Home » Dadasaheb Phalke : भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक – दादासाहेब फाळके

Dadasaheb Phalke : भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक – दादासाहेब फाळके

by Jyotsna Kulkarni
0 comment
Dadasaheb Phalke
Share

विचार करा जर चित्रपट नसते तर….? कल्पनाच सहन होत नाही ना…? चित्रपट नसते तर आपले आयुष्यच वेगळे असते. जरी आजचे आधुनिक चित्रपट लोकांना आवडत नसले तरी जुने सिनेमे मात्र सगळ्यांचेच आवडते सिनेमे होते. काळानुरूप चित्रपटांचे देखील रुपडे बदलले आणि नवीन प्रकारचा सिनेमे अस्तित्वात आला. चित्रपट कमी अधिक प्रमाणात सगळ्यांनाच आवडतात. मात्र हेच सिनेमे नसते किंवा सिनेसृष्टीच नसती तर आपल्या देशाला हजारो, लाखो कोटींचा तोटा झाला असते. कलाकारांपासून तंत्रज्ञांपर्यंत कोणीच आज ओळखीचे नसते. (Dadasaheb Phalke)

मात्र भारताला आणि भारतीय लोकांना चित्रपटाचे स्वप्न दाखवणारे आणि एका अभूतपूर्व कल्पनाविश्वात भारतीयांना रमावणारे महान व्यक्तिमत्व म्हणजे दादासाहेब फाळके. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून दादासाहेब फाळके यांना ओळखले जाते. दादासाहेब यांनी मोठ्या कष्टाने भारतात सिनेमा आणला आणि हा चित्रपट व्यवसाय अनेक प्रतिकूल परिस्थितींवर मात करत यशस्वी करून दाखवला. आज याच दादासाहेब फाळके यांची १५५ वी जयंती आहे. नेहमीच चित्रपट बघतना आपल्याला दादासाहेब यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने जाणून घेऊया दादासाहेब फाळके यांच्या आयुष्याबद्दल. (Dadasaheb Phalke Birthday)

धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांचा जन्म ३० एप्रिल १८७० रोजी नाशिक जवळील त्रंबकेश्वर येथे मराठी ब्राह्मण कुटुंबात झाला होता. ते एक उत्कृष्ट दिग्दर्शक असण्याबरोबरच चांगले लेखक देखील होते. १९ वर्षांच्या चित्रपट कारकीर्दीत त्यांनी ९५ हून अधिक चित्रपट आणि २६ लघुपट केले. लहानपणापासूनच कलेची खूप आवड होती. त्यांचे वडील गोविंद सदाशिव हे संस्कृतचे विद्वान आणि पुजारी होते आणि त्यांनी सात मुलांचे कुटुंब वाढवले. दादासाहेबांनी प्रसिद्ध जे.जे.ची स्थापना केली. १८८५ मध्ये मुंबईमध्ये त्यांनी कला विद्यालयात प्रवेश घेतला, जिथे त्याने चित्रकला, छायाचित्रण आणि लिथोग्राफी शिकली. (Marathi Top News)

Dadasaheb Phalke

पुढे दादासाहेब फाळके यांनी गुजरातमधील बडोद्यातील महाराज सयाजीराव विद्यापीठात असणाऱ्या कला भवनमध्ये प्रवेश घेतला. तिथे त्यांनी शिल्पकला, अभियांत्रिकी, रेखाचित्र, चित्रकला आणि छायाचित्रणाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांनतर त्यांनी गुजरातमधील गोध्रामध्येच फोटोग्राफर म्हणून काम करायला सुरुवात केली. याच काळात प्लेगच्या साथीमुळं त्यांच्या पहिल्या पत्नीचे आणि मुलाचे निधन झाले. त्यानंतर दादासाहेब फाळके यांनी गुजरात सोडले. (Indian Film Industry)

