साधारण ६ वर्षांपूर्वी सकाळी १०-११ वाजता अजित (भुरे) सरांबरोबर बाईंच्या घरी मिटिंगसाठी गेले. सरांनी माझं नाव सांगितलं आणि लगेच त्या म्हणाल्या, “माझ्या नावं लक्षात राहत नाही बघ, तर don’t feel bad हं …! ” मी काय बोलू कळेचना. कारण, भेटताच असं काही बाई म्हणतील, ह्याचा विचारच केला नव्हता.. इतक्या महान व्यक्तीला भेटायला जायचं, ह्याचं दडपण आलं होतं.. Tension आलं होतं.. मी जेंव्हा घरी सांगितलं तेंव्हा माझी वृंदाकाकू म्हणाली, “अर्पिता, तू इतक्या मोठ्या व्यक्तींना भेटतेयस, त्या नक्की कोण आहेत हे माहित नाहीय तुला.. आमच्या काळात मोबाईल नव्हते लगेच फोटो काढायला, त्यामुळे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी मनात साठवून ठेवल्यात. ” मी म्हंटलं, अगं , थोडफार माहित आहे.. आणि बाकीचं मी Google करेन..” तर ती नुसतीस हसली आणि बाईंबद्दल थोडं सांगू लागली.. बाई म्हणजे जेष्ठ अभिनेत्री आणि प्रसिद्ध नाट्यकर्मी विजया मेहेता. !
माझ्या सवयी प्रमाणे मी पेन – डायरी काढली आणि बाई सांगतील ते लिहून घ्यायला लागले.. यशवंत नाट्यमंदिरमध्ये त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन.. पुस्तकाचे नाव – “झिम्मा”
जवळजवळ एक महिना आधीपासून आमची तयारी सुरु झाली होती.. त्यांच्या घरी हॉमधल्या खिडकी जवळ एक डायनिंग टेबल होत, मस्त समुद्राचा गार वारा यायचा आणि तिथे बसून काम करायचो. त्यांच्याकडे काही नोट्स, स्क्रिप्ट्स, त्यांची डायरी असायची.. खरंतर डायरी नाही, २०० पानी शाळेतली वहीच..! कडक शिस्त.. मुद्देससूर बोलणं… दिलखुलास हसणं… इतकी मोठी व्यक्ती आणि इतक साध राहणं. तिथेच अर्चना ताईशी भेट झाली… सुरुवातीला ती त्यांची मुलगीच वाटली मग कळलं कि ती विद्यार्थीनी आहे. त्यांच्या विध्यार्थ्यांबरोबर, त्यांच्या नाटकात काम केलेल्या कलाकारांशी त्यांचे इतके मस्त bonding होते. कि सगळे घरचेच वाटायचे.. Guest list, कलाकारांची नाव, Rehearsal Scheduling… Seating Arrangement…passes distribution.. technical team… इव्हेंट फ्लो ठरवू लागलो. बाई मध्ये विचारायच्या, ” बेबी, असं करूया ना गं… ” ( त्या सगळ्या मुलींना बेबी म्हणतात ) त्यांच्या जवळ बसून जे शिकायला मिळालं, ते मी शब्दात सांगू नाही शकत… I am so lucky and thankful to my industry कि, मला इव्हेंट्सच्या निमित्ताने दिग्गज व्यक्तींना भेटण्याची संधी मिळाली….
