Home » पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर

by Team Gajawaja
0 comment
Bilawal Bhutto
Share

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर येत आहेत. बिलावल भुट्टो 2014 मध्ये वादात सापडले होते, तेव्हा त्यांनी काश्मीरचा प्रत्येक इंच परत घेऊ, म्हणून जाहीर विधान केले होते. तेच बिलावल आता भारताच्या दौ-यावर आहेत. आता परिस्थिती एवढी बदलली आहे की, पाकिस्तान जवळपास कंगाल झाल्यासारखे आहे. अगदी सुदानसारख्या देशात अडकलेल्या त्यांच्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठीही त्यांच्याकडे योग्य साधने नाहीत. त्यासाठी चीन किंवा अरब देशांचे पाय पकडण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. दुसरीकडे भारत जागतिक सत्ता म्हणून उदयाला येत आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा जागतिक स्तरावर दबदबा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत भारताविरोधी सतत गरळ ओकणारे बिलावल भुट्टो भारतात आले आहेत. आता त्यांची भाषा कशी असेल हे जाणून घेणे उत्सुकतेचे आहे.  

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो (Bilawal Bhutto) झरदारी भारतात आले आहेत. 12 वर्षांनंतर भारताला भेट देणारे ते पाकिस्तानचे पहिले परराष्ट्र मंत्री आहेत. यापूर्वी 2011 मध्ये पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार भारतात आल्या होत्या. अर्थात या दौ-यात हिना रब्बानीही बिलावल यांच्यासोबत आहेत. पण त्याचे स्थान थोडे कमी झालेले आहे. गोव्यामध्ये होणाऱ्या या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनसाठी अन्य देशांचेही परराष्ट्रमंत्री भारतात दाखल झाले आहेत. त्यामध्ये भारताचे शेजारी राष्ट्र चीनचाही समावेश आहे. या सर्व संमेलनावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांची जबरदस्त पकड दिसून येत आहे. दोन दिवसीय या संमंलनात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर रशिया आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठका देखील घेणार आहेत. मात्र पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो (Bilawal Bhutto) यांच्याबरोबर जयशंकर काही चर्चा करणार का याबाबत अद्यापही खुलासा झालेला नाही. 

भारत आणि पाकिस्तानमध्ये 7 वर्षांपासून कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे बिलावल भुट्टो (Bilawal Bhutto) यांच्या या भेटीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. बिलावल हे पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे पुत्र आहेत. पाकिस्तानचे ते  सर्वात तरुण परराष्ट्र मंत्री म्हणून ओळखले गेले असले तरी भारताविरोधी सातत्यानं विधानं करण्याव्यतिरिक्त त्यांचा अन्य कुठलाही करिष्मा दिसलेला नाही.  

एससीओच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी भारतात आलेले बिलावल यांची गुर्मी अद्यापही कमी झालेली नाही. वास्तविक त्यांच्या या भारत दौऱ्याला खूप महत्त्व आहे. कारण आता पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अतिशय गंभीर आहे. तिथे रोज लागणा-या किराणा सामानाचेही दर आस्मानाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत शेजारील राष्ट्राबरोबर सलोख्याचे संबंध करुन देशातील जनतेला काही आर्थिक स्थैय मिळते का पहाणे, हे परराष्ट्र मंत्र्यांचे प्रथम काम असते. पण बिलावल यांची गुर्मी कायम आहे. कारण भारत दौ-यापूर्वी त्यांनी हा  दौरा म्हणजे भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठीचा मार्ग नाही, असे विधान केले आहे. बिलावल यांनी 15 डिसेंबर रोजी, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद मध्ये, ओसामा बिन लादेन मेला आहे, परंतु गुजरातचा कसाई अजूनही जिवंत आहे आणि तो भारताचा पंतप्रधान आहे,  असे विधान केले होते.  भारतानं या विधानाचा कडाडून वरोध केला होता.  

आता भारतात आलेल्या बिलावल भुट्टो (Bilawal Bhutto) यांना त्यांच्या या विधानाबद्दल नक्कीच पश्चाताप जाणवत असणार.  कारण या परिषदेत ज्या चीनवर त्यांची मदार आहे, त्याच चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांबरोबर भारताची चर्चा होणार आहे.   आणि पाकिस्तानला अद्यापही ही संधी मिळाल्याचे स्पष्ट झाले नाही.

