बालाजी वेफर्स (Balaji Wafers) प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि संचालक ६० वर्षीय चंदूभाई विराणी यांनी १९८२ मध्ये त्यांच्या घराच्या आवारात उभारलेल्या शेडमध्ये फक्त १०००० रुपयांची गुंतवणूक करून बटाटा वेफर्स बनवण्यास सुरुवात केलेली. त्यांनी लावलेलं रोपट बहरलं आणि २०१७ मध्ये त्यांच्या कंपनीची उलाढाल १८०० करोड पर्यंत गेली. बालाजी वेफर्स (Balaji Wafers), स्नॅक्स आणि वेफर्सच्या क्षेत्रातील देशातील सर्वात मोठा प्रादेशिक ब्रँड आहे. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, राजस्थान आणि मध्य प्रदेश या पश्चिमेकडील राज्यांमध्ये त्यांचा दबदबा बघायला मिळतो. त्यांच्या मजबूत वितरण नेटवर्कमुळे ते घराघरात प्रसिद्ध आहे.
राजकोटपासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेल्या वाजडी (वड) गावात बालाजी वेफर्स प्रायव्हेट लिमिटेडचा मुख्य कारखाना स्थित आहे. कारखान्याच्या अग्रभागी छोटेसे बालाजी मंदिर आहे. इथूनच बालाजी हे नाव आलेले आहे. कारखान्याच्या मैदानावर सुमारे 2,000 झाडे आहेत, शंभर गायी आहेत, एक जल प्रक्रिया आणि बायोगॅस प्लांट आहे परंतु एकही कंपनीचा बोर्ड किंवा ब्रँड पेंटिंग नाही.

1972 मध्ये चंदूभाईंचे वडील, दिवंगत पोपट रामजीभाई विराणी, जे एक सामान्य शेतकरी होते, त्यांनी त्यांच्या तीन मुलांना – मेघजीभाई, भिखुभाई आणि चंदूभाई यांना 20,000 रुपये गुंतवण्यासाठी दिले. त्यानंतर हे कुटुंब जामनगर जिल्ह्यातील धुंडोराजी येथे राहत होते. चंदूभाई तेव्हा फक्त 15 वर्षांचे होते. त्यांच्या मोठ्या भावांनी शेतीची साधने आणि खतांमध्ये गुंतवणूक केली, परंतु पैसे गमावले. त्यानंतर तीन भाऊ 1974 मध्ये राजकोटला आले तर सर्वात धाकटा कनुभाई आपल्या आई-वडील आणि दोन बहिणींसोबत मागे राहिला.
दहावी पास असलेल्या चंदूभाईला अॅस्ट्रॉन सिनेमात नोकरी मिळाली. कॅन्टीनमध्ये काम करणे हे त्यांचे मुख्य काम असताना, त्यांनी चित्रपटाचे पोस्टर चिकटवणे यांसारखी कामे देखील केली.चंदूभाई सांगतात, “शो संपल्यानंतर रात्री सिनेमागृहातील फाटलेल्या सीट्स मी दुरुस्त करायचो आणि त्याबदल्यात चोरफारी (गुजराती नाश्ता) आणि चटणी मिळायची. ते भाड्याच्या जागेत राहायचे, पण एका रात्री त्यांना तेथून पळ काढला कारण त्यांच्याकडे भाडे देण्यासाठी 50 रुपयेही नव्हते (नंतर त्यांनी घरमालकाला पैसे परत केले.)
त्यानंतर त्यांनी बटाट्याच्या वेफर्ससह कँटीनमध्ये त्यांनी विविध वस्तू विकायला सुरुवात केली. पण त्यांचा सप्लायर मात्र नेहमी काही ना काही कारणे सांगत उशीर करायचा. त्यांनी तीन वेळा सप्लायर बदलून बघितला पण प्रत्येकवेळी तेच व्हायचं. तोपर्यंत आपण स्वतःच चिप्स बनवून विकायला हवे, हा विचार चंदूभाईच्या डोक्यात घोळायला लागला होता.
1982 मध्ये, संपूर्ण कुटुंब राजकोटला गेले आणि रामजीभाईंनी एक मोठे कंपाउंड असलेले घर विकत घेतले. कुटुंबाने कॅन्टीनसाठी ‘मसाला’ सँडविच बनवायला सुरुवात केली. ते सँडविच हिट ठरले. त्यानंतर चंदूभाई वेफर्स बनवण्याच्या आपल्या कल्पनेकडे हळूहळू वळत होते.
10,000 रुपयांच्या गुंतवणुकीतून, चंदूभाईंनी कंपाऊंडमध्ये एक लहान शेड उभारले आणि कॅन्टीनच्या कामानंतर चिप्स बनवण्याचा उदयोग सुरू केला. वेफर्स तळण्यासाठी ज्या व्यक्तीची नियुक्ती केली गेली होती, ती व्यक्ती वारंवार कामावरून दांड्या मारायला लागली. त्यानंतर चंदूभाई स्वतः वेफर्स तळायला लागले. रात्ररात्रभर ते वेफर्स तळत असायचे. तोपर्यंत चंदूभाईंकडे तीन कॅन्टीनच्या ऑर्डर्स यायला लागल्या होत्या. त्यासोबतच ते 25-30 दुकानदारांनाही वेफर्स पुरवत होते.
1984 मध्ये त्यांनी ‘बालाजी’ हे ब्रँड नेम ठरवले. काही कमाई आणि सुमारे 50 लाख रुपयांच्या बँक कर्जासह, 1989 मध्ये चंदूभाईंनी राजकोटच्या GIDC परिसरात कारखाना सुरू केला. तो तेव्हा गुजरातचा सर्वात मोठा बटाटा वेफर प्लांट होता. बालाजी वेफर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी 1992 मध्ये तीन संचालकांसह, भिखुभाई, चंदूभाई आणि कनुभाई स्थापन झाली.(Balaji Wafers)
आज बालाजीचे भारतात चार प्लांट आहेत ज्यांची दिवसाला एकूण 6.5 लाख किलो बटाटे आणि 10 लाख किलो नमकीन प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. बटाट्याचे वेफर्स व्यतिरिक्त, आज बालाजी सुमारे ३० प्रकारचे सॉल्टेड स्नॅक्स आणि मसालेदार पदार्थ बनवतो. वलसाड येथे 2008 मध्ये सुरू झालेला त्यांचा तिसरा प्लांट, प्रति तास 9,000 किलो बटाट्यांवर प्रक्रिया करण्याची क्षमता बाळगून आहे. देशातील इतरत्र भागांत प्रवेश करण्यासाठी इंदौर येथे 2016 मध्ये त्यांनी हाय-टेक प्लांट सुरु केलेला आहे.(Balaji Wafers)
========
हे देखील वाचा : सोन्याचा देश असलेला सुदान रडतोय…
========
‘ग्राहक हाच राजा’ या ध्येयाने चालत गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान आणि गोव्यात 60 टक्क्यांहून अधिक आणि मध्य प्रदेशात सुमारे 15 टक्क्यांहून अधिक बाजारपेठेवर बालाजीचे प्रभुत्व आहे. आज कंपनीत 5,000 कर्मचारी असून त्यापैकी 2,500 महिला आहेत. वितरण नेटवर्कमध्ये सहा मुख्य वितरक, 700 डीलर्स आणि आठ लाखांहून अधिक दुकानदारांचा समावेश आहे. चंदूभाईसाठी नोकरदारांपासून ते दुकानदारांपर्यंत सर्वजण “बालाजी कुटुंबाचा” महत्वाचा भाग आहेत.