Home » Kulman Ghisingh : नेपाळचा इलेक्ट्रीक मॅन !

Kulman Ghisingh : नेपाळचा इलेक्ट्रीक मॅन !

by Team Gajawaja
0 comment
Share

नेपाळमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, आता तिथे अंतरिम सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू आहे. पंतप्रधानपदासाठी अनेक नावे समोर आली. त्यात नेपाळच्या माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांचे नाव प्रमुख आहे. सुशीला कार्की यांना भ्रष्टाराच्या विरोधात लढा सुरु करणा-या पहिल्या वकील आणि न्यायाधिश म्हणून ओळखण्यात येते. त्यामुळे नेपाळ सरकार विरोधात सुरु झालेल्या या भ्रष्टाचार विरोधी लढ्याच्या नेत्या म्हणून सुशीला कार्की यांचे नाव पुढे आहे. यासोबतच नेपाळच्या पंतप्रधानपदासाठी आणखी एक नाव आंदोलक तरुणांनी पुढे केले, ते म्हणजे, कुलमान घिसिंग. 70 वर्षाच्या सुशीला कार्की या तरुणांच्या आंदोलनाच्या नेत्या कशा होतील, हे कारण देत अन्य एका गटानं 54 वर्षाच्या कुलमान घिसिंग यांचे नाव पुढे केले आहे. (Kulman Ghisingh)

 

कुलमान घिसिंग यांना नेपाळमध्ये इलेक्ट्रीक मॅन म्हणून ओळखले जाते. भारतामधून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या कुलमान यांनी नेपाळला अखंडपणे विद्युत पुरवठा सुरु केला. काही वर्षापूर्वी नेपाळमध्ये 18 तास लोडशेडींग होत असे. मात्र आता त्याच नेपाळमध्ये 24 तास वीज पुरवठा आहे, यामागे कुलमान घिसिंग यांनी राबवलेला उपक्रम आहे. नेपाळमधील रामेछाप येथे जन्मलेले कुलमन घिसिंग हे ऊर्जा विभागात अधिकारी होते. एक प्रामाणिक अधिकारी अशी त्यांची जनमानासात प्रतिमा आहे. आता नेपाळच्या या तरुणांच्या लढ्याला त्यांनी पाठिंबा दिला आहे. नेपाळच्या अंतरिम सरकारच्या प्रमुख सुशीला कार्की झाल्या तरी त्यामध्ये कुलमान घिसिंग यांचे महत्त्वाचे स्थान असणार आहे. (International News)

नेपाळमध्ये अंतरिम सरकाचे नेतृत्व कोणाकडे जाणार यासाठी सर्वाधिक दोन नावे चर्चेत आहेत. त्यात एक सुशीला कार्की यांचे नाव असून दुसरे नाव कुलमान घिसिंग यांचे आहे. नेपाळ वीज प्राधिकरणाचे माजी प्रमुख कुलमन घिसिंग यांचे नाव या आंदोलनातील तरुणांच्या एका गटानं पुढे केले आहे. सुशीला कार्कींसह नेपाळच्या अंतरिम पंतप्रधानपदाच्या आघाडीवर असलेले 54 वर्षीय कुलमन घिसिंग हे देशाच्या वीज मंडळाचे माजी प्रमुख आहेत. घिसिंग यांनी काठमांडू खोऱ्यातील दीर्घकाळ वीज कपातीवर तोडगा काढल. या खो-यात एकेकाळी 18 ते 20 तास लोडशेडींग चालत असे. पण घिसिंग यांनी हे चित्र बदलले त्यामुळे नेपाळमध्ये त्यांचे नाव सर्वमुखी झाले. मात्र मार्चमध्ये कुलमान घिसिंग आणि केपी ओली यांच्यात वाद झाला. त्यामुळे त्यांना त्यांच्या पदावरुन काढून टाकण्यात आले. ऊर्जामंत्री दीपक खडका यांनी कुलमान घिसिंग यांच्या नवीन योजनांना विरोध केल्यामुळे हा वाद वाढला. कुलमान यांना त्यांच्या पदावरुन काढल्यामुळे ओली सरकारचा मोठ्या प्रमाणात निषेध कऱण्यात आला होता. (Kulman Ghisingh)

आता त्याच कुलमान घिसिंग यांचे नाव अंतरिम सरकारचे नेतृत्व करण्यासाठी प्रस्तावित आहे. कुलमन यांचे भारताशीही विशेष नाते आहे. कुलमन यांनी भारतातील जमशेदपूर येथील प्रादेशिक तंत्रज्ञान संस्थेतून अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी नेपाळमधील त्रिभुवन विद्यापीठातून पॉवर सिस्टम अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. 1994 मध्ये कुलमान घिसिंग नेपाळच्या विद्युत प्राधिकरणात सामील झाले. त्यानंतर त्यांनी प्राधिकरणात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. 2016 मध्ये, घिसिंग यांना प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक करण्यात आले. या काळात त्यांनी वीज कपातीची समस्या सोडवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. चार वर्षे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केल्यानंतर, घिसिंग यांनी 2020 मध्ये आपले पद सोडले. मात्र घिसिंग 2021 मध्ये पुन्हा आपल्या पदावर रुजू झाले. (International News)

==========

हे देखील वाचा : Nepal : या होणार नेपाळच्या पंतप्रधान !

==========

24 मार्च 2025 रोजी कुलमान घिसिंग यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी तत्कालीन पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी त्यांना वीज प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालक पदावरून बडतर्फ केले. त्यांच्या जागी हितेंद्र देव शाक्य यांची नियुक्ती करण्यात आली. ओली सरकारच्या या कृतीवर जनतेने जोरदार टीका केली. हितेंद्र देव हे ओली यांच्या जवळचे होते, त्यामुळे त्यांची नियुक्ती कऱण्यात आल्याची टिकाही त्यावेळी झाली होती. कुलमान यांच्यासाठी सोशल मिडियावर मोठी मोहीमही राबवली गेली. नेपाळमधील वीज संकटावर कायमस्वरूपी तोडगा काढणारे घिसिंग हे तरुणांच्या कामय पसंतीस राहिले आहेत. कठीण काळात नेपाळचे नेतृत्व करण्यासाठी घिसिंग यांना योग्य मानले जाते. आता अंतरिम सरकारमध्ये सुशीला कार्की या प्रमुख झाल्या तरी घिसिंग यांनाही मानाचे पद मिळण्याची शक्यता आहे. (Kulman Ghisingh)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.