बिलावल भुट्टो (Bilawal Bhutto) हे पक्के भारतद्वेष्टे म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पक्षाच्या एका मेळाव्यात त्यांनी मी संपूर्ण काश्मीर परत घेईन. मी भारतासाठी एक इंचही सोडणार नाही, कारण काश्मीर फक्त पाकिस्तानचे असल्याचे सांगितले होते. बिलावल यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत काश्मीरचा मुद्दा अनेकदा उपस्थित केला आहे आणि प्रत्येक वेळा त्यांना भारताकडून कडक शब्दात उत्तर मिळाले आहे.  

कायम काश्मिरचा राग आळवणा-या बिलावल यांच्याकडे पाकिस्तानात हिंदूवर होणा-या अत्याचाराबाबत काहीच खुलासे नसतात.  त्यांचे संपूर्ण राजकारण हे फक्त काश्मिरभोवतीच फिरत आहे.  निव्वळ काश्मिरचा मुद्दा उचलून त्यांनी आपले स्थान बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे.  आता पाकिस्तानची खालावलेली परिस्थिती आणि जागतिक राजकारणात पाकिस्तानची झालेली पिछेहाट पहाता बिलावल भुट्टो यांचा अल्प अनुभवच त्यासाठी कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे.  

========

हे देखील वाचा : लादेनला ठार करण्यासाठी ओबामांनी असा बनवला होता सिक्रेट प्लॅन

========

बिलावल भुट्टो (Bilawal Bhutto) पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष आहेत.  बिलावल यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण घेतले. यादरम्यान त्याच्या सुरक्षेवर दरवर्षी सुमारे 10 लाख पौंड (भारतीय रुपयांनुसार सुमारे 9 कोटी 93 लाख) खर्च केले जात असल्याचा आरोप आहे.  आता हेच भारतद्वेष्टे बिलावल भारतात दाखल झाले आहेत.  भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली चाललेल्या या बैठकीत चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग, रशियाचे सर्गेई लॅव्हरोव्ह हेही उपस्थित आहेत. गोव्यात चीन, पाकिस्तान, भारत आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री एकत्र आल्याने SCO संघटना चर्चेत आहे.  1991 मध्ये सोव्हिएत युनियनचे अनेक तुकडे झाले. यानंतर रशियाच्या शेजारी राष्ट्रांमध्ये सीमा निश्चित न झाल्यामुळे सीमा विवाद सुरू झाला. हा वाद युद्धाचे रूप घेऊ नये, यासाठी रशियाला संघटना स्थापन करण्याची गरज वाटली.  रशियाने 1996 मध्ये चीन आणि माजी सोव्हिएत देशांसोबत एक संघटना स्थापन केली. चीनच्या शांघाय शहरात याची घोषणा करण्यात आली, म्हणून संस्थेचे नाव शांघाय फाइव्ह होते. सुरुवातीला या संघटनेमध्ये रशिया, चीन, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान यांचा समावेश होता.  2001 मध्ये, उझबेकिस्तान या देशाचाही संघटनेत प्रवेश झाल्यावर संघटनेचे नाव शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच SCO असे ठेवण्यात आले.  काही वर्षांनी चीनने पाकिस्तानला या संघटनेचे सदस्य बनवण्यासाठी प्रयत्न चालू केले. त्यामुळे संघटनेतील चीनच्या वाढत्या वर्चस्वाची भीती रशियाला वाटू लागली. रशियाने भारताला या संघटनेत सामील होण्याचा सल्ला दिला.  2017 मध्ये भारत या संघटनेचा स्थायी सदस्य झाला. आजूबाजूच्या देशांमध्ये कट्टरतावादी विचारसरणी वाढू नये,  यासाठी ही संघटना कार्य करते.  आता याच संघटनेच्या बैठकीसाठी बिलावल भारतात दाखल झाले आहेत. आपल्या देशातील आतंकवादाला प्रोत्साहन देणा-या पाकिस्तानची ते कशा पद्धतीनं भूमिका मांडतात, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.