फुटबॉलचा महाकुंभ (Football League) म्हणजेच फिफा विश्वचषक 20 नोव्हेंबरपासून कतारमध्ये सुरू होत आहे. या विश्वचषकात सहभागी होण्यासाठी जगातील सर्वोत्तम 32 संघ कतारला पोहोचले आहेत. कतारच्या वातावरणाबरोबर जुळवून घेण्यासाठी या सर्व संघाचे सराव सामने खेळले जात आहेत. FIFA विश्वचषक 2022 चा सलामीचा सामना 20 नोव्हेंबर रोजी होईल तर अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. 29 दिवस, 32 संघ आणि 64 सामने अशी या विश्वचषकाची रचना आहे. यामुळे कतारच नाही तर अवघ्या जगभरात पुढचे काही आठवडे फुटबॉलचे राहणार आहेत.
FIFA विश्वचषक 2022 चा पहिला सामना रविवारी 9.30 वाजता कतार आणि इक्वाडोर या दोन संघात होईल. या स्पर्धेत सहभागी झालेल्या 32 संघांची आठ गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या 14 दिवसांत एकूण 48 गट सामने खेळवले जातील. प्रत्येक गटातील टॉप-2 संघ राऊंड ऑफ 16 मध्ये पोहोचतील. बाद फेरीचे सामने 3 डिसेंबरपासून सुरू होतील. या नंतर उपांत्यपूर्व ते अंतिम फेरीचे सामने होतील. अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार असून त्याची बुकींगही पूर्ण झाल्याची माहिती आहे. FIFA विश्वचषक सुरू होण्यापूर्वी आता सराव सामने सुरू झाले आहेत. विश्वचषकापूर्वी होणा-या या सराव सामन्यांसाठीही प्रेक्षकांची गर्दी आहे. सराव सामन्यात अर्जेंटिना, जर्मनी, चिली, पोलंड यांसारखे बलाढ्य संघ भिडणार आहेत. हे सामने जिओ सिनेमावर थेट बघण्याची संधी आहे.(Football League)
फुटबॉल विश्वचषकाची रंगत आता चढू लागली आहे. आतापर्यंत 8 संघांनी विश्वचषक जिंकला आहे. यजमान देश 6 वेळा विजेता ठरला आहे, हे ही प्रमुख वैशिष्ट आहे. यावेळी पहिल्यांदाच मध्यपूर्वेत फुटबॉल विश्वचषकाचे आयोजन केले आहे. फुटबॉल विश्वचषक प्रथम 1930 मध्ये खेळला गेला. त्यानंतर दक्षिण अमेरिकन देश उरुग्वे येथे विश्वचषक झाला. तेव्हापासून आतापर्यंत 21 विश्वचषक झाले आहेत. त्यात ब्राझीलचा संघ 5 वेळा, अर्थातच सर्वाधिक वेळा चॅम्पियन बनला आहे. यानंतर इटली आणि जर्मनीने प्रत्येकी चार वेळा हे विजेतेपद पटकावले आहे. यजमान देशांनी 6 वेळा या विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. जर्मनीचा स्ट्रायकर मिरोस्लाव क्लोस हा विश्वचषकात आतापर्यंत सर्वाधिक, म्हणजे 16 गोल करणारा खेळाडू ठरला आहे. 2002 ते 2014 दरम्यान त्याने हे गोल केले आहेत. एकाच विश्वचषकात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम फ्रान्सच्या नावावर आहे. 1958 मध्ये फ्रान्सच्या संघाने 13 गोल केले आहेत.
आइसलँड हा फिफा विश्वचषक खेळणारा सर्वात लहान देश ठरला आहे. 2018 मध्ये या देशाने वर्ल्ड कपमध्ये प्रवेश केला तेव्हा त्याची लोकसंख्या साडेतीन लाखही नव्हती. आता फुटबॉल विश्वचषकात आपला संघ उतरवणारा कतार हा 80 वा देश ठरणार आहे. 1998 पासून प्रत्येक विश्वचषकात 32 संघ सहभागी होत असून यावर्षीही ही कायम आहे. या विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाचा संघ सर्वात वयोवृद्ध संघ ठरल आहे. या पथकाचे सरासरी वय 27.7 वर्षे आहे तर यूएसएचा सर्वात तरुण संघ ठरला आहे. या पथकाचे सरासरी वय 24.5 आहे. कतार हा FIFA विश्वचषकाचे आयोजन करणारा सर्वात लहान देश ठरला आहे. या देशाचे क्षेत्रफळ केवळ 11,582 चौरस किमी आहे. कतारमध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेतील एकूण बक्षीस रक्कम ऐकूनही आश्चर्य वाटणार आहे. एकूण 357 कोटी रुपये बक्षिस रुपात दिले जाणार आहे.
