गुजरात आणि बंगळूरूमध्ये (GT vs RCB) आयपीएल स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना रंगला. प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या विक्रमी शतकाच्या बळावर बंगळूरूने गुजरातसमोर १९७ धावांचे लक्ष ठेवले. लक्षाचा पाठलाग करणाऱ्या गुजरातने शुभमन गिलच्या शतकाच्या जोरावर १९.१ षटकातच लक्षाला गवसणी घालत ६ गडी आणि ५ चेंडू राखत विजय मिळवला. सामन्यात पत्कराव्या लागलेल्या पराभवामुळे बंगळूरूचे प्लेऑफमध्ये जाण्याचे स्वप्न भंगले तर मुंबईची प्लेऑफ मधील जागा निश्चित झाली.

पावसाच्या व्यत्ययामुळे दीड तास उशीर सुरु झालेल्या या सामन्यात हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकत बंगळूरूला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसी यांनी संघाला चांगली सुरुवात मिळवून दिली. कोहली आणि प्लेसीच्या फटकेबाजीमुळे पॉवर-प्लेच्या सहा षटकाअंती बंगळूरूने बिनबाद ६२ अशी धावसंख्या उभारली. डावाच्या आठव्या षटकात नूर अहमदने यंदाच्या आयपीएल हंगामातील सर्वाधिक धावा करणाऱ्या फाफ डू प्लेसीला माघारी पाठवले. बाद होण्यापूर्वी प्लेसीने १९ चेंडूत २८ धावा ठोकल्या.(GT vs RCB)
एक बाजू लावून धरत विराट कोहलीने आपली फटकेबाजी सुरूच ठेवली. त्याने ६१ चेंडूत १०१ धावांची खेळी करत सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले. ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढत आयपीएलच्या इतिहासातील तो सर्वाधिक शतके झळकवणारा खेळाडू ठरला. ख्रिस गेलने आपल्या आयपीएल कारकिर्दीत एकूण सहा शतके झळकावली आहेत, कोहलीने सात शतके झळकावत या यादीत पहिले स्थान पटकावले. दोन सामन्यात सलग शतके ठोकणारा कोहली दुसरा खेळाडू ठरला. कोहलीव्यतिरिक्त बंगळूरूच्या इतर फलंदाजांना कमाल दाखवता आली नाही आणि बंगळूरूने ५ बाद १९७ धावांपर्यंत मजल मारली.(GT vs RCB)
लक्षाचा पाठलाग करायला उतरलेल्या गुजरातचा सलामीवीर फलंदाज व्रीद्धीमान साहा लवकरच माघारी परतला. युवा शुभमन गिलने त्यानंतर सर्व सूत्रे आपल्या हातात घेत फटकेबाजी करायला सुरुवात केली. विजय शंकर आणि शुभमन गिलने दुसऱ्या गड्यासाठी १२३ धावांची भागीदारी करत गुजरातच्या विजयाची पायाभरणी केली. पंधराव्या षटकात विजय शंकर बाद झाला. बाद होण्यापूर्वी त्याने ३५ चेंडूत ५३ धावांची विस्फोटक खेळी केली. (GT vs RCB)
=========
हे देखील वाचा : आतापर्यंत ‘या’ संघांनी आयपीएल जेतेपद पटकावले…
=========
दुसऱ्या बाजूने गिलची फटकेबाजी सुरूच होती. त्याने ५२ चेंडूत नाबाद १०४ धावांची खेळी करत आयपीएलमधील आपले सलग दुसरे शतक ठोकले. त्याच्या या शतकी कामगिरीच्या बळावर गुजरातने विजय नोंदवत बंगळूरूच्या आयपीएल प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या स्वप्नांवर पाणी फेरले.
तत्पूर्वी गुजरातच्या नूर अहमदने ४ षटकात ३९ धावांच्या मोबदल्यात २ बळी मिळवले. मोहम्मद शमी, यश दयाल आणि राशीद खान यांनी प्रत्येक एका फलंदाजाला माघारी पाठवत त्याला योग्य साथ दिली. तर बंगळूरूकडून मोहम्मद शमी हा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकात ३२ धावांच्या बदल्यात २ बळी मिळवले. विजय कुमार आणि हर्शल पटेल यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. सामन्यातील खास कामगिरीसाठी शुभमन गिलला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.