सध्या ‘फिटनेस’ हा शब्द अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. स्वतःला ‘मेंटेन’ ठेवण्यासाठी, तरुण दिसण्यासाठी प्रत्येकजणच धडपडत असतो. सर्वसामान्यांची ही अवस्था तर मनोरंजनाच्या क्षेत्रात तर ‘फिटनेस’ ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. कलाकार आपल्या फिटनेसबाबत विशेष जागरूक असतात. आज आपण अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीचा फिटनेस मंत्रा काय आहे हे जाणून घेऊया. ती अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. (Hemangi Kavi -Fitness Funda)
ती फुलराणी सारख्या नाटकामधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारी ही अभिनेत्री फु बाई फु, मिसेस मुख्यमंत्री, फुलपाखरू, तेरी लाडली मैं (हिंदी) अशा विविध मालिकांमधून घराघरात पोचली. हेमांगी कवी अभिनेत्री म्हणून लोकप्रिय आहेच, पण ती तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते. काय आहे तिचा ‘फिटनेस फंडा’… (Hemangi Kavi -Fitness Funda)
साधं घरगुती जेवण महत्त्वाचं
हेमांगीला तिचा ‘फिटनेस फंडा’ काय आहे, असं विचारल्यावर ती म्हणाली, “खरं सांगू का, “मला मुळातच नियमित आहाराची सवय आहे. फास्टफूड मला विशेष आवडत नाही. लहानपणापासून मला साधं जेवणच आवडतं. फिटनेससाठी मी विशेष काही वेगळं करत नाही. संध्याकाळी ७ च्या नंतर फार खाऊ नये यासंदर्भात डॉक्टरांशी चर्चा केली असता त्यांनीही हेच सांगितलं.
फिटनेससाठी महागड्या जिमची गरजच नाही –
जिमबद्दल मत व्यक्त करताना हेमांगी म्हणाली, “अनेकांना वाटतं फिटनेस ही खूप खर्चिक गोष्ट आहे. पण माझं मत विचाराल तर, फिट राहण्यासाठी महागडी जिम लावण्याची, त्यासाठी खास महागडे कपडे विकत घेण्याची काहीही गरज नाही. पण ‘योग’ मात्र आवर्जून करायला हवा.”
जिभेसाठी नको पोटासाठी खा
डाएट बद्दल विचारल्यावर हेमांगी म्हणाली, “सगळं खावं पण प्रमाणात खावं. मी माझ्या मैत्रिणींना नेहमी सांगते, ‘मी पोट नाही मारत, मी जीभ मारते.’ पोटासाठी खावं जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खाल्लं, तर गरजेपेक्षा जास्त खाल्लं जातं. (Hemangi Kavi -Fitness Funda)
पुरेशी झोप घ्या
फिटनेससाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ती आपली झोप. जर झोप व्यवस्थित असेल तर तुम्ही फिट राहू शकता. जर नसेल तर, तुम्ही कितीही मेहनत करा त्याचा काहीच उपयोग होणार नाही. अर्थात वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे असतील त्यासाठी हळूहळू सुरवात करायला हवी.
शरीरावर हिटलरशाही गाजवू नका
फिटनेससाठी अचानक जागं होणाऱ्या आरंभशूरांबद्दल बोलताना हेमांगी म्हणाली, “शरीरावर ‘हिटलरशाही’ गाजवली, तर त्याचा उलट परिणाम होऊ शकतो. तुम्ही व्यायाम, डाएट सगळं एकदम सुरु करणार. शरीराला आदल्या दिवशीपर्यंत आरामाची सवय असताना अचानक तुम्ही त्याच्यावर निर्बंध घालणार, असं केलं तर शरीरही मग प्रतिसाद देणार नाही.” (Hemangi Kavi -Fitness Funda)
गोड खायला प्रचंड आवडायचं पण आता जास्त खात नाही
फिटनेससाठी हेमांगीने स्वतःमध्ये बरेच बदल घडवले आहेत. याबद्दल सांगताना ती म्हणाली, “मला गोड खायला प्रचंड आवडायचं पण आता मी विशेष गोड खात नाही. चाळीशी उलटून गेल्यावर मीठ आणि गोड मी हळूहळू कमी केलं. सुरुवातीला मला रोज गोड खायची सवय होती. मग आठवड्यातून ३ वेळा त्यानंतर एकदा असं करत करत मी गोड खाणं बंद केलं. आता माझी गोड खाण्यावरची इच्छाच उडाली. असं नाही की, मी गोड खातच नाही. अगदीच वाढदिवसाच्या पार्टीत वगैरे गेले, तर केकचा एखादा तुकडा खाते. पण बस तेवढंच! उगाच केक आवडतो म्हणून भरभरून खात नाही.”
मनोरंजन क्षेत्रात येणाऱ्या निवेदितांना दिला हा सल्ला
मनोरंजन क्षेत्रात काम करताना अनेकदा शिफ्ट्समध्ये काम करावं लागतं. चित्रीकरण करताना जेवणाची/ खाण्या-पिण्याची आबाळ होऊ शकते. त्यामुळे या क्षेत्रात येणाऱ्या नवीन कलाकारांना हेमांगी सांगते, आत्मविश्वास, संयम, सकारात्मकता या गोष्टी तर आवश्यक आहेतच पण व्यायाम मात्र आवर्जून करा. स्वतःच्या खाण्या-पिण्याकडे आणि एकूणच शरीराकडे विशेष लक्ष द्या.” (Hemangi Kavi -Fitness Funda)
=====
हे देखील वाचा – कॉफी विथ करण शोचा 7 वा सिझन लवकरच…काय असेल खास आकर्षण?
=====
मनोरंजन क्षेत्रात राहूनही साधी राहणी असणारी हेमांगी सोशल मीडियावरही विशेष सक्रिय असते. तिच्या फेसबुक अकाउंटवर ती काहीबाही लिखाण करत असते, तर इंस्टाग्राम अकाउंटवर अनेक रिल्स/व्हिडीओ तिने पोस्ट केले आहेत.
शब्दांकन: मानसी जोशी