Home » कॅप्टन ग्रॅडी: जगण्यासाठी त्याने खाल्ली झाडाची पाने, गवत, कीटक आणि अळ्या… 

कॅप्टन ग्रॅडी: जगण्यासाठी त्याने खाल्ली झाडाची पाने, गवत, कीटक आणि अळ्या… 

by Team Gajawaja
0 comment
Captain Scott O'Grady
Share

दुसऱ्या महायुद्धानंतर जगात रक्तरंजित संघर्ष कुठला झाला असेल, तर तो आहे बोस्निया आणि हरजेगोविना आणि सर्बिया (Bosnia, Herzegovina Serbia) या देशांमध्ये. १९९२ साली बोस्नियन युद्धाला सुरवात झाली, हा संघर्ष तीन वर्ष चालला आणि १९९५ ला संपुष्टात आला. 

आधुनिक युगातलं भयंकर युद्ध जगाने अनुभवलं. युद्ध थांबत नाही हे पाहताच, आंतरराष्ट्रीय समुदायाकडून नाटोवर (NATO) दबाव वाढला आणि युद्धात हस्तक्षेप करून हा संघर्ष ताबडतोप थांबावा यासाठी नाटोच्या फौजांना पाचारण करण्यात आलं. 

बोस्नियन युद्ध सुरू असताना बोस्नियन सर्बियन (Serbian) मिलिटरी विमानानी बोस्नियन सरकार आणि बोस्नियन – क्रोएशियन (Croatia) फौजांविरुद्ध कारवाई करू नये यासाठी नाटोकडे जबाबदारी देण्यात आली. आणि याचाच एक भाग म्हणून ‘नो फ्लाय झोन’ जाहीर करावा यासाठी नाटो फौजांनी या मोहिमेला नाव दिलं ‘ऑपरेशन डीनाय फ्लाइट’! 

मोहिमेचा भाग म्हणून नाटोच्या ५५५ फायटर स्क्वाड्रनच्या दोन एफ-१६ लढाऊ विमानांनी इटलीच्या ‘अवियानो’ हवाई तळावरून पेट्रोलिंगसाठी (म्हणजे आकाशात टेहळणी करायसाठी) उड्डाण केलं… तो दिवस होता… २ जून १९९५! यातल्या एका एफ-१६ विमानाचा पायलट होता कॅप्टन स्कॉट ओ’ ग्रॅडी (Captain Scott O’Grady)! 

बोस्नियन सर्ब (Serb) आर्मीने या नाटोच्या विमानांवर हल्ला करण्यासाठी आणि जमिनीवरून हवेत मारा  करण्यासाठी मिसाईल (क्षेपणास्त्र) तयारच ठेवली होती. सुरवातीला हे एफ-१६ उडत असताना त्याला कुठलीही वॉर्निंग न देता बोस्नियन आर्मीने क्षेपणास्त्र सोडण्यासाठी त्यांचं रडार चालू केलं आणि या ‘सॅम’ (SAM-Surface to Air Missile) म्हणजे जमिनीवरून आकाशात मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राने स्कॉट ओ’ ग्रॅडी’च्या विमानावर दोन क्षेपणास्त्र सोडली. 

बरं हे करत असताना, ग्रॅडीचं विमान मिसाईलच्या टप्प्यात येऊ दिलं, म्हणजे अगदी क्षेपणास्त्र सोडण्याच्या यंत्राच्या वर येऊ दिलं आणि त्याला कुठलीही पूर्वसूचना न देता त्याच्या विमानाला टिपलं… या पैकी एक क्षेपणास्त्र डागल्यानंतर ते ग्रॅडीच्या एफ-१६ विमानावर आदळलं. या पेट्रोलिंग (टेहळणी करण्याच्या) ड्युटीवर असलेलं दुसरं एफ-१६ मिसाईलच्या तडाख्यातून बचावलं. पण ग्रॅडीचं विमान कोसळलं. दुसऱ्या एफ-१६ विमानाच्या पायलटला ग्रॅडीचं विमान खाली पडताना दिसलं. पण त्याला ग्रॅडीचं प्याऱ्याशूट कुठेही दिसलं नाही. (Captain Scott O’Grady

====

हे देखील वाचा – राफेल नदाल: लाल मातीच्या कोर्टावरील एकहाती मक्तेदारी

====

इकडे ग्रॅडी विमानातून इजेक्ट (म्हणजे विमानाबाहेर हवेतच बाहेर पडण्यासाठीची व्यवस्था) केल्यानंतर तो शत्रूच्या भूमीवर पडला. त्याने त्याच्या १३ किलोची ‘सरव्हायवल बॅग’ (जीवंत राहण्यासाठी आवश्यक असणारी आणि सैनिकांसाठी सर्व गरजेच्या वस्तू असलेली बॅग) घेऊन तिथून पळ काढला आणि तो एका जागी लपून बसला. 

