सध्या दुबईमध्ये चालू असलेल्या दुबई एक्सपोमध्ये (Expo 2020) जगभरातील गुंतवणूकदारांचे संमेलन भरले आहे. भारतासह 192 देश या भव्यदिव्य एक्सपोमध्ये सहभागी झाले आहेत. दुबई हायर कमीटीचे अध्यक्ष शेख अहमद बिन सईद अल मख्तूम यांनी 2013 मध्ये सुरु केलेल्या या भव्य एक्सपोमध्ये यावर्षी किमान अडीच करोड पर्यटक येतील अशी शक्यता आहे.
आत्तापर्यंत दोन करोड पर्यटक या एक्सपोमध्ये आले असून या दुबई फेस्टमुळे रोज करोडो रुपयांची उलाढाल होत आहे. 1 ऑक्टोबर 2021 रोजी सुरु झालेल्या या एक्सोचा समारोप 31 मार्च 2022 रोजी होईल. एक्सोचा हा शेवटचा आठवडा असल्यामुळे जगभरातून लाखो पर्यटक दुबईत दाखल झाले आहेत.

युएइ (UAE) सरकार या एक्सपोचे यजमानपद भूषवत आहे. 4.38 स्क्वेअर किलोमीटर येवढ्या भव्य क्षेत्रावर असलेले हे एक्सपो नुसते पहाण्यासाठी अनेक दिवस लागतात. या एक्सपोची थीम आहे – “Connecting Minds, Creating the future” या थीमची विभागणी Opportunity, Mobility and Sustainability या तीन भागात करण्यात आली असून सहभागी झालेले 192 देश त्याप्रमाणे आपल्या प्रगतीचा आलेख येथे सादर करत आहेत.
दुबई एक्सपोला (Expo 2020) जगातला सर्वात मोठा मेळा म्हटले जाते. या माध्यमातून दुबईमध्ये खरेदी आणि पर्यटनाला जाण्यासाठी विशेष सुट मिळते. त्यामुळे जगभरातील पर्यटकांची आणि उद्योजकांचीही या एक्सपोला विशेष पसंती असते. यंदा या एक्सपोमध्ये भारत आणि दक्षिण अफ्रिका आपला राष्ट्रीय दिवस साजरा करणार आहेत.
28 मार्च रोजी होणाऱ्या या विशेष कार्यक्रमात भारतीय संस्कृती आणि भारतीय तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा आलेख सादर करण्यात येणार आहे. 31 मार्च रोजी या शानदार एक्सपोचा समारोप समारंभ असून त्यावेळीही भव्यदिव्य कार्यक्रम होणार आहे.

====
हे देखील वाचा: अबब! या पाच देशात तीन महीने रात्रच होत नाही…!
====
दुबई एक्सपो (Expo 2020) गार्डन, 360 डीग्रीमध्ये फिरते घर… या आणि अशाच कितीतरी वस्तूंनी हे एक्सपो भरलेले आहे. 192 देश या एक्सपोमध्ये आपापल्या देशाची संस्कृती, तंत्रज्ञान, भविष्यातील कल्पना घेऊन दाखल झाले आहेत.
भविष्यातील आधुनिक शहरं कशी असतील, याची चुणूकच या एक्सपोच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे. फक्त पंधरा मिनिटाच्या अंतरावर सर्व सुविधा भविष्यात कशा मिळतील हे या एक्सपोच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. ऑफीस, घर, शाळा, हॉस्पिटल, शॉपिंग मॉल, गार्डन अशा सर्व सुविधा फक्त पंधरा मिनिटात कशा मिळतील, याची झलक या एक्सपोमध्ये दिसते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण रहीत ही शहरं असतील. कारण या शहरात गाड्या चालवण्यास बंदी असून फक्त सायकल आणि ई व्हेइकल्स या वाहनांनाच येथे परवानगी आहे. ही प्रदूषण विरहीत शहरं बघण्यासाठीही पर्यटकांची गर्दी होत आहे.

====
हे देखील वाचा: चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी (Wang Yi) यांची प्रस्तावित भारत भेट नक्की कशासाठी?
====
या भव्य एक्सपोचे गाईड चक्क रोबोट आहेत. पर्यटक या अदभूत नगरीत कुठे हरवून गेले, तर हे रोबोट पर्यटकांना मदत करतात. जगभरातील नामवंत कलाकार येथे आपली कला सादर करण्यासाठी दाखल झाले आहेत. दोनशेच्यावर खाद्यपदार्थांचे स्टॉल येथे असून अनेक देशातील लज्जतदार पदार्थांची चव चाखता येते. बरं या स्टॉलवरही सर्वींगचे काम करण्यासाठी रोबोटच कार्यरत आहेत. पर्यटकांसाठी हे रोबोट सर्वांधिक आकर्षणाचा विषय ठरले आहेत.
एक्सपो 2020 (Expo 2020) दुबईचे प्रमुख अधिकारी अहमद अल खातिब यांनी सांगितले की, हा एक्सपो (Expo 2020) संपल्यावर त्यातील सर्वच वस्तू, बांधकामासाठी वापरलेले सामान, सजावटीच्या वस्तू यांचे रिसायकलींग होऊ शकते. एक्सपो संपल्यावर या सगळ्या सामानाचा पुन्हा वापर करण्यात येणार आहे. यातूनही पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
– सई बने