=======

हे देखील वाचा : Trimbakeshwar : त्रंबकेश्वर मंदिराची माहिती आणि इतिहास

=======

मात्र यादरम्यान दादासाहेब फाळके यांनी विविध प्रकारच्या अनेक कामांचा अनुभव गोळा केला. त्यांना छपाईचं तंत्र अवगत होते. म्हणूनच त्यांनी या कलेचं वापर करत एक प्रिंटिंग प्रेस सुरू केली. याची आधुनिक यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी त्यांनी जर्मनीला भेट दिली. मात्र काही काळाने त्यांचा त्यांच्या भागीदारांशी मतभेद झाल्यामुळे हा व्यवसाय देखील बंद पडला. त्यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणात ड्राफ्ट्समन म्हणून देखील नोकरी केली. परंतु त्यांना या नोकरीत रस नव्हता. १९०८ मध्ये, त्यांनी प्रसिद्ध चित्रकार राजा रवि वर्माच्या लिथोग्राफी प्रेसमध्ये काम केले, जिथे हिंदू देवी-देवतांच्या चित्रांचा त्यांच्यावर खोलवर प्रभाव पडला. (Marathi Trending News)

दादासाहेब फाळकेंना अनेक कला अवगत होत्या. त्यामुळे ते सतत नवनवे प्रयोग करत असायचे. याकाळात त्यांनी अगदी जादूची कला देखील शिकली. लोकांना जमा करुन त्यांना जादू दाखवून प्रभावित करणे, नकला करुन त्यांचे मनोरंजन करणे त्यांना आवडायचे. मुख्य म्हणजे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची त्यांच्यात वेगळी क्षमता आणि कसब देखील होते. याच काळात मुंबईत काही सिनेमाची थिएटर्स सुरू झाली होती. पडद्यावर दिसणारी खरीखुरी चित्रं प्रेक्षकांना कायमच आश्चर्यचकित करायची. (Marathi News)

Dadasaheb Phalke

दादासाहेब फाळकेना एकदा मुंबईमध्ये एक चित्रपट पाहण्याचा योग आला. त्यांना हा चित्रपट बघतांना खूपच मजा आली. या चित्रपटानेच त्यांच्या डोक्यात एका अफलातून कल्पनेचा जन्म घेतला. त्यांना चित्रपट पाहायचा शौकच लागला होता. एक खेळ संपला की दुसरा, तिसरा, चौथा असे सलग चित्रपट ते पाहायचे. काही वेळा ते थिएटरमध्येच झोपून दुसऱ्या दिवशी पुढच्या चित्रपटालाही हजेरी लावत. (Top Stories)

अशातच १९११ मध्ये मुंबईत प्रदर्शित झालेल्या ‘द लाईफ ऑफ क्राइस्ट’ या युरोपियन चित्रपटानं त्यांना भारतीय कथांवर आधारित चित्रपट बनवण्याची प्रेरणा दिली. हा फ्रेंच चित्रपट त्यांच्यासाठी चमत्कारापेक्षा कमी नव्हता. त्यांनी विचार केला की, ‘जर ख्रिश्चन धर्माच्या कथा पडद्यावर आणता येतात, तर हिंदू देवी-देवतांच्या कथा का नाही?’ भारतीय पौराणिक विषयावरील चित्रपट आपण बनवायचा हे त्यांनी निश्चित केले. राजा रवि वर्मा यांच्याबरोबर देव देवतांची चित्रं त्यांनी बनवली असल्यामुळं पौराणिक पात्रं कशी असायला हवीत याचं चित्र त्याच्या डोळ्यासमोर आधीच तयार होतं. मात्र हा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. (Marathi Latest News)

=======

हे देखील वाचा : Sindhu River : सिंधू करार पाकिस्तानला फायदेशीर कसा झाला !

=======

त्यावेळी भारतात दूर दूरपर्यंत चित्रपट निर्मितीच्या सुविधा नव्हत्या. स्टुडिओ नव्हते, प्रशिक्षित कलाकार नव्हते, तांत्रिक संसाधने नव्हते, मात्र दादासाहेबांनी यासर्वांवर मात करून चित्रपट काढवायचे नक्की केले होते. यासाठीच त्यांनी १९१२ साली इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतला. ते लंडनला गेले आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते सेसिल हेपवर्थ यांच्याशी भेट घेतली. पुढे कालांतराने त्यांच्यात चांगली मैत्री झाली. सेसिल हेपवर्थ त्यांच्याकडून दादासाहेब फाळके यांनी चित्रपट निर्मितीचे बारकावे नीट समजून, शिकून घेतले. त्यांनी तेथून विल्यमसन कॅमेरा, प्रिंटिंग मशीन, परफोरेटर आणि कच्ची फिल्म आदी जरुरीचे सामान खरेदी केले. पुढे भारतात परतल्यानंतर त्यांनी ‘फाळके फिल्म्स कंपनी’ ची स्थापना केली आणि त्यांच्या पहिल्या चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ वर काम सुरू केले. (Social NEws)