जीवंत राहण्यासाठी त्याने झाडाची पाने, गवत, कीटक आणि अळ्या खाल्या. प्लॅस्टिक बॅग मध्ये पावसाचं पाणी जमवून प्यायलं. त्याला तसं खडतर प्रशिक्षण देण्यात आलं होतं आणि ग्रॅडीने त्याचं युद्धकौशल्यसुद्धा वापरलं. त्याने ६ दिवस असेच काढले. त्याच्याकडे रेडियो सेट होता, पण त्याचा संपर्क नाटो बेसला (नाटोचा सैनिकी तळ) होत नव्हता. 

अखेर त्याचे रेडियो यंत्रणेद्वारे सिग्नल नाटो बेसवरच्या (तळावरच्या) अधिकाऱ्यांनी ओळखले आणि शेवटी संपर्क प्रस्थापित झाला. ग्रॅडी म्हणाला, “धीस इज बशर ५२’, आय ॲम अलाइव्ह अँड आय निड हेल्प.” त्याची ओळख पडताळून ती पटल्यानंतर नाटो कमांडर्सनी त्यासाठी ‘रेस्क्यू प्लॅन’ तयार केला. (Rescue Plan for Captain Scott O’Grady)

मरीन कॉर्प्सचा (Marine Corps) कर्नल ब्रेंट याच्याकडे रेस्क्यू प्लॅनच्या मोहिमेची सूत्र सोपवली गेली. अमेरिकेची एडरीयटीक समुद्रात (Adriatic Sea) असलेली युद्धनौका ‘युएसएस केसर्ग’ (USS Kearsarge) वरुन चार स्टॅलियन जातीची हेलिकॉप्टरस आणि त्यात ५१ मरिन्स आणि दोन फायटर जेट्स अश्यानी या गुप्त मिशनवर कारवाईसाठी उड्डाण केलं. अखेर ग्रॅडीचा सिग्नल कुठून येतो आहे ती जागा शोधून तिथे सैनिकांनी मार्गक्रमण केलं. 

सुरुवातीला एक स्टॅलियन जातीचं हेलिकॉप्टर उतरलं. त्यातून २० मरिन्स (अमेरिकन सैनिक) उतरले त्यांनी त्यांच्या पोजीशन्स घेतल्या, त्या पाठोपाठ दुसरं स्टॅलियन जातीचं हेलिकॉप्टर उतरलं, त्यात २० मरिन्सनी अक्षरशः ग्रॅडीला आत ओढलं. उतरलेले मरिन्स परत एकेक करत चपळाईने स्टॅलियन जातीच्या हेलिकॉप्टर मध्ये परत येऊन बसले, सगळं सुरक्षित आहे हे बघून क्षणार्धात हेलिकॉप्टरस हवेत उडाले. हे सगळं मिशन विद्युत गतीने पार पडलं. म्हणजे नेमकं सांगायचं झाल्यास केवळ ७ मिनिटांमध्ये ‘रेस्क्यू मिशन’ पार पडलं. 

सकाळी ७.१५ ला ग्रॅडीची (Captain Scott O’Grady) सुटका केल्यानंतर पुढे ३० मिनिटांनी ते समुद्रात युएसएस केसर्ग जवळ उडत होते. स्थानिक प्रमाणवेळेनुसार ७.३० ला ग्रॅडी ‘केसर्ग’ युद्धनौकेवर परतला होता. तारीख होती, ८ जून १९९५! इतिहासात आजच्याच दिवशी हे जबरदस्त मिशन यशस्वीरित्या पार पडलं.    

ग्रॅडीला (Captain Scott O’Grady) त्याच्या मिशनसाठी ‘ब्रॉन्झ स्टार’ आणि ‘परपल हार्ट’ ही दोन पदकं मिळाली. कॅप्टन ग्रॅडीने १९८९ ते २००१ अशी १२ वर्ष अमेरिकेच्या वायुदलात सेवा बजावली आणि नंतर तो निवृत्त झाला. असं म्हटलं जातं की, २००१ साली हॉलीवूडमध्ये आलेला ‘बिहाइन्ड एनिमि लाईन्स’ हा प्रसिद्ध सिनेमा कॅप्टन ग्रॅडीच्या आयुष्यावर आणि त्याच्या मिशनवर आधारलेला आहे. अशाप्रसंगानी वेळोवेळी हे सिद्ध होतं की, अमेरिकेची सैन्यदलं आपल्या कामात अत्यंत निपुण आहेत, जगज्जेते आहेत. आणि म्हणूनच अमेरिका महासत्ता आहे. 

निखिल कासखेडीकर


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.