Home » Queen Sirikit : फॅशन क्वीनची एक्झीट !

Queen Sirikit : फॅशन क्वीनची एक्झीट !

by Team Gajawaja
0 comment
Queen Sirikit
Share

थाई रेशीम उद्योगाला चालना देणा-या आणि जगभरात थाई कपड्यांची गुणवत्ता पोहचवणा-या, थायलंडची राणी, आणि क्वीन मदर म्हणून ओळखल्या जाणा-या राणी सिरिकिट यांचे निधन झाले आहे. राणी सिरिकिट या सर्वसामान्य जनतेची राणी म्हणून ओळखल्या जात. थायलंडच्या सर्वात जास्त काळ सेवा करणाऱ्या राणी सिरिकिट या फॅशन क्विन म्हणूनही जगभर लोकप्रिय होत्या. त्यांच्या निधनानं अवघ्या थायलंडमध्ये शोक व्यक्त करण्यात येत आहे. (Queen Sirikit)

थाई रेशीम उद्योग, ग्रामीण विकास आणि फॅशनमध्ये आधुनिकता आणण्यासाठी राणी सिरिकिट यांनी केलेले कार्य खूप मोठे आहे. ७० वर्षे त्यांनी राजा भूमिबोल यांच्यासोबत थायलंडच्या राजेशाही वारशाला एक नवीन आयाम दिला, त्यामुळेच त्यांच्या निधनानं अवघा थायलंड शोकसागरात बुडाला आहे. थायलंडची राणी मदर सिरिकित यांचे निधन झाले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. युद्धोत्तर काळात त्यांनी थायलंडच्या राजेशाहीला नवीन ओळख दिली. मात्र २०१२ मध्ये त्यांना स्ट्रोक आल्यापासून त्या सार्वजनिक जीवनापासून दूर झाल्या. नंतर तब्बेत जास्त बिघडल्यामुळे २०१९ पासून राणी सिरिकिट यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातच त्यांना १७ ऑक्टोबर रोजी रक्त संसर्ग झाला, त्यानंतर त्यांची प्रकृती आणखी बिघडली. (International News)

२४ ऑक्टोबर २०२५ रोजी राणी सिरिकिट यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी आल्यावर थाई राजघराण्यावर मोठा आघात झाला आहे. शिवाय अवघ्या थायलंडमध्ये दुःख व्यक्त करण्यात येत आहे. थायलंडमध्ये आता एक वर्षाचा शोककाळ जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान अनुतिन चार्नविराकुल यांनी मलेशियातील आसियान शिखर परिषदही रद्द केल्याची घोषणा केली आहे. राणी सिरिकिट यांच्यावर अंत्यसंस्कार कधी होणार हे जाहीर कऱण्यात येणार असून यासाठी जगभरातील राजघराण्यांचे प्रतिनिधी आणि नेते उपस्थित रहाणार आहेत. राणी सिरिकिट, त्यांचे पती, राजा भूमिबोल अदुल्यादेज यांच्यासह, ७० वर्षे थायलंडच्या राजघराण्यातील सर्वात जास्त काळ सेवा करणाऱ्या राणी ठरल्या आहेत. या काळात त्यांनी थाई लोकांच्या मनावर राज्य केलं. शिवाय जगाला थाई संस्कृती आणि फॅशनची ओळख करून दिली. राणी सिरिकिट यांचा दबदबा फक्त थायलंडमध्ये नाही तर युरोपमध्येही होता. (Queen Sirikit)

१९६० मध्ये अमेरिकेच्या भेटीदरम्यान, त्यांनी व्हाईट हाऊस स्टेट डिनरमध्ये उपस्थितीने मीडियाचे लक्ष वेधून घेतले होते. टाईम मासिकाने आणि फ्रेंच वृत्तपत्रानं त्यांची दखल घेत, जगातील सर्वात सुंदर राणी, असे त्यांच्या सौंदर्याचे वर्णन केले होते. १९६० च्या दशकात आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पोशाख असलेल्या यादीत चार वेळा राणी सिरिकिट यांचा समावेश झाला होता. राणी सिरिकिट यांचा जन्म १२ ऑगस्ट १९३२ रोजी झाला. हा दिवस थायलंडमध्ये मातृदिन म्हणून साजरा केला जातो. सिरीकित एका राजेशाही आणि सुशिक्षित कुटुंबात मोठ्या झाल्या. त्यांचे वडील, राजकुमार नकत्रा मंगला, फ्रान्समध्ये थायलंडचे राजदूत होते. सिरिकिट यांचे शिक्षण फ्रान्स आणि इंग्लंडमध्ये झाले होते. पॅरिसमध्ये संगीत आणि भाषा शिकत असताना, त्यांची भेट तरुण भूमिबोल यांच्याबरोबर झाली. त्यातूनच एक राजेशाही प्रेमकथा लिहिली गेली. (International News)

१९४९ मध्ये त्यांचे लग्न झाले तेव्हा त्या १७ वर्षाच्या होत्या. राजा भूमिबोल यांना लग्नानंतर चक्री राजवंशाचे रामा नववे म्हणून ओळखले गेले. राजा भूमिबोल जगातील सर्वात जास्त काळ राज्य करणारे राज्यप्रमुख होते, त्यांचे २०१६ मध्ये निधन झाले. राजा भूमिबोल यांना राणी सिरिकिट यांनी तेवढ्याच समर्थपणे साथ दिली. फॅशन जगात त्यांचे कार्य खूप मोठे आहे. विशेषतः थाई रेशीम उद्योगाला त्यांनी उभारी दिली. राणी सिरिकिट यांनी फ्रेंच डिझायनर पियरे बालमेन यांच्या सहकार्याने थाई रेशीमवर आधारित आधुनिक कपडे तयार केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे थाई रेशीम उद्योगाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली पारंपारिक विणकाम व्यवसायाचे पुनरुज्जीवन झाले. राणी सिरिकिट यांनी थायलंडमधील गावांच्या विकासासाठी आपले अवघे आयुष्य समर्पित केले. अनेकवेळा त्या राजा भूमिबोल यांच्यासोबत दुर्गम भागात दौरा करायच्या आणि तिथे उद्योग उभारण्यासाठी मदत करायच्या. (Queen Sirikit)

=======

Mathura : तब्बल ५४ वर्षांनी मथुरेतील बांके बिहारी मंदिरातील खजिना उघड

========

थाई हस्तकलांना प्रोत्साहन देत त्यांनी ग्रामीण महिलांना रोजगार देण्यासाठी एक आधार संस्था देखील स्थापन केली. त्यातून हजारो महिलांना हस्तनिर्मित वस्तू बनवून विकण्याचे स्वातंत्र्य मिळाले. त्यांच्या या कार्यामुळेच त्यांना राष्ट्राची आई, म्हणजेच मदर ऑफ नेशन म्हटले जायचे. त्यांच्या वाढदिवसाला राष्ट्रीय सुट्टी घोषित करण्यात आली होती, ती अद्यापही लागू आहे.राणी सिरिकिट यांच्या पश्चात त्यांच्या तीन मुली, एक मुलगा आणि त्यांची बहीण बुसाबा किटियाकर सथानापोंग असा परिवार आहे. थायलंडच्या उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी त्यांचे योगदान हे कायम स्मरणात रहाणार आहे. (International News)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.