Home » 26 जुलै: 17 वर्षांपूर्वीच्या त्या भयाण आठवणी अजूनही ताज्या आहेत… 

26 जुलै: 17 वर्षांपूर्वीच्या त्या भयाण आठवणी अजूनही ताज्या आहेत… 

by Team Gajawaja
0 comment
26 July Mumbai Floods
Share

साहित्य, संस्कृती, कला, राजकारण, अर्थकारण आणि लाखो लोकांसाठी ‘मेल्टिंग पॉट’ ठरलेल्या मुंबईला संकटं काही नवीन नाहीत. मात्र, २६ जुलै २००५ रोजी आलेल्या अस्मानी संकटाची आठवण प्रत्येक पावसाळ्याबरोबर गडद होत आहे. (26 July 2005 Mumbai Floods)

सातारा, कराड, कोल्हापूर, पुणे वगैरे शहरांमधला पाऊस म्हणजे दिवसभर रिप रिप आणि नुसताच झोंबरा वारा. त्याउलट मुंबईच्या पावसाची बातच न्यारी वाटायची. तो सुद्धा सदैव घाईत असलेल्या मुंबईकरासारखा येतो, धडाधडा कोसळतो, झोडपून काढतो आणि मग एका फटक्यात थांबतो. परत सगळे आपापल्या कामाला..उगा रेंगाळण्याचं काम नाही. 

अशा मुसळधार पावसामुळे साचणारं पाणी, तुंबणारी गटारं, ट्रॅफिक जॅम, ठप्प होणाऱ्या लोकल हे सगळं मुंबईला नवं नाही. किंबहुना, गुडघाभर पाण्यातून वाट काढल्याशिवाय मुंबईकर होता येत नाही असं म्हणतात. त्याचमुळे आजपासून बरोबर १७ वर्षांपूर्वी २६ जुलै २००५ या दिवशी मुंबईत सकाळपासूनच संततधार सुरू होती तेव्हा त्याचं कोणालाच काही विशेष वाटलं नाही. दुपारनंतर मात्र पावसाचा जोर ओसरण्याची चिन्हं दिसेना. काळ्याकुट्ट ढगांनी भरलेलं आभाळ पाहून हळूहळू प्रत्येकाचाच धीर सुटायला सुरुवात झाली… ऑफिसचं काम थांबवून लोक आपापल्या घरी जायला निघाले तेव्हा पुढे काय वाढून ठेवलंय याची कोणालाच कल्पना नव्हती.(26 July 2005 Mumbai Floods)

नेमकं काय घडलं

२६ जुलै २००५ च्या त्या भयाण दिवशी मुंबईत २४ तासांत एरवी जून ते सप्टेंबर अशा चार महिन्यांत मिळून पडणारा ९४४ मिमि पाऊस झाला. दुपारनंतर पाऊस ओसरायची चिन्हं दिसेना म्हटल्यावर ऑफिसमधून कित्येक जण बाहेर पडले, मात्र, प्रचंड कोसळणाऱ्या पावसामुळे रस्ते वेगाने पाण्याखाली जात होते. रिक्षा, कार्सची चाकं पाण्यात बुडाल्यामुळे पुढे जाता येत नव्हतं. बस- ट्रक्ससारखी मोठी वाहनंही अडकून पडली होती. रस्त्यावरून वाहाणाऱ्या पाण्याचा जोर इतका होता की, चालत जाणंही शक्य नव्हतं. आसरा घ्यायलाही लोकांना जागा मिळत नव्हती.

त्या पुरातही चालत जाण्याचा प्रयत्न केलेले कित्येक जण पापणी लवण्याच्या आत वाहून गेले, तर गाडीत पाणी शिरू नये म्हणून काचा बंद करून आत बसलेल्या अनेकांचा गुदमरून जीव गेला. वांद्रे- कुर्ला संकुलाच्या परिसरात बेस्टची पूर्ण डबलडेकर बसच पाण्यात गेली होती. (26 July 2005 Mumbai Floods)

लोकलमध्ये अडकलेल्या शेकडो लोकांनीही रूळांवरून वाट काढत नाहीतर स्टेशनवरच आसरा घेण्याचा प्रयत्न केला. कार्यालयात थांबलेले लोक अक्षरशः दोन दिवस तिथेच अडकून पडले होते, तर बाहेर पडलेले, जीव वाचलेले लोक आठ- दहा तासांच्या पायपिटीनंतर घरी पोहोचले होते. घरी लहान मुलांना ठेवून कामावर येणाऱ्या पालकांची स्थिती आणखीनच वाईट होती. मुंबईवर कोपलेल्या पावसानं त्या दिवशी तब्बल १००० पेक्षा जास्त नागरिकांचे जीव घेतले. छोट्या- मोठ्या दुकानांपासून वाहतुकीच्या साधनांपर्यंत कोट्यवधी रुपये किंमतीच्या मालमत्तेचं किती नुकसान झालं त्याची गणतीच नाही.

====

हे देखील वाचा – National Flag Code मध्ये बदल, जाणून घ्या संबंधित महत्वाच्या गोष्टी

====

सलाम मुंबई

समोर मृत्यू दिसत असूनही इतरांचे प्राण वाचवण्यासाठी धावून जाणारी दुर्मीळ माणुसकीसुद्धा त्या पुरात अनेकांनी अनुभवलेली. बस किंवा रिक्षामध्ये, गळाभर पाण्यात अडकलेले वयोवृद्ध, महिला इतर नागरिकांना दोराच्या मदतीने वाचवण्यासाठी तरुणाई सरसावलेली होती, तर ऑफिसमध्ये अडकलेल्यांसाठी कित्येकांनी आपली दुकानं, कँटीन सुरू ठेवत त्यांना अन्नपाणी दिलं. पुरामुळे रात्रभर एकाच जागी अडकून पडलेल्यांसाठी दुसऱ्या दिवशी रस्तोरस्ती बिस्किटं- चहा, पाण्याचं वाटप लोकांनी केलं. (26 July 2005 Mumbai Floods)

हे परत घडणार?

मुंबई शहराच्या वाढत्या आवाक्याला पुरं पडण्यासाठी झालेला अनियोजित विकास, पावसाचं पाणी वाहून नेण्यासाठी सक्षम नसलेली, जुन्या पद्धतीची निचरा यंत्रणा, पर्यावरणीय बदल, निसर्गावर झालेलं अतिक्रमण आणि मिठी नदीच्या परिसरात भराव टाकून नष्ट करण्यात आलेली खारफुटीची जंगलं, मोठ्या प्रमाणावर बोकाळलेली अनाधिकृत बांधकामं मोडून काढण्यात आलेलं अपयश आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, बिल्डर्स, झोपडपट्टी माफिया आणि सरकारी अनियोजनातून मिठी नदीचं आकुंचित झालेलं पात्र या पुरासाठी कारणीभूत ठरलं. अर्थात या पुरानंतर समित्या नेमणे, कोट्यवधी रुपयांचे ठराव- प्रकल्प मांडणं असे सर्व सोपस्कार झाले, मात्र त्यातून आजपर्यंत ठोस उपाययोजना झाल्या का किंवा पर्यावरण तज्ज्ञांच्या मते आता अशी परिस्थिती येणार ‘का’ त्याहीपेक्षा ‘कधी’ हा खरा प्रश्न उरलेला असल्यामुळे, त्यासाठी आपण तयार आहोत का हे तपासायला हवं.(26 July 2005 Mumbai Floods)

कीर्ती परचुरे


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.