FIFA ची कमाई खूप मोठी आहे. परंतु ही कमाई कशी होते याची अनेकांना उत्सुकता असते. FIFA ही जगभरातील फुटबॉलचे व्यवस्थापन करणारी संस्था कमाईच्या बाबतीत अव्वल आहे. फिफा दर चार वर्षांनी विश्वचषकाचे आयोजन करते. याशिवाय, काही कार्यक्रम आहेत जे विशिष्ट वेळी फिफा आयोजित करते. ज्या देशात ही स्पर्धा आयोजित केली जाते त्या देशाला फिफाप्रमाणेच पैसे मिळतात. याशिवाय बक्षीसांची रक्कम, संघांची प्रवास आणि निवास व्यवस्था याचीही जबाबदारी फिफावरच असते. 2015-18 दरम्यान, FIFA ने $ 6.4 बिलियन म्हणजे सुमारे 52207 कोटी रुपये कमावले, हा एक रेकॉर्ड मानला गेला.(Football League)
2018 च्या विश्वचषकापूर्वी, FIFA ने विपणन अधिकारांद्वारे $ 1.66 अब्ज म्हणजेच सुमारे 13543 कोटी रुपये कमावले होते. तिकिटांच्या विक्रीतूनही संस्थेला भरपूर कमाई होते. विशेषतः विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची तिकीटं ही खूप महागडी असतात. तरीही ती हातोहात विकली जातात.
आता कतारमध्येही हे विश्वचषकाचे सामने असेच रंगणार आहे. पुढचा सर्व महिना फुटबॉलचा असणार आहे. मात्र इतर देशात होणारे सामने आणि कतारमध्ये होणारे फुटबॉलचे सामने यात थोडा फरक असेल. इतर देशात प्रेक्षकांवर कोणतेही बंधन घालण्यात येत नाही. मात्र कतारमध्ये सामने बघायला येणा-या प्रेक्षकांना कतारच्या कडक नियमांचे बंधन रहाणार आहे.(Football League)
=========
हे देखील वाचा : डिसेंबरच्या सुट्टीमध्ये हा खास प्लॅन नक्की करा!
=========
फिफा विश्वचषकादरम्यान प्रेक्षकांची रात्रभर मस्ती, हातात बिअरचे ग्लास, नाच, संगीत असे वातावरण असते. पण कतारमध्ये हे सर्व शक्य होणार नाही. कतारमध्ये अनेक गोष्टींवर निर्बंध आहेत, याची फिफा विश्वचषक बघायला आलेल्या प्रेक्षकांना काळजी घ्यावी लागेल. महिलांच्या कपड्यांबाबत येथे कडक बंधनं आहेत. कतारी स्त्रिया सहसा ‘अबाया’ घालूनच बाहेर पडतात. परदेशातील महिला चाहत्यांनी हे परिधान करणे आवश्यक नसले तरी त्यांना त्यांचे शरीर खांद्यापासून गुडघ्यापर्यंत पूर्णपणे झाकून ठेवावे लागेल. कतारमध्ये येणाऱ्या महिलांनी हेही लक्षात ठेवावे की त्यांनी कोणत्याही प्रकारचे घट्ट कपडे घालू नयेत. तसेच, सार्वजनिक ठिकाणी केवळ महिलाच नाही तर पुरुषांनाही खांद्यापासून गुडघ्यापर्यंत शरीर झाकावे लागते, हेही लक्षात घ्यावे लागणार आहे. फिफा विश्वचषकादरम्यान कतारच्या नियमांमध्ये काही नरमाई होईल, अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. कतारमध्ये कोणीही ड्रेसबाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास त्यांना तुरुंगात पाठवले जाऊ शकते. कतार फिफा वर्ल्ड कपचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी नियाज अब्दुल रहिमन यांनीही त्याबाबत प्रेक्षकांना सक्त ताकीद दिली आहे.(Football League)
फिफा विश्वचषकाच्या वेबसाइटवर विदेशी चाहत्यांना कतारमधील ड्रेसबद्दल सल्ला देण्यात आला आहे. संग्रहालय, सरकारी इमारती अशा सार्वजनिक ठिकाणी जाताना त्यांना आपले खांदे आणि गुडघे पूर्णपणे झाकून ठेवावे लागतील असे सांगण्यात आले आहे. मुख्य म्हणजे फुटबॉल स्टेडियममध्ये शर्ट काढण्यास मनाई आहे, असे केल्यास त्या प्रेक्षकावर कारवाई करण्यात येणार आहे.
असे कडक नियम असले तरी फिफा विश्वचषकाच्या सर्व सामन्यांची बहुतांशी तिकीटे विकली गेली आहेत. फिफाच्या वेबसाइटवर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर तिकिटे उपलब्ध आहेत. तिकिटांच्या किंमती या ग्रुप स्टेजपासून अंतिम फेरीपर्यंत विविध श्रेणी ठेवण्यात आल्या आहेत. FIFA च्या साइटशिवाय, FIFA विश्वचषक सामन्यांची तिकिटे इतर अनेक साइट्सवर देखील उपलब्ध आहेत. तिकिटांच्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर, ग्रुप स्टेज मॅचची तिकिटे 53000 ते 4.79 लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. प्री-क्वार्टर फायनल मॅचचे तिकीट 37 हजार ते 18 लाख रुपयांपर्यंत आहेत. तर उपांत्य फेरीच्या सामन्यांची तिकिटे 77,000 ते 3.5 लाख रुपयांपर्यंत आहेत. याशिवाय, अंतिम सामन्याची तिकिटे 2.25 लाख ते 13.39 लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. पण ज्यांना ही तिकीटे मिळणार नाही किंवा परवडणार नाही त्यांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर आणि जिओ सिनेमावर थेट सामने बघता येणार आहेत.
सई बने.