ह्या कार्यक्रमामध्ये खूप मोठे कलाकार उपस्थित राहणार होते आणि त्यामधले बाईंचे विद्यार्थी त्यांच्या पुस्तकांमधील निवडक लेखांचे वाचन करणार होते. एकदा त्यांच्या घरी मी माझं काम करत असताना दारावरची बेल वाजली. स्वाती चिटणीस, भारती आचरेकर आणि नीना कुलकर्णी घरी आल्या.. ह्या आधी इव्हेंटमध्ये प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष भेट झाली होती, पण इथे त्यांचं वावरणं काही वेगळच होतं.. शाळेतल्या अतिशय लाडक्या बाई आणि त्यांच्या लाडक्या विद्यार्थिनी.. नुसता धुमाकूळ ..! “बाई मी वाचणार हे नाटक .. ” “बाई ही बघा कशी करते… ” “बाई खायला काय केलय..” “बाई आम्ही कार्यक्रमाला पैठणी नसणार तुम्ही पण नेसा….” नेहमी ह्या कलाकरांच्या नावापुढे ‘जी”, ‘मॅडम’, ‘ताई’.. असं ऐकलं होतं. पण इथे, बाई त्यांना हक्काने आणि लाडाने चक्क ओरडत पण होत्या. अवाक होऊन बघण्यापेक्षा मी दुसरं काही करत नव्हते.
एखाद्या साचेबद्ध इव्हेंटची नेहमी रंगीत तालीम होते. ते अनुभवण्याची संधी मला बऱ्याच इव्हेंट्स मधून मिळाली. इव्हेंटच्या दिवशी नक्की काय होणार आहे, हे सगळ्यांना माहित असतं. त्यामुळे इव्हेंटच्या दिवशी नियोजन करण्यास मदत होते.. इथेसुद्धा आदल्या दिवशी यशवंतमध्ये रंगीत तालीम होती. बाईंनी ठरवल्याप्रमाणे झांज वाजणार, स्टेजच्या शेवटच्या विंगमधून (उजवी आणि डावीकडून) स्वाती चिटणीस, भारती आचरेकर, नीना कुलकर्णी, रीमा लागू, सुहास जोशी, मधुरा वेलणकर, मंगेश कुलकर्णी, रवींद्र मंकणी, आणि नाना पाटेकर पुस्तक हातात धरून एका लाईन मध्ये चालत येणार. त्यांच्या मधोमध बाई उभ्या असणार. परत झांज वाजणार, ते कलाकार पुढे चालत येणार.. परत झांज वाजणार, दोन्ही हातात पुस्तक पकडून हात पुढे करणार आणि पुस्तकाचे प्रकाशन करणार.. ह्याची ३/४ वेळा बाईंनी तालीम करून घेतली.. शाळेत जसा मुलांचा आवाज येतो आणि “गप्पं बसा रे… ” असं बाई ओरडतात, असे प्रसंग बरेचदा झाले. पण सर्व कलाकार न कंटाळता, काही न बोलता बाई सांगतील तसचं करत होते.. सगळ्यांच्या डोळ्यात बाईंविषयी असलेला आदर दिसून येत होता. नाना पाटेकर उशीरा आले त्यामुळे तालीम परत करायचे ठरवले.. नक्की काय करायचंय हे नानांना दाखवणार कोण… तर बाई मला म्हणाल्या,” जा बेबी ‘नान्याच्या’ जागेवर जाऊन उभी राहा.. आणि करून दाखव.” मी बुचकळ्यात.. !! AC चालू असताना घाम फुटणं म्हणजे नक्की काय ते तेंव्हा कळलं….
नाना पाटेकर त्यांच्या नेहमीच्या style मध्ये म्हणाले,” बरं, तू नाना आहेस का आत्ता .. ” मला इतकी लाज कधीच वाटली नव्हती… माझ्या बाजूला सगळे दिग्गज कलाकार, समोर बसलेल्या बाई आणि हसून पण कौतुकाने बघणारे नाना.. कशी बशी, मान खाली घालून दोन मिनिटासाठी हिरो बनले आणि त्वरित बॅकस्टेजला जाऊन उभी राहिले… नाना पाटेकर बॅकस्टेजला आले, डोक्यावर हात ठेवला आणि फक्त हसले… त्या हसण्यामागे त्यांना काय सांगायचे असेल.. ह्याचा मी तेंव्हा हि विचार केला नाही ना आज करते.. कारण आज हि तो प्रसंग आठवला कि, अजून थरथराट होतो… परत मुलांचा आवाज सुरु झाला, “किती बोलता रे.. !!!” असं बाई म्हणाल्या आणि परत तालमीला सुरुवात झाली..
