संयुक्त राष्ट्र संघ म्हणजेच युएन दरवर्षी अनेक अहवाल प्रसिद्ध करते. त्यामध्ये कुठल्या देशात आनंदी लोकांची संख्या जास्त आहे, या अहवालाचाही समावेश आहे. या आनंदी लोकांच्या देशात फिनलॅंड हे देश जवळपास सात वर्षापासून बाजी मारत आहे. फिनलॅंड हा उत्तर युरोपातील एक देश असून या देशाची लोकसंख्या अवघी 54 लाख आहे. युरोपियन संघातील सर्वात तुरळक लोकवस्ती असलेला देश म्हणूनही फिनलॅंड ओळखला जातो. हा देश आनंदी का आहे, याची अनेक कारणे दिली जातात. त्यापैकी एक म्हणजे, येथील औद्योगिक प्रगती. येथील सर्वांनाच रोजगार उपलब्ध आहेत. (Finland)
आरोग्य, शिक्षण या मुख्य व्यवस्थांची जबाबदारी ही शासनावर आहे. त्यामुळेच त्याचा जगातील सर्वोत्तम सामाजिक स्थैर्य असलेल्या देशांमध्येही समावेश होतो. फिनलॅंडच्या या आनंदी असल्याच्या अहवालामुळे या देशाबद्दल जगभरात उत्सुकता आहे. मात्र ज्यांना या फिनलॅंडबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी या देशासंदर्भात आलेला नवा अहवाल धक्कादायक आहे. कारण जगातील सर्वात आनंदी असलेल्या या फिनलॅंडमध्ये निराश लोकांची संख्या वाढत असल्याची माहिती पुढे आली आहे. फक्त निराशच नाही तर फिनलॅंडमध्ये आत्महत्येच्या प्रमाणतही वाढ झाली आहे. आता फिनलॅंडमधील लोक या परिस्थितीला फिनलॅंडचे तापमानच जबाबदार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघ नेमक्या कुठल्या आधारवर गेली अनेक वर्ष फिनलॅंडला आनंद देशाचा दर्जा देत आहे, हा प्रश्नही विचारण्यात येत आहे. (International News)
दरवर्षी संयुक्त राष्ट्र संघ ज्या देशाला सर्वाधिक आनंदी म्हणून जाहीर करत आहे, त्याच फिनलॅंड या देशामध्ये नैराश्यानं ग्रासलेल्या नागरिकांची संख्या वाढली आहे. युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्कच्या एका अहवालात हा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. तसेच फिनलॅंड या देशातील लोकांचे वास्तव जगासमोर मांडण्यात आले आहे. या फिनलॅंडची लोकसंख्या अवघी 54 लाखाच्या आसपास आहे. मात्र लोकसंख्येच्या मानानं येथे नैराश्यानं ग्रासलेल्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. शिवाय येथील नागरिकांना आता समुहानं रहाण्यापेक्षा एकटं रहायला अधिक आवडायला लागलं आहे, नैराश्येमध्ये रहाणा-या नागरिकांची ही पहिली खूण आहे. त्यामुळे या देशातील नागरिकांना चांगल्या उपचाराची गरज असल्याचे संबंधित अहवालात नमुद करण्यात आले आहे. यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या आनंदी देश कुठला या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून अहवालातील अन्य देशातील नागरिकांच्या मनस्थतीचीही पाहणी करावी अशी मागणी कऱण्यात येत आहे. (Finland)
यासंदर्भात केलेल्या पाहणीनुसार फिनलॅंडची सामाजिक परिस्थिती बिघडलेली आहे. येथील नैराश्याने ग्रस्त असलेल्या नागरिकांमध्ये किशोरवयीन मुलांचे प्रमाण अधिक आहे. चिंताजनक म्हणजे, याच वयोगटात अधिक आत्महत्या होत आहेत. याबाबत फिनलॅंडमधील आरोग्य संघटनांनीही स्वतंत्रपणे अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात फिनलॅंडमध्ये 9 टक्के नागरिक मानसिक आजारानं आणि नैराश्यानं ग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अभ्यासानुसार, फिनिश लोकांमध्ये आत्महत्येच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. अन्य युरोपीय देशांच्या तुलनेत ही वाढ चिंताजनक आहे. येथे नैराश्याचे प्रमाण इतके वाढले आहे की 14 ते 24 वयोगटातील एक तृतीयांश मृत्यू आत्महत्येमुळे होत आहेत. याशिवाय या पुढील वयोगटातही असेच आत्महत्येचे विचार येत असल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे. याशिवाय वयोवृद्धही आत्महत्येचा विचार करत असल्याचा अहवाल पुढे आल्यानं खळबळ उडाली आहे. (International News)
================
हे देखील वाचा : America : कुठे आग, कुठे बर्फाचे वादळ अमेरिके त्राहिमाम
America Fire : अमेरिकेच्या जंगलांना भीषण आग ! लावली की लागली ?
===============
आनंदी असणा-या या देशात असे का झाले, हा प्रश्नही विचारण्यात आला आहे. येथील नागरिकांनी बहुधा त्याचे खापर देशातील हवामानावर फोडले आहे. अनेक घरात एकाकी रहाणारे अधिक आहे. अशा जिवनामुळे त्यांना कंटाळा आला असून जीवन संपवण्यासाठी ते आत्महत्येचा विचार करत आहेत. फिनलॅंडमध्ये सर्वात अधिक हिवाळा असतो. त्यामुळे लोकांमध्ये नैराश्य वाढते असे सांगितले जाते. उन्हाळ्यातही तापमानात चढ-उतार होत असतात. सूर्यप्रकाशाचा अभाव देखील नैराश्याला सुरुवात करते असे तज्ञांचे मत आहे. शिवाय फिनलॅंडच्या ग्रामीण भागात आरोग्यसेवांचा अभाव असल्यामुळे नाराजीचे वातावरण आहे. गेली काही वर्ष फिनलॅंडचे नागरिक या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न करत असतांना संयुक्त राष्ट्रानं त्यांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य द्यायला हवे होते, असेही मत व्यक्त होत आहे. (Finland)
सई बने