात आहे. (Russia – Europe issue)

युरोपीय संघाला आणि युरोपीय देशांना एका अभूतपूर्व संकटाचा सामना करावा लागत आहे. आणि त्याला कारणीभूत आहे रशिया! रशियाने युरोपला करत असलेला नैसर्गिक वायूचा पुरवठा थांबवला आहे. याला कारण आहे अर्थातच  रशिया – युक्रेन  युद्धाची पार्श्वभूमी. (Russia – Europe issue)

रशिया – युक्रेन संघर्ष सुरू झाला तो फेब्रुवारी २०२२ मध्ये. आजही हा संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाही. रशियाने युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यानंतर त्याला विरोध म्हणून किंवा एक प्रकारचा दबाव आणायचा म्हणून पाश्चिमात्य देशांनी म्हणजे अमेरिका, युरोपीय महासंघ आणि इतर मित्र देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले. या निर्बंधाचाच एक भाग म्हणून रशियाच्या मध्यवर्ती बँकेच्या पश्चिमी देशांमध्ये असलेल्या मालमत्ता गोठवण्यात आल्या, त्यावर निर्बंध घालण्यात आले. जेणेकरून रशियाला हा पैसा आर्थिक व्यवहार करताना वापरता येणार नाही. 

आता मुद्द्यावर यायचं म्हणजे युरोपीय महासंघ रशियाकडून तेल आयात करतो आणि रशियाला त्याचे पैसे डॉलर किंवा यूरो या चलनाद्वारे चुकते करत असतो. म्हणजे युरोप रशियाबरोबर आर्थिक व्यवहार डॉलर किंवा युरो या चलनाच्या माध्यमातून करतो.

रशियाची ‘गॅझप्रॉम’ ही सगळ्यात मोठी सरकारी कंपनी युरोपला नैसर्गिक वायूचा पुरवठा करते. अमेरिकेने आणि त्यांच्या सहकारी देशांनी तर रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. म्हणजे युरोपीय महासंघ ज्या डॉलर आणि यूरो मध्ये रशियाचे पैसे नैसर्गिक वायूच्या बदल्यात फेडत होते, ते आता तसं होणं शक्य नाही. कारण अमेरिका आणि मित्र राष्ट्रानी लादलेल्या निर्बंधामुळे ‘गॅझप्रॉम’ या कंपनीचं खातंसुद्धा निर्बंधांच्या कक्षेत येतं. 

गॅझप्रॉमच्या परदेशात असलेल्या मालमत्ता गोठवण्यात आल्या. याचाच अर्थ जे देश हा व्यवहार करताना गॅझप्रॉमच्या खात्यात पैसे डीपॉजिट करत होते, ते पैसे सुद्धा गोठवण्यात आले होते. म्हणजे रशियाला कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करता यायला नको. रशिया आणि युरोपीय महासंघ यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण करण्यास हीच गोष्ट कारणीभूत ठरली आहे. (Russia – Europe issue)

यावर चिडून रशियाने एक फर्मान काढलं. रशियाने युरोपीय महासंघाला सांगितलं की, तुम्ही जे पैसे नैसर्गिक वायूच्या बदल्यात देत होता ते पैसे आता डॉलर किंवा युरोमध्ये न फेडता रशियाच्या ‘रूबल’ या चलनामद्धे फेडा. तसे पैसे चुकते करा. परंतु यामुळे मार्च २०२२ पासून रशिया आणि युरोपीय महासंघ यांचे संबंध ताणले गेले. 

यानंतर पुतीन यांनी यावर अजून एक फर्मान काढलं. त्यांनी सरळ सरळ विभागवार पद्धत अमलात आणली. त्यानुसार ‘Unfriendly Countries’ असा विभाग काढून जे देश रशियाला नैसर्गिक वायूच्या बदल्यात ‘रूबल’ या चलनात त्यांचे पैसे फेडणार नाही त्यांना रशिया नैसर्गिक वायूचा पुरवठा थांबवेल, अशी तरतूद करण्यात आली. आणि यावरूनच युरोपीय महासंघासाठी रशिया डोकेदुखी ठरतो आहे. (Russia – Europe issue)

याचाच एक भाग म्हणून एप्रिल २०२२ मध्ये रशियाने पोलंड आणि बल्गेरिया या देशांना वायूचा पुरवठा थांबवला. अमेरिकेच्या सी. आय. ए. (C.I.A.) ने जवळपास चाळीस वर्षांपूर्वी रशियाच्या सायबेरिया इथून जर्मनीत येणाऱ्या ३,५०० मैलाच्या गॅस पाईपलाईनबद्दल धोक्याचा इशारा दिला होता, असं म्हटलं जातं. याचाच दुसरा अर्थ म्हणजे युरोपने रशियावर तेल आणि नैसर्गिक वायुसाठी भविष्यात अवलंबून राहू नये. आणि अमेरिकेच्या आणि युरोपीय महासंघाच्या मते ही गोष्ट आज खरी ठरताना दिसत आहे. 

रशियाची ७१ टक्के निर्यात युरोपला होते. तज्ज्ञांच्या मते तेल आणि कोळसा ऊर्जा निर्मितीसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी निर्यात करण्यासाठी मोठ्या कंटेनर्समध्ये भरले जाऊ शकतात पण नैसर्गिक वायूची गोष्ट वेगळी आहे. तो पाईपलाईन मधूनच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवला जाऊ शकतो. पण परत एक गोष्ट म्हणजे पाईपलाईन बांधायला अनेक वर्ष लागतात. म्हणून नैसर्गिक वायूचं दळण वळण किंवा पुरवठा हा एक वेळखाऊ भाग आहे. (Russia – Europe issue)

युरोपला रशियाने नैसर्गिक वायूची निर्यात जरी थांबवली असली तरीसुद्धा, युरोपच्या मदतीला लॅटिन अमेरिकेतला ‘पेरू’ हा देश आला आहे. पेरूने कठिणप्रसंगी युरोपला नैसर्गिक वायुचा पुरवठा केला आहे आणि करत आहे. 

====

हे देखील वाचा – व्हाईट हाऊसच्या प्रमुख पदासाठी नामांकित डॉ आरती प्रभाकर नक्की आहेत तरी कोण?

====

नैसर्गिक वायूचा पुरवठा न करण्याच्या रशियाच्या या निर्णयामुळे जर्मनी मोठ्या संकटात सापडला आहे. जर्मनी जवळपास ४० टक्के ऊर्जा ही रशियाकडून आयात करतो. जर्मनीमध्ये ‘वायू’ संकटाने भीषण रूप धारण केलं आहे. जर्मनीत नैसर्गिक वायूंचं ‘रेशनिंग’ करण्याची वेळ आली आहे. तसे सरकारने आदेश दिले आहेत. (Russia – Europe issue)

शेवटी सांगायचं म्हणजे रशिया अमेरिका आणि युरोपला त्यांच्याच भाषेत उत्तर देत आहे. आखाती देशांनी १९७३ ला अमेरिका आणि युरोपविरुद्ध ‘तेल’ नावाचं अस्त्र वापरुन ताकद दाखवली तसंच काहीसं रशिया आज युरोपविरुद्ध करताना दिसत आहे. अर्थात याचा परिणाम एकट्या युरोपवर नाही तर सगळ्या जगावर म्हणजेच जागतिक अर्थव्यवस्थेवर होणार आहे. हे असं व्हायला नको असेल तर, जागतिक स्तरावर वाटाघाटी करून शांतता चर्चेद्वारे प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. रशियाने आणि अमेरिकादी देशांनी यातून काय तो बोध घ्यावा. 

-निखिल कासखेडीकर         


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.