Home » Donald Trump : अमेरिकेत लाखो संघीय कर्मचा-यांना घरी बसण्याची नोटीस !

Donald Trump : अमेरिकेत लाखो संघीय कर्मचा-यांना घरी बसण्याची नोटीस !

by Team Gajawaja
0 comment
Donald Trump
Share

अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने आपली कैची चालू केली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संघराज्य सरकारमधील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचे काम सुरू केले आहे. ट्रम्प प्रशासनाने संघीय कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकण्याचा किंवा स्वेच्छेने नोकरी सोडण्याचा पर्याय दिला आहे. हा निर्णय घेण्यासाठी अवघ्या एका आठवड्याचा वेळ देण्यात आला आहे. 6 फेब्रुवारीपर्यंतचा वेळ देत, या कर्मचा-यांनी आपला निर्णय घेतला तर त्यांना आठ महिन्याचा पगार देण्यात येणार आहे. 6 फेब्रुवारी नंतर कोणालाही कुठलिही सुविधा न देता कामावरुन काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. (Donald Trump)

अमेरिकन सरकारच्या मानव संसाधन एजन्सीने यासंदर्भात जवळपास 20 लाखांहून अधिक संघीय कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवले आहेत. या सर्वांना योग्यता आणि वर्तनाचे सुधारित मानक पाळावे लागतील असे सांगून एजन्सीने भविष्यात कर्मचाऱ्यांच्या कपातीचा इशाराही दिला आहे. याशिवाय कोविड-19 महामारी आल्यापासून अनेक कर्मचारी अद्यापही घरातूनच काम करत आहेत. त्या सर्वांना ताबडतोब कार्यालायात दाखल व्हा, अशा सूचनाही दिल्या आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यासाठी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कर्मचा-यांसमोर स्वेच्छेने त्यांच्या नोकऱ्या सोडण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यासाठी 20 लाखांहून अधिक कर्मचा-यांना एकाचवेळी ईमेल गेले आहेत. त्यामुळे या कर्मचा-यांमध्ये खळबळ उडाली असून त्यांना याबाबत निर्णय घेण्यासाठी अवघ्या सात दिवसांची मुदत मिळाली आहे. 6 फेब्रुवारी पर्यंत या कर्मचा-यांनी नोकरीचा राजीनामा दिला तर त्यांना पुढील आठ महिन्यांचा पगार दिला जाणार आहे. नंतर मात्र कुठलेही कारण न देता, आणि विनामोबदला या कर्मचा-यांची छाटणी करण्यात येईल, असे स्पष्ट कऱण्यात आले आहे. (International News)

ट्रम्प यांचे विश्वासू आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांच्या अध्यक्षतेखालील सरकारी कार्यक्षमता विभागाच्या सल्लागार मंडळावर काम करणाऱ्या केटी मिलर यांनी ही माहिती दिली आहे. या कर्मचा-यांना पाठवण्यात आलेल्या ईमेलमध्ये यूएस डिपार्टमेंट ऑफ कार्मिक मॅनेजमेंट ने चार सूचना दिल्या आहेत. त्यात कोविड काळापासून जे कर्मचारी घरात बसून काम करत आहेत, त्यांनाही तंबी देण्यात आली आहे. या सर्वांना आठवड्यातून पाच दिवस कार्यालयात हजर रहावेच लागेल, असे सांगण्यात आले आहे. हा आदेश जे कर्मचारी पाळणार नाहीत, त्यांना कामावरुन कमी करण्यात येणार आहे. याशिवाय कर्मचा-याच्या उत्कृष्टतेवर भर दिला जाणार आहे. संघीय कर्मचाऱ्यांमध्ये अशा कर्मचा-यांची गरज आहे, जे विश्वासार्ह, निष्ठावंत, विश्वासार्ह असतील. त्यामुळे या कर्मचा-यांच्या कामातील निपुणतेवरच त्यांचे वेतन निर्धारीत करण्यात येणार असल्याचे या ईमेलमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. (Donald Trump)

हा ईमेल पाठवण्यात आला आहे, त्यातच कर्मचा-यांना राजीनामा देण्यासाठी कॉलमही दिला आहे. ज्यांना राजीनामा द्यायचा असेल, त्यांच्यासाठी राजीनामा हा स्वतंत्र कॉलम आहे. तिथे क्लिक केल्यावर त्या कर्मचा-यांचा राजीनामा मंजूर होऊन त्याला पुढच्या आठ महिन्यांचा पगार मिळणार आहे. हा ईमेल आल्यापासून अमेरिकेत खळबळ उडाली आहे. तसेच हा निर्णय चुकीचा असल्याची टिकाही होत आहे. यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. माहितीनुसार प्यू रिसर्च सेंटरच्या मते, गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत संघीय सरकारने 30 लाखांहून अधिक लोकांना रोजगार दिला होता. या संघीय कर्मचाऱ्याचा सरासरी कार्यकाळ सुमारे 12 वर्षे असतो. आता हे कर्मचारी एवढ्या मोठ्या संख्येनं कमी झाले तर अर्थव्यवस्थेत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. हे सर्व ईमेल ज्यांना पाठवण्यात आले आहेत, त्यामध्ये आरोग्य कर्मा-यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. (International News)

==============

हे देखील वाचा : Donald Trump : ऑर्डर टू डिपोर्ट

Donald Trump : पुतिनच्या वाटेवर ट्रम्प !

===============

मात्र या टिकेकडे दुर्लक्ष करीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संघीय कर्मचाऱ्यांचे वर्गीकरण करण्याचा आदेश दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सरकारची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आधीच सरकार कार्यक्षमता मंत्रालय म्हणजेच DOGE तयार केले आहे. याच विभागाचे नेतृत्व एलॉन मस्क करत आहेत. या मंत्रालयाच्या माध्यमातून अमेरिकेतील डिपस्टेट संबंधित असलेल्या प्रशासनातील कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी झाली आहे. ट्रम्प यांनी आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ‘श्रेणी एफ’ तयार केली आहे. यातून ट्रम्प प्रशासन आता जे कर्मचारी मागील कार्यकाळातील नेते आणि अधिकाऱ्यांशी एकनिष्ठ आहेत आणि नवीन सरकारच्या कामात अडथळे निर्माण करू शकतात, अशांना काढून टाकणार आहे. (Donald Trump)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.