अवघ्या काही दिवसांतच गणेशाचे सर्वत्र आगमन होत आहे. त्यामुळे सगळीकडेच हे शेवटचे काही नुसते घाईचे आहे. वेळ कमी आणि कामं जास्त असे झाल्याने वेळ आणि कामाची सांगड कशी घालावी हेच कळत नाही ना. बाप्पा येणार म्हणून उत्साह भरभरून वाहत आहे. ७ सप्टेंबर रोजी बाप्पा वाजत गाजत येणार आहे. त्यामुळे प्रसाद, मखर, साफसफाई, बाप्पाची मूर्ती आदी अनेक गोष्टी करण्यासाठी सगळ्यांची तारांबळ उडत आहे.
अशातच आता थोडेच दिवस शिल्लक असल्याने बाजारात देखील आपल्याला पाहिजे तशा वस्तू, गोष्टी मिळतील असे नाही. त्यामुळे मनाला मुरड न घालता घरातच किंवा जे सामान मिळते आहे त्यातच काय काय चांगले करता येईल याचा विचार करा. प्रत्येकाचाच हा संपूर्ण आठवडा कामाचा असल्याने गणपतीची तयारी रात्री ऑफिसमधून घरी जाऊन करावी लागत आहे. त्यामुळे रात्री काय आणि किती काम करावे हेच समजत नाही ना तुम्हाला. मग आज आम्ही तुम्हाला बाप्पाच्या सजावटीच्या काही टिप्स आणि छोट्या, सोप्या आयडिया देणार आहोत, चला जाणून घेऊया.
१. बाजारात विविध रंगांचे, विविध प्रकारचे, असंख्य डिसाइनचे अतिशय उत्तम कागदं उपलब्ध आहेत. याच कागदांपासून तुम्ही काही गोष्टी करू शकतात. जसे की, फुलं, रंगीबेरंगी कागदी पिनव्हील्स, कागदी पंखे, छोट्या आकारातील प्राणी किंवा वेगवेगळे आकार कापून त्यावर काचेचे आरसे लावून त्याची लांब माळ तयार करून मूर्ती स्थापनेच्या मागील बाजूस भिंतीवर चिकटवता येईल.
२. याशिवाय जर तुमच्याकडे भरपूर झाडे किंवा कुंड्या असतील त्यावर वारली पेंटिंग करा, साधे कलर करा, त्यावर गिफ्ट रॅप कागद चिकटवा किंवा काहीही न करता देखील त्या कुंड्या आकर्षक मांडणी करत बाप्पाच्या आजूबाजूला छान रचून ठेवता येतील.
३. याशिवाय आपण आपल्या घरातील महिलांच्या साड्यांचा, ओढण्याचा वापर करून देखील गणपती बाप्पाची सजावट करू शकत. फक्त रंगसंगती योग्य करा जेणेकरून ही सजावट लक्षवेधक ठरेल. अगदी कमी खर्चात व आकर्षक असे मखर बाप्पाला छान शोभून दिसते. पैठणी, खण किंवा पारंपारिक साड्यांच्या मदतीने बाप्पासाठी सजावट करता येऊ शकते. बाप्पाच्या मागील बाजूस पैठणीचा पदराचा भाग शोभून दिसेल. साड्यांना पर्याय म्हणून ओढणी वापरू शकता.
४. जर तुमच्याकडे जुन्या स्टाइलच्या पत्रावळी असतील किंवा त्या तुम्ही विकतही आणू शकतात. त्याचे देखील डेकोरेशन उत्तम दिसून येते. भिंतीला एक प्लेन कापड लावा. पत्रावळ्या आणि कापडाला धाग्यांनी शिवून घ्या आणि पत्रावळ्यांच्या मधोमध द्रोण लावून घ्या. अशाप्रकारे तुमचे डेकोरेशन तयार.
५.एक मजबूत टेबल घ्या. टेबल शक्यतो लाकडी असावे. लोखंडी असेल तरीही चालेल. फक्त ते भक्कम असावे. त्यावर जाड स्वच्छ कापड टाका. हे कापड बेडशीट, चादर असे असे सूती असावे. हे कापड अशा पद्धतीने टाका की टेबलाचे पाय झाकले जातील. त्यावर एक चौरंग किंवा पाट ठेऊन त्यावर बाप्पांची मूर्ती विराजमान करा. पुढे समई लावून पूजा करा. ही पारंपरीक पद्धत आहे. यात अत्यंत साधेपणाने आरास केली जाते.
६. सणासुदीच्या काळात असंख्य प्रकारची सुंदर फुलं बाजारात येतात. त्यामुळे तुम्हाला परवडतील आणि आवडतील अशी फुलं आणून आजूबाजूच्या झाडांची पाने तोडून त्याची देखील आकर्षक सजावट तुम्ही करू शकतात. सोबतच बाप्पांच्या आजूबाजूला फुलांच्या पाकळ्या टाका. रंगीबिरंगी फुलांमध्ये बाप्पा उठून दिसतील. गणपती बाप्पाच्या समोर फुलांची आरास वातावरण प्रफुल्लित करते. सोबतच घरात एक सुंदर सुवास दरवळत असतो. मात्र तुमच्या कमी दिवसांचा बाप्पा असेल तर ही आरास उत्तम पर्याय आहे.
७. याशिवाय तुम्ही मातीची विविध आकारातील, प्रकारातील भंडारी वापरून देखील सजावट करू शकतात. यासाठी पणत्या, बोळकी किंवा इतर मातीच्या वस्तू वापरता येतील. मातीच्या वस्तुंना तुम्ही घरीच रंग देऊ शकता एका रात्रीत ते आरामात वाळते देखील.
======
हे देखील वाचा : गणेशाची मूर्ती आणताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
=======
८. गणपतीची आरास करताना आपण विशेष असा रंगीत प्रकाशयोजनेचा छान मिलाप करु शकता. त्यासाठी घराभोवती सजावटीचे कंदील किंवा दिवे देखील वापरता येतील. बाजारात देखील सेलवर इलेक्ट्रिकवर चालणारे अनेक चांगले दिवे उपलब्ध आहेत. दिव्यांनी सजलेल्या वातावरणात बाप्पांची मूर्ती तेजस्वी दिसून येईल.
९. याशिवाय तुम्ही फुग्यांचे डेकोरेशन देखील करू शकता. फुग्यांमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकार आहेत. त्यातील एक प्रकार घेऊन योग्य रंगसंगती ठरून हे डेकोरेशन देखील करता येऊ शकते. अगदी उत्तम आणि आकर्षक देखावा दिसून येतो.