Dadasaheb Phalke

कथा, पटकथा सर्वच तयार होते, मात्र खरी अडचण होती ती कलाकारांची. दादासाहेब यांना चित्रपटात काम करण्यासाठी पुरुष कलाकार मिळाले, मात्र स्त्री भूमिका करायला कोणीच मिळते नव्हते. अशावेळी त्यांनी खचून न जाता पुरुषांनाच स्त्री भूमिका करण्यास सांगितले आणि शूटिंगला सुरुवात केली. असे असले तरी त्यांना या सिनेमाच्या निर्मितीमध्ये अनेक अडचणी आल्या. मात्र कुटुंबाच्या, मित्रपरिवाराच्या मदतीने या सर्व अडचणींवर यशस्वीपणे मात केली आणि तयार झाला भारतातला पहिला सिनेमा ‘राजा हरिश्चंद्र‘.

राजा हरिश्चंद्र हा चित्रपट तयार करण्यासाठी दादासाहेब फाळके यांना त्याकाळी तब्बल १५ हजार रुपये लागले होते. आज जरी ही रक्कम आपल्याला किरकोळ वाटत असली, तर त्या काळात ही एक मोठी रक्कम होती. स्वत: दादासाहेबांनी राजा हरिश्चंद्रमध्ये अभिनय केला होता. त्यांची पत्नी पोशाख काम करत होती आणि त्यांच्या मुलाने हरिश्चंद्राच्या मुलाची भूमिका केली होती. ३ मे १९१३ रोजी ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला चित्रपट भारतात पहिल्यांदाच रिलीज झाला आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्ण युगाची मुहूर्तमेढ रोवली गेली. (Marathi Latest Stories)

Dadasaheb Phalke

‘राजा हरिश्चंद्र’च्या यशानंतर दादासाहेबांना गुंतवणूकदार सापडले. १९१७ मध्ये त्यांनी पाच व्यावसायिकांसह ‘हिंदुस्तान सिनेमा फिल्म्स कंपनी’ सुरू केली. फाळके यांच्या पुढच्या ‘मोहिनी भस्मासुर’ (१९१३) या सिनेमात पहिल्यांदाच दुर्गाबाई कामत आणि त्यांची मुलगी कमलाबाई या महिला अभिनेत्रींनी काम केले. जे त्या काळातील एक क्रांतिकारी पाऊल होते. त्या दोघीनी या कामासाठी खूपच हिणवले गेले मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.

=======

हे देखील वाचा : या एक हॅक्सच्या मदतीने घरबसल्या मिळवा फ्लाइटसंदर्भात माहिती, वाचा सोप्या स्टेप्स

=======

पुढे दादासाहेब यांनी ‘सत्यवान सावित्री’ (१९१४), ‘लंका दहन’ (१९१७), ‘श्री कृष्ण जन्म’ (१९१८), ‘श्री कृष्ण जन्म’ (१९१८), ‘कालिया मर्दन’ (१९१९), ‘सैरंद्री’ (१९२०), ‘शकुंतला’ (१९२०) आणि ‘गुरु द्रोणाचार्य’ (१९२३) हे सर्व मूकपट होते. त्यांनी बनवलेला “गंगावतरण (१९३७)” हा शेवटचा चित्रपट बोलपट होता. पुढे १९४४ साली १६ फेब्रुवारीला दादासाहेब फाळके यांचे दुर्दैवी निधन झाले. मात्र जाण्यापूर्वी त्यांनी संपूर्ण भारताला ‘चित्रपट कला’ भेट म्हणून दिली. आज दादासाहेब फाळके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सिनेक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलावंताला ‘दादासाहेब फाळके’ या नावाच्या भारत सरकारच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात येते.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.