इव्हेंटच्यादिवशी ऑफिसची सगळी टीम तिथे होती.. आमची technical meeting झाली आणि सगळे आपापल्या कामाला लागले होते. स्टेज वर पुस्तकाचे वाचन करण्यासाठी खुर्च्या आणि कॉफी टेबल ठेवायचे ठरले. आयत्या वेळी कळले कि कॉफी टेबल आहे पण डेकोरेटरने टेबलेक्लॉथच आणला नाही. मग काय, नुसती धावपळ आणि माझी नुसती चिडचिड..! एक मुलगा दादर स्टेशनला गेला.. एक माहीमला गेला.. मी स्वप्निलला म्हंटलं “बाईक काढ..” आणि घरा जवळ आले. बाबांच्या हॉस्पिटल मधून २ पांढऱ्या शुभ्र चादरी घेतल्या (खरंतर ढापल्या) आणि गेले यशवंतला परत. (इव्हेंट मॅनेजर्सच्या घरातल्या किती गोष्टी इव्हेंट वर येतात, हे त्यांच्या घरच्यांना पण माहित नसतं … त्यावेळेला ती गोष्ट मिळणं हे महत्वाचं असतं) बाबांच्या हॉस्पिटलमध्ये पांढऱ्याशुभ्र चादरी नक्की मिळणार ह्याची खात्री होती. इतके वर्ष ठेवलेले हे गुपित, आज बाबांना कळेल. यशवंतच्या बाहेर बाईंच्या जुन्या फोटोंचा कोलाज केला होता.. दिग्दर्शक, निर्माते, कलाकार, नाट्यप्रेमी अशी मंडळी कार्यक्रमाला आली होती. राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगांवकर, जेष्ठ लेखक अंबरीश मिश्र, कलाकारांच्या वतीने अनुपम खेर आणि नाना पाटेकर ह्यांनी मनोगत व्यक्त केले आणि झिम्मा पुस्तकाचे प्रकाशन झाले. बाईंनी सांगितल्या प्रमाणेच इव्हेंट पार पडला.
मी हे असं बोलणं कितपत योग्य आहे माहित नाही. मी त्यांचं एकपण नाटक पहिलेलं नाही.. थोडं फार ऐकलं होत.. वाचलं होत.. पण मी तेंव्हा त्यांना अनुभवत होते. त्या बोलायला लागल्या कि ऐकत रहावस वाटायचं.. पांढरे शुभ्र केस… गोल्डन चष्मा… कपाळावर कुंकू… गोऱ्या गोऱ्या.. नेहमी हसरा चेहरा.. पटकन आपलंस करणाऱ्या… फोन करून काम झाल्याची विचारपूस करणाऱ्या… कसं शिकायचं आणि नक्की काय शिकवायचं ह्याचा अर्थ समजवणाऱ्या… नाटकांच्या तालमी आणि प्रयोगामधील मज्जा सांगणाऱ्या… कलाकारांचे किस्से… हे सगळं सांगत असताना खरंच एक लहान मुलगी आहे त्यांच्यामध्ये असं जाणवायचं… साधारण एक-दीड महिना मी ह्या इव्हेंट वर काम करत होते आणि रोज नवीन गोष्टी शिकत होते. इव्हेंट झाल्यानंतर त्यांची मिळालेली शाब्बासकी ही आयुष्यभर लक्षात राहील.. हे दिवस परत नाही येणार पण, विजयाबाईं बरोबर परत काम करायची संधी मिळाली, तर मी ती नक्कीच नाही सोडणार !
अर्पिता कोर्डे