अखेर उद्यापासून सगळ्यांचा आवडता गणेशोत्सव सुरु होत आहे. पुढील दहा दिवस फक्त आणि फक्त जल्लोषाचे आणि भक्तीचे असणार आहेत.
गणेशोत्सव म्हटला की सगळ्यांना आठवतो तो लालबागचा राजा. मुंबईतील लालबागचा राजा हा फक्त मुंबई नाही तर भारतात नव्हे नव्हे जगभरात प्रसिद्ध आहेत.
नवसाला पावणारा गणपती म्हणून या लालबागच्या राजाची ख्याती आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील गणेश चतुर्थी आधी लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन करून देण्यात आले.
यावर्षी देखील लालबागच्या राजाची भव्य आणि आकर्षक मूर्ती आणि मोहक रूप लक्ष वेधून घेत आहे. मरून रंगाच्या वेलवेटच्या सोवळ्यामधे राजाची स्वारी अतिशय सुरेख दिसत होती.
मिळणाऱ्या माहितीप्रमाणे यंदा लालबागच्या राजाच्या मंडळाची डेकोरेशनची थीम ही बनारसमधील काशी विश्वनाथ मंदिराची करण्यात आली आहे.
यंदा लालबागच्या राजा गणपतीचे ९१ वे वर्ष असून राजाच्या मस्तकावरील २० किलो सोन्याच्या मुकुटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा मुकुट राजाच्या चरणी मुकेश अंबानी यांनी रिलायन्स फाउंडेशनतर्फे अर्पण केला आहे. त्याची किंमत जवळपास १५ कोटी सांगण्यात येत आहे. लालबागच्या राजाची महती सर्वत्र प्रसिद्ध आहे. अगदी सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वच लालबागच्या राजाचे दर्शन घेतात.