गोष्टी उलट-सुलट होऊ लागल्या की, आपल्या मनात अनेक प्रकारचे विचार येतात. मात्र आज आपल्या देशाच्या संसद भवनात पंखे उलटे का आणि कसे फिरतात, याबाबद्दलची रंजक माहिती या लेखात तुम्हाला वाचायला मिळणार आहे (Fun fact of Parliament).
आजपर्यंत आपल्याला अनेकांनी उलट्या पायाच्या हडळीची गोष्ट ऐकवून आपल्या मनात भीती निर्माण केली असेल. निसर्गाच्या नियमानुसार जर एखादी गोष्ट सरळ असेल पण जर ती वेगळ्या पद्धतीने आपल्याला पहायला मिळाली किंवा उलटी दिसली, तर त्या वस्तू विषयी आपल्या मनात आश्चर्याच्या भावना उमटू लागतात.
लेखाचं शीर्षक वाचूनही तुमच्या मनात कुतूहल निर्माण झालं असेल किंवा तुम्हाला धक्का बसला असेल, पण हो हे सत्य आहे! आपल्या देशाच्या संसद भवनाच्या वास्तूमध्ये उलटे पंखे लटकवलेले आहेत. आता त्यामागे नेमकं कारण काय आहे (Fun fact of Parliament)? चला तर मग जाणून घेऊयात संसदेतील उलट्या पंख्यामागचा रंजक इतिहास. उलटे पंखे लावण्यामागची कल्पना नेमकी काय होती?
ड्युक ऑफ नॉटने २१ फेब्रुवारी १९२१ साली भारताचे पहिले संसद भवन निर्माण करण्याचा विचार मांडला आणि त्या दृष्टीने योग्य ती पाऊले उचलली. या संसद भवनाचे डिझाईन बनवण्याचे काम प्रसिध्द आर्किटेक्चर एडविन लुटीयंस आणि हर्बर्ट बेकर्स यांना देण्यात आले.
पुढे हे संसद भवन तयार करण्यासाठी तब्बल ६ वर्ष लागली. सहा वर्षानंतर बांधकाम पूर्ण झाल्यावर १८ जानेवारी १९२७ साली तत्कालीन भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड इर्विन यांनी त्या संसद भवनांचे उद्घाटन केले. मात्र जेव्हा संपूर्ण संसद भवन बांधून झाले, तेव्हा संसद भवनाचे घुमट इतके मोठे होते की, त्या घुमटाच्या छताला हात लावणे अवघड होऊन बसले होते. त्यामुळे संसद भवनात जेव्हा पंखे बसवायची वेळ आली तेव्हा मोठ्या छतामुळे पंखे बसवणं सहज शक्य होत नव्हतं.
एक प्रयत्न म्हणून लांब काठ्यांच्या मदतीने हे पंखे लावण्याचा प्रयत्न केला गेला, पण हे जुगाड काही जमले नाही. मग पुढे काय? त्याच लांबलचक काठ्या घेऊन पंखे उलट्या दिशेने लावण्यात आले आणि आश्चर्य म्हणजे अजूनही ते पंखे तसेच आहेत.
या उलट्या पंख्याचा परिणाम असा झाला की, पंख्याची हवा उलट्या दिशेने जाऊन संपूर्ण कानाकोपऱ्यात पसरली. त्यामुळे संसदेतील राजकीय वातावरण जरी तापलेले असले, तरी देखील संसद भवनातील वातावरण मात्र थंड राहू लागले. उलटे पंखे लावण्याची कल्पना ज्याला सुचली ती व्यक्ती नक्कीच अजब जुगाडू असावा यात मात्र तिळमात्र शंका नाही.
हे ही वाचा: भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांच्या सॅल्युट करण्याच्या आहेत वेगवेगळ्या पद्धती; ही आहेत त्याची कारणे
Unknown Places: पृथ्वीवरची पाच अशी ठिकाणं, ज्यांचा जगाशी काहीही संबंध नाही
या एका जुगाडामुळे संसदेतील वारे कधीही उलटे वाहू शकतात, असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही. अशा प्रकारची अनेक वैशिष्ट्ये भारताच्या संसद भवनात लपलेली आहेत. पण आता सर्वाना ओढ लागली आहे ती म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसद भवन तयार कसे तयार करणार व त्या संसद भवनात नेमकी कोणती वैशिष्ट्ये असणार हे जाणून घ्यायची!
-निवास उद्धव गायकवाड