पाकिस्तानमध्ये विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरु आहे. नव्या वर्षात या निवडणुका होत आहेत. एकीकडे या निवडणुकीत 2008 मधील मुंबई येथील हल्ल्याचा प्रमुख आरोपी हाफिज सईद याचा मुलगा तल्हा सईद उतरण्याची तयारी करीत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामधून या निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी एक हिंदू महिला करीत आहे. या महिलेचं नाव आहे, डॉ. सवीरा प्रकाश. डॉ. सवीरा ही एक हिंदू उमेदवार म्हणून सर्वांचे लक्ष वेधत आहेच, शिवाय सवीरा ही सर्वांत तरुण महिला उमेदवार असणार आहे. शिवाय सर्वात शिक्षीत उमेदवार म्हणूनही सवीराचा समावेश होणार आहे. सवीराने 2022 मध्ये अबोटाबाद इंटरनॅशनल मेडिकल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे. सध्या ती बुनेरमधील पीपीपी पक्षाच्या महिला विंगच्या सरचिटणीसपदी आहे.
पाकिस्तानमध्ये फेब्रुवारीमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल होत आहेत. यातील एका अर्जावरील नाव सध्या पाकिस्तानमध्ये चर्चेत आहे. निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये डॉ. सविरा प्रकाश यांच्या नावाचाही समावेश आहे. डॉ. सवीरा प्रकाश ही पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वाच्या बुनेर मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरणारी पहिली महिला आहे. डॉ. सवीरा पाकिस्तानातील पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे.
डॉ. सवीराचे नाव येताच तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी पाकिस्तानमधील जनताही उत्सुक झाली आहे. सध्या तिचे नाव पाकिस्तानसोबत भारतातीलही सोशल मिडियमध्ये गाजत आहे. सवीराचे वडिलही डॉक्टर, ओम प्रकाश हे पाकिस्तानमधील सुप्रसिद्ध डॉक्टर आहेत. यासोबत डॉ. ओम प्रकाश गेल्या 35 वर्षांपासून पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सक्रीय सदस्य आहेत. वडिलांपाठोपाठ सवीराही पाकिस्तान पीपल्स पार्टीची सदस्य आहे. तसेच तिनंही डॉक्टरी पेशा स्विकारला आहे.
सवीरानं 2022 मध्ये अबोटाबाद इंटरनॅशनल मेडिकल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे. बुनेरमधील पीपीपी पक्षाच्या महिला विंगच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी सवीरा सांभाळत आहे. सवीरा , ही महिलांसाठी काम करीत आहे. पाकिस्तानमधील महिलांची स्थिती अतिशय वाईट आहे. त्यांच्या स्वातंत्र्यासाठी सवीरा लढा देत आहे. सवीराला महिलांची स्थिती सुधारून त्यांच्यासाठी चांगले वातावरण निर्माण करायचे आहे. निवडणूक जिंकल्यावर एक डॉक्टर म्हणून सरकारी रुग्णालयातील खराब परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सवीरा सांगते.
डॉ. सवीराच्या उमेदवारीनं पाकिस्तानमधील निवडणूक अधिक रंजक झाली आहे. बुनेरमध्ये 55 वर्षांत प्रथमच एक महिला उमेदवार निवडणूक लढवत आहे. सवीराच्या वडिलांचे, डॉ. ओम यांचे या भागात चांगले काम आहे. त्यामुळे डॉ. सवीराचा विजय निश्चित असल्याचा अनुमान आहे.
फेब्रुवारीमध्ये होणा-या निवडणुकांसाठी नामांकनाची अंतिम तारीख 24 डिसेंबर होती. 8 फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यानंतरच डॉ. सवीराच्या विजयाची बातमी हाती येणार आहे. कारण डॉ. सवीराला मोठा पाठिंबा मिळत आहे. बुनेरमधील सोशल मीडियामध्ये लोकप्रिय असलेले इम्रान नोशाद खान यांनी डॉ. सवीरा प्रकाशला पाठिंबा दिला केला. रूढीवादी परंपरा मोडून काढल्याबद्दल त्यांनी तिचे कौतुक केले आहे. त्यातही पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाच्या सुधारणांमध्ये सर्वसाधारण जागांवर पाच टक्के महिला उमेदवारांचा समावेश करणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे डॉ. सवीरा प्रकाशची जागा नक्की असल्याचे सांगण्यात येते. मात्र असे असले तरी, पाकिस्तानमधील सध्याची परिस्थिती पाहता, डॉ. सवीराची निवडणूक मोठी आव्हानाची असणार आहे.
============
हे देखील वाचा : बलुचिस्तानचा भाग पाकिस्तानपासून वेगळा होणार ?
============
याचे मुख्य कारण म्हणजे, खैबर पख्तूनख्वाची सीमा अफगाणिस्तानबरोबर जोडलेली आहे. बुनेर जिल्हा हा सीमावर्ती जिल्हा आहे. पाकिस्तान आणि अफगाण येथील तालिबान संघटना अनेकवेळा या भागात हल्ले करतात. पाकिस्तानी सैनिकांवरही येथे दररोज हल्ले होतात. त्यात नागरिकांवर हल्ले होणं हा नित्याचाच भाग आहे. याशिवाय पाकिस्तानमधील पुरुषी मानसिकता हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. त्यातही डॉ. सवीरा या हिंदू आहेत. एक हिंदू महिलेला निवडून देण्याची मानसिकता येथील मतदारांमध्ये आहे का ? हे पाहणे गरजेचे आहे. या सर्वांवर मात करीत डॉ. सवीरा प्रकाश निवडणूक मैदानात स्वतःला कसे सिद्ध करतात, हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